What-and-why | कि-का आणि कां-कूं

- मुकेश माचकर
अरे संसार संसार..
‘अरे’चा आणि संसाराचा काय संबंध?
संसारातल्या दैनंदिन प्रापंचिक जबाबदाºया वाहणं ही तर ‘अगं’ची जबाबदारी असते ना प्रामुख्यानं?...
..अशी समजूत बाळगण्याचा काळ आता बºयापैकी इतिहासजमा झालेला आहे. जेव्हा तोच काळ होता, तेव्हाही खरं तर अनेक संसारी ‘अरे’ आसपास वावरत होते, संसारगाडा हाकत होते. पण, त्यांना आजच्यासारखं ‘हाऊस हजबण्डचं’ किंवा ‘होममेकर’चं ग्लॅमर नसल्यामुळे, किंबहुना संसारी असणं हे तथाकथित ‘मर्दानगी’च्या विरोधात मानलं गेल्यामुळे हे संसारी ‘अरे’ कधी प्रकाशझोतात येत नव्हते. आता तर एका उच्चभ्रू वर्गात का होईना, कर्तबगार बायकोनं अर्थार्जनाचा जिम्मा उचलण्याचा आणि घरेलू बाप्यानं चूल-मूल-घर सांभाळण्याचा काळ आला आहे, त्याविषयी कोणी ‘कि-का’ (आठवा, करिना कपूर आणि अर्जुन कपूरचा सिनेमा) किंवा ‘कां-कूं’ करू शकत नाही.
अर्थात, आजही बरेचसे ‘अरे’ दैनंदिन प्रापंचिक जबाबदाºयांपासून मुक्त असतात. काहींकडे तशी देदीप्यमान वंशपरंपरा असते. ‘आमच्या यांना साधा चहासुद्धा करून घेता येत नाही’ हे वरकरणी तक्रारखोर आणि दु:खनिदर्शक वाक्य अशा घराण्यांमध्ये अतीव कौतुकानं उच्चारलं जातं. एखाद्याला आपल्यापुरता चहा करून घेता आला असताच, तर त्यानं घराण्याचं नाक कापलं गेलं असतं, असाच त्या वाक्याचा सूर असतो. डाळभाताचा कुकर लावणं हे अशा पुरुषांना रॉकेट सायन्स वाटतं. असे, स्वत:ला भाग्यवान समजणारे ‘अरे’ त्यांच्या ‘अगं’बरोबर सप्तपदी चालतात किंवा सुख-दु:खांचे, सांसारिक जबाबदाºयांचे समान जोडीदार बनण्याची शपथ रजिस्ट्रारसमोर घेतात. पण, प्रत्यक्षात दैनंदिन सांसारिक व्याप-तापांची वाट मात्र ‘अगं’ला एकटीनेच चालावी लागते. पारंपरिक संसारांमधले ‘अरे’ हे बहुतेक वेळा चारचौघांत ‘अरे’ ही नसतात, मान्यवर ‘अहो’ असतात. बायको खासगीत ‘अरे’ म्हणत असली तरी सगळ्यांसमोर स्ट्रिक्टली ‘अहो’च. असे हे ‘अहो’ कुटुंबासाठी अर्थार्जन या एकमात्र ‘प्रमुख’ जबाबदारीचं वहन करतात आणि ती जबाबदारी सर्वात मोठी आहे असं त्यांनीच ठरवून टाकलेलं असल्यामुळे ‘फुटकळ-सामान्य’ प्रापंचिक बाबींच्या जमिनीला त्यांचे पाय कधी लागतच नाहीत, ते काम ‘अगं’चं. अशा घरांमध्ये घरकाम ही संपूर्णपणे स्त्रीची जबाबदारी असते, तिचं ते जन्मजात कर्तव्य वगैरे असतं (दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा) आणि त्या कामांचं व्यावहारिक मूल्य शून्याच्या जवळपास गणलं जातं (ते सगळं ‘एक चुटकी सिंदूर की कीमत’मध्येच गणून मोकळं व्हायचं)
...म्हणूनच अशा ‘अरे’ने ‘अगं’बरोबर सप्तपदी चालल्यानंतरही त्यांच्या संसाराची एकत्र वाटचाल सुरू होईल, असं नसतं. संसार एकमेकांबरोबर चालतो, अगदी हातात हात घालून चालतो; पण पायाखालच्या वाटा वेगवेगळ्या असतात...
प्रसंगोत्पात ‘बायकांची कामं’ करणारा मुलगा गुणी म्हणून नावाजलाही जातो; पण तेही ‘बिचाºया’ नजरेने. त्याच्यावर काय ही वेळ आली आहे, अशा भावनेसह. त्यातल्या कोणत्याही कामात त्याला विशेष रस निर्माण होता कामा नये याकडे सगळ्यांचा कटाक्ष असतो. एखाद्या मुलाला त्या कामांमध्ये किंवा स्वयंपाकघरात थोडा जास्त रस असेल, तर त्याच्याकडे भलत्याच विचित्र नजरेनं पाहिलं जातं. ‘तुझं काय काम रे स्वयंपाकघरात, बायल्या,’ असं हिणवलं जातं. ही कामं मुलींची आहेत, असं ठरवणंही एकवेळ समजू शकतं. पण, ही कामं हलकी आहेत आणि म्हणून ती मुलींची आहेत, असं बिंबवलं जातं.

