- अजित जोशी


हळूहळू एखाद दोन महिन्यात मी बरोबर महिन्याचा खर्च लिहायला शिकले. अगदी स्वामीजींनी दाखवली त्या वर्गवारीसकट. आणि पटणार नाही, पण शेवटच्या महिन्यात खर्च जवळजवळ १५ टक्के कमी झाला होता.’ 
सविता वहिनी रमाला आपले अनुभव सांगत होती. ‘तेव्हा मग स्वामीजींनी मला आश्रमाची साधिका म्हणून स्वीकार केले’ - सविता वहिनींनी मोठ्या आनंदानं सांगितलं. 
‘साधिका म्हणून स्वीकार? बापरे, म्हणजे काय रोज इथे प्रार्थनेला वगैरे यायचं की काय?’ - रमा गोंधळली. 
‘छे छे, साधिकेला स्वामीजी सर्वप्रथम देतात कासवपेटी.’
‘कासवपेटी? म्हणजे काय? फेंगशुईवगैरे सारखं की काय?’ 
‘तसलं काही नाही गं..’ - सविता वहिनी ठसक्यात म्हणाली. ‘अगं स्वामीजींचं म्हणणं आहे की, गुंतवणूक ही ससा-कासवाच्या गोष्टीसारखी आहे.’
‘हं.. म्हणजे जोरात धावून झोपून जाणारी नाही तर हळूहळू पुढे सरकरणारी, असंच ना?’ रमाला आता इथली भाषा कळायला लागली होती. ‘फरक असा की यात शर्यत नाही. ससा आणि कासव, दोन्ही आपल्यातच आहे. आणि मुख्य म्हणजे दोघेही आवश्यक आहेत. 
पण गुंतवणुकीची सुरुवात मात्र कासवासारखी रक्कम गुंतवून करावी असं स्वामीजी म्हणतात.’
‘का गं?’
‘काय आहे, सुरुवातीला आपल्याला सवय नसते. त्यात आपण बायकांनी पैशाचे व्यवहार फार पाहिलेले असतातच असं नाही. कासवाच्या गुंतवणुकी सोप्या असतात. त्या करता करता कागदपत्र, बँका, आॅनलाइन व्यवहार या सगळ्या गोष्टींची सवय होते. पुन्हा यात मोबदला फार मोठा नसला तरी पैसे बुडायची भीतीही कमी असते. आणि सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याकडे खूप पैसेही नसतात गुंतवायला. तेव्हा हात साफ करायला या कासवाच्या गुंतवणुकी बेस्ट!’ - गमतीनं डोळा मारत सविता वहिनी म्हणाली. 
‘आणि कासवाच्या गुंतवणुकी म्हणजे कोणत्या?’
‘आपल्याला चांगली ठाऊक असलेली म्हणजे बँकेची एफडी.’ ‘ओह हां, ती तर फारच सोपी आहे’ - रमाला काहीतरी ओळखीचं वाटलं. ‘हो, पण त्यातही काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. पहिलं म्हणजे आपण कोणत्या बँकेत गुंतवतोय ते नीट पाहून घे. सरकारी बँका सर्वात सेफ; पण त्यापेक्षा सहकारी बँकात बहुतेकदा जास्त चांगला भाव मिळतो.’
‘हां, त्यामुळे सहकारी बँकात पैसे ठेवलेले उत्तम.’ ‘तिथेही एक अडचण आहे. काही बँकांवर संक्रांत आलेली ऐकलं की नाही तू?’
‘हो, पेपरात वाचलं होतं खरं! पण मग त्यांच्यात ठेवू की नये पैसे?’
‘नाही ठेवावे ना, पण दोन गोष्टी, जर कोणी चांगला एखाद टक्का जास्त दर देत असेल बाकीच्यांपेक्षा तर दहा वेळा विचार करावा. कोण संचालक मंडळावर आहे, स्थानिक मंडळी कोण गुंतल्येत, त्यांनी स्वत: कुठे पैसे गुंतवलेत या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळे पैसे एका बँकेत कध्धीही ठेवू नयेत. आणि शेवटच्या सूचना.. आपल्याला पैशाची गरज कधी असेल त्याचा अंदाज घे. सारखे लागणार नसतील तर चक्र वाढ व्याजावर राहू दे. पण दर महिन्याला किंवा तीन महिन्यात लागणार असतील तर मग तशा व्याजाचा पर्याय निवड. आणि जर का या व्याजासकट तुझं सगळं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल, तर १५ एच फॉर्म भर म्हणजे कर कापला जाणार नाही.’ ‘अस्सं, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादी एफडी बनवली की मग ती या पेटीत ठेवायची.’
‘नुसती एफडी नाही, इतरही आहेत ना कासव गुंतवणुका. एक लाखमोलाची गुंतवणूक म्हणजे पीपीएफ. कर सवलत तर आहेच, पण व्याजावर कर नाही आणि त्यातल्या त्यात कासव गुंतवणुकीत सगळ्यात चांगला दर. फक्त इथे टाकलेले पैसे बरीच वर्षं अडकून पडतात बरं. तेव्हा याच्याकडे भविष्यातला बटवा म्हणून पाहा. आणि जर महिन्याच्या महिन्याला वाचवत असशील तर आरडीची पण गुंतवणूक उत्तम, अकरा महिन्यात परत! शिवाय मी तर अजून एक करते. तिमाहीला पाच ग्रॅम असं माझ्या बचतीनुसार टारगेट ठेवते. तीन महिन्यातून एकदा पाच ग्रॅम सोनं घेऊन टाकते.’
‘अर्रेवा, लेकीच्या लग्नाची तयारी होय?’
‘ते तर आहेच गं, पण स्वामीजी म्हणतात की, सोनं हेच सग्गळ्यात जुनं आणि खरं मूल्यवान चलन. आता इतर बरेच पर्याय आहेत आणि ते निवडावे पण, पण थोडा तरी पैसा सोन्यात पेरलाच पाहिजे. कधी ना कधी हमखास कामी येतो. नाहीतर मुलाबाळांच्या लग्नाला राहतोच, काय?’ 
‘तर रमादेवी, जेव्हा तुम्हीही तीन महिन्याचे हिशेब दाखवून साधिका व्हाल तेव्हा तुम्हालाही ही कासवपेटी मिळेल’ - खट्याळपणे म्हणत सविता वहिनीनं रमाचा निरोप घेतला.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट असून, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत.)

meeajit@gmail.com


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.