- गीता वडनप
दुखणी अंगावर काढण्याची हौस असलेल्या बायकांसाठी चार समजुतीचे शब्द
 
सिक पाळी देहधर्म  म्हणून स्वीकारताना स्त्रीजातीच्या मानसिकतेची दोन टोकं पाहायला मिळतात. त्यातील एक टोक म्हणजे काही बायका मासिक पाळीला इतकं डोळे झाकून स्वीकारतात की कित्येक वेळेस मासिक पाळीतील रक्तस्त्रावातील बदल, त्यातील अनियमितता, ओटीपोटीतील कमालीचा जडपणा, पाळीशी संबंधित वेदना, असह्य कंबरदुखी, दोन पाळ्यांमध्ये होणारा रक्तस्त्राव यासारख्या तक्रारींकडे त्या चक्क दुर्लक्ष करताना दिसतात.
दुसर्‍या टोकाच्या बायकांमध्ये मासिक पाळीचा खूपच बाऊ केला जातो. पाळी येण्याआधीचे दोन दिवस, पाळीचे चार ते पाच दिवस आणि नंतर दोन दिवस असे मिळून जवळजवळ आठ ते नऊ दिवस त्या बायका भावनाप्रधान बनत आपलं दैनंदिन जीवन अतिशय एकसुरी, थोडंसं संथ आणि सामाजिक वतरुळापासून अलिप्त करून टाकतात. ते दिवस त्या बायका आपल्या आयुष्यातून जणू वजा करून टाकतात. ही दोन्ही टोकं चुकीची आहेत.
मानसिक कुचंबणा, एकटेपणा, अपेक्षाभंग यासारख्या मानसिक ताणाच्या परिस्थितीतून जाणार्‍या आणि इतरांचं लक्ष वेधून घेण्याची सवय असणार्‍या बायका आपल्या मासिक पाळीचा खूप बाऊ करताना दिसतात. अर्थात यासाठी काउन्सिलिंगची गरज असतेच.
मासिक पाळीशी संबंधित असणार्‍या पुढील तक्रारींकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं ठरतं.
’ पाळी लवकर लवकर येणं म्हणजे दोन पाळींमधील विशिष्ट दिवसांचा कालावधी (२२ ते ३0 दिवस) सातत्याने कमी होणे.
’ प्रत्येक मासिक पाळीमध्ये जास्त दिवस रक्तस्त्राव होणं (नेहमी ४ ते ५ दिवस असणारा रक्तस्त्राव पुढे १0 ते १२ दिवसांपर्यंत चालू राहणं)
’ पाळीच्या प्रत्येक दिवशी जास्त रक्तस्त्राव होणं.
’ रक्तस्त्रावातून गुठळ्या जाणे.
’रक्तस्त्रावाबरोबर ओटीपोटातून तीव्र स्वरूपाच्या वेदना.
’ दोन मासिक पाळींमध्ये पांढरा अथवा रक्तवर्णी स्त्राव जाणे.
’ पाळीबरोबर असह्य कंबरदुखी
’ मासिक पाळी अनियमित होणे. दोन पाळ्यांमधील अंतर वाढणे.
’ पूर्वीच्या तुलनेत मासिक पाळीतील रक्तस्त्राव लक्षात येण्याइतपत कमी होणे.
मुलींमध्ये आणि बायकांमध्ये दुर्लक्षित असणारा अँनिमिया (रक्तक्षय), गर्भाशयाला सूज, गर्भाशयात गाठी (फायब्रॉईड), गर्भाशयाचा, बीजकोषांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या अस्तराला सूज येणे (एंडोमेट्रिओसिस), बीजकोषांची (ओव्हरीज) सूज, बीजकोषातील गाठी (ओव्हॅरिअन सिस्ट) अशा आजारांमध्ये वरील तक्रारी दिसून येतात.
मासिक पाळीमधील अतिरक्तस्त्रावामुळे रक्तक्षय (अँनिमिया) होऊन अशक्तपणा, चिडचिड, थकवा, निद्रानाश आणि डोकेदुखी यासारखी लक्षणं त्रास देऊ लागली की मग बायका डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातात.
मासिक पाळीच्या काही तक्रारींसाठी ताबडतोब तपासणी आवश्यक ठरते. पोटाची सोनोग्राफीसुद्धा बरेच वेळा आजाराचं निदान ठरविण्यास उपयुक्त ठरते. प्रत्येक वेळी काही असाध्य भयंकर रोग झाला नसतो, पण इतर दुखण्यांसाठीसुद्धा साध्या उपचारांची मदत होऊ शकते. पाळीसंबंधी काही तक्रारींसाठी क्युरेटिंग, गर्भाशयाच्या अस्तराच्या तुकड्यांची हिस्टोपॅथॉलॉजी तपासणी, तर कधी हार्मोन्सच्या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अगदी टोकाच्या दुखण्यामध्ये स्त्रीच्या वयाची, प्रसूती नोंदीची दखल घेत गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. पण अर्थातच घाबरून जाऊन विनाकारण शस्त्रक्रिया (गर्भाशय काढणे) गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करणेही योग्य नाही.
मासिक पाळीमध्ये खूप रक्तस्त्राव होत असेल आणि इतर गाठी, सूज वगैरे काही नसेल तर एंडोस्कोपीच्या मदतीने (दुर्बिणीतून) गर्भाशय न काढताही उपाययोजना करता येते. याला एंडोमेट्रियल अब्लेशन असं म्हणतात. आपल्या विश्‍वासाच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला अशावेळी उपयुक्त ठरतो.
कित्येक बायका संकोच आणि लाज वाटल्यामुळे मासिक पाळी संबंधित तक्रारी सहन करत स्वत:च खूप नुकसान करून घेतात. कित्येक वेळेस शारीरिक तपासणी न करून घेता नुसतीच औषधे घेणे ही फार मोठी चूक ठरू शकते. बायकांना रोजचं स्वयंपाकपाणी, मुलांचा अभ्यास-परीक्षा, नातेवाईकांकडे समारंभ, घराची स्वच्छता, स्वत:चा नोकरी-धंदा यातून वेळच मिळत नाही आणि हेच चुकीचं आहे.
मासिक पाळी संबंधित तक्रारींवर वेळीच तपासण्या आणि उपचारांच्या सहाय्याने तक्रारींची तीव्रता कमी होतेच, पण त्याचबरोबर संभाव्य आजाराचा धोकाही टळू शकतो.
प्रत्येक बाईने डोळसपणे आपल्या मासिक पाळीकडे बघायला हवं. मासिक पाळीतील स्वच्छता, थोडासा आराम, शरीरावर ताण येणार नाही अशा रीतीने केलेला हलका व्यायाम, पौष्टिक सकस आहार आणि आनंदी प्रसन्न मनामुळे मासिक पाळीतील शारीरिक त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
प्रत्येक मासिक पाळीचा कालावधी, पाळीतील रक्तस्त्रावाचे प्रमाण, त्या दरम्यान जाणवणारे इतर त्रास यांची नोंद करून ठेवायला प्रत्येक बाईनं शिकायला हवंय.
 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.