लिंगबदलाच्या आधी आणि नंतरचे पेच

By ऑनलाइन लोकमत on Tue, December 05, 2017 12:15pm

बीड जिल्ह्यातील महिला पोलिसाने लिंगबदल शस्रक्रियेसाठी सुटी मागितली. ती सुटी पोलीस प्रशासनानं नाकारली. मात्र उच्च न्यायालयाने लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी देत हा मुलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करत सुटी द्यावी असा निकाल दिला. आता प्रश्न आहे तो, या लिंगबदलानंतर ती ‘महिला पोलीस’ म्हणून पोलीस दलात कायम