फार मोजक्या घरांमध्ये घरातली सगळी कामं सगळ्यांची असतात, असा संस्कार केला जातो. अशा घरांमध्ये मुलगे बाजारहाट तर करतातच; पण, भाज्या निवडतात, चिकन-मटण-मासे साफ करतात, अगदी केरवारे, लादी पुसणं, भांडी घासणं, ही कामंही अधूनमधून का होईना करतात. स्वयंपाकात रूची असेल तर चहा, अंड्याचे बेसिक पदार्थ आणि डाळभात लावणं हे शिकून घेतलं जातं. चपातीसाठी कणीक मळणं आणि सुघड चपाती लाटणं हे स्वयंपाकघरातलं थोडं वरच्या हुद्याचं आणि अवघड मानलं जाणारं काम आहे. तेही काही मुलं शिकून घेतात.
ही कामं करताना, घरातून किंवा बाहेरच्या वातावरणातून कितीही विषमतापोषक ‘संस्कार’ करण्याचा प्रयत्न झाला तरी काही गोष्टींचे साक्षात्कार ही कामं करणाºया पुरु षांना होत जातात. ते येणेप्रमाणे :
एकतर घरातलं कोणतंही काम हे ‘निसर्गत:’ पुरुषाचं किंवा बाईचं नसतं.
दुसरं म्हणजे ज्या कामांचा बाईवर शिक्का मारलेला असतो, त्या कामांची प्रत्येक स्त्रीला आवड असलीच पाहिजे, असं काही नसतं. शिवाय त्या कामांची पुरुषांना आवडच निर्माण होऊ शकत नाही, असंही काही नसतं.
एखाद्या स्त्रीला कोणतंही घरकाम (खासकरून स्वयंपाक) नावडीनं करावं लागतंच म्हणून करावं लागलं, तर ते काही फारसं बरं होत नाही, ते कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीनेही हानिकारक ठरतं. ज्याला ज्याची आवड, त्यानं ते काम करावं, हे तत्त्व (मला कशाचीच आवड नाही, मी काहीच करणार नाही, असा आळशी अर्थ निघणार नसेल तर) घरात सर्वोत्तम असतं.
हे साक्षात्कार होत जाणाºया पुरुषाला घरातल्या आणि बाहेरच्या पुरुषांकडून आणि स्त्रियांकडूनही बरीच हेटाळणी सहन करावी लागते. काही वेळा तर कौतुकाच्या मिषानेही हेटाळणीच पदरात येते. पण, असा मुलगा जेव्हा शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडतो, तेव्हा त्याच्यावर ‘एकट्याच्या संसारा’ची जबाबदारी पडणार असते. तिथे त्याला ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करण्याची संधी मिळणार असते...
..तिच्याविषयी पुढच्या भागात.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘कुटुंब वत्सल’गृहस्थ असून, दोन मुलींचा बाबा आहे.mamanji@gmail.com)

 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.