- डॉ. मृण्मयी भजक

मुलाचा बालहट्ट पुरवायचा म्हणून त्रिकोणी पोळी लाटायला घेतली. पण प्रयत्न करूनही पोळी गोलच व्हायची. पूर्वीसारखा वाकडा तिकडा त्रिकोण जमतच नव्हता. एकदा का एखादी गोष्ट अंगवळणी पडली की ठरवूनहीपूर्वीच्या चुका नाही करता येत...

लहानपणी आपण किती खेळतो, प्रयोग नव्हे जुगाड करून पाहतो. काहीतरी नवीन करतो. भलतंच काही झालं तर गंमत म्हणून मोकळेही होतो. पण जसजसं वय वाढतं तसतशी आयुष्यातली ही गंमत करून बघण्याची सवय मागे पडते. करिअर, पैसे, प्रतिष्ठा या सगळ्या मागे धावता धावता काही गोष्टी आपल्या हातातून निसटून जाताहेत. सगळं काही आहे. पण ‘आहे मनोहर तरी’ अशी आपली स्थिती का होते? काय हरवलंय नक्की आपल्या आयुष्यातून? मला वाटतं आपल्या आयुष्यातून निखळ, निरागस गंमत हरवलीय. 


‘काहीतरीच काय? गंमत नका करू हं.’ 
असं आपण सारखं सारखं बोलून आयुष्यात येऊ पाहणाऱ्या गमतीसाठी दारं-खिडक्या बंद करून घेतो आहोत. गंमत ही साधीच असते. अगदी सहज असते. पण जेव्हा ती नसते ना, तेव्हा खरंच आयुष्य अळणी होऊन जातं. म्हणून वय कितीही असो, चिमूटभर मिठासारखी चिमूटभर गंमत हवीच !
खरंतर त्यासाठीच आहे हे सदर.‘चुटकीभर गंमत’. या सदरातील गंमत वाचून तुम्हीही ती करून बघा. लहान मुलं बोअर झाली की आपण त्यांना काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी देतो, बऱ्याचदा सुरुवातीला मुलं कंटाळतात, पण एकदा करायला सुरु वात केली की रमतात. त्यांना त्यातली गंमत कळत जाते. आपण तर बोलून चालून मोठी माणसं! सुरुवातीला काही गोष्टी यडपट वाटतील. काही करायला अवघड वाटतील. पण आयुष्यात हरवलेली गंमत परत येणार असेल तर थोडीशी गंमत करून पाहायला काय हरकत आहे. 
मी अशा गमती नेहमी करते. 
आता परवाचीच गोष्ट.
परवा मी पोळ्या करत असताना लेकानं विचारलं, ‘आई, तुला त्रिकोणी पोळी करता येईल का गं’. मी म्हटलं, ‘न यायला काय झालं? अरे मी पोळ्या करायला शिकले ना, तेव्हा सुरुवातीला त्रिकोणीच व्हायच्या पोळ्या. नंतर हळूहळू जमायला लागली गोल पोळी.’ ‘खरंच, तुला करता येईल त्रिकोणी पोळी?’ मुलानं पुन्हा विचारलं.
‘हो रे बाबा, नक्की करता येईल.’
‘मग मला आत्ता कर ना त्रिकोणी पोळी.’
कधी नव्हे ते माझ्या आवाक्यातला बालहट्ट होता, मलाही बरं वाटलं.
आणि मग मी त्रिकोणी पोळी करायला घेतली. घडीच्या पोळ्या शिकतानाचे ते दिवस आठवले. कितीही प्रयत्न केला तरी पोळी त्रिकोणीच व्हायची. त्या आठवणींवर हसत मी घडीचा त्रिकोण केला आणि त्रिकोणी पोळी लाटायला घेतली. 
आता पूर्वीसारखी त्रिकोणी पोळी होणार म्हणून मलाही गंमत वाटत होती. पोळी लाटता लाटता कळलं की अरेच्या, पोळी तर आपोआपच गोल होत चाललीये. प्रयत्न करूनही त्रिकोण काही नीट येतच नाहीये. आणि पूर्वीसारखा वाकडा तिकडा त्रिकोण तर नाहीच नाही. कसाबसा गोलाकार त्रिकोण झाला पोळीचा.
मुलाला पोळी वाढली तसं तो म्हणाला, ‘हे गं काय? हा काही बरोबर नाही केलास तू त्रिकोण. तू तर म्हणालीस की तुला नक्की जमेल म्हणून. बघ नाही जमला ना तुला!’
खरंच की. मलाही आश्चर्य वाटलं. कसं काय नाही जमलं मला? आणि मग विचार सुरू झाला. आपण कोणतीही गोष्ट करताना सुरुवातीला चुका करतो, धडपडतो आणि हळूहळू सुधारणा होते. त्या चुका होत असतात तेव्हा असं वाटतं की कधी एकदा आपण ती गोष्ट नीट शिकतो. पण एकदा का ती गोष्ट जमली, अंगवळणी पडली, की ठरवूनही पूर्वीच्या चुका करता येत नाहीत. 
गाडी शिकणं, पोहणं, व्यायाम, नृत्य, गाणं अशा अनेक बाबतीत हे लागू पडतं. आयुष्य नेहमी पुढे जात असतं, मागे कधीच येत नाही, हेही पटतं अशा वेळी.
मग तो शिकतानाचा, कसोटीचा काळ आठवतो. त्यावेळी काही क्षणी आपण कसे रडकुंडीला आलो होतो, काही वेळा कसे हतबल झालो होतो आणि काही वेळा माघार घेऊन पळून जाण्याच्या किती जवळ होतो आपण हे सगळं आठवतं. 
आणि त्यातून आपण सहीसलामत तरून आलो याचं समाधानही वाटतं. पण पळून जावेसे वाटणारे क्षण मात्र खरंच कसोटीचे असतात. आणि तिथेच टिकून राहणं महत्त्वाचं, नाही का?

 

(लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत. drmrunmayeeb@gmail.com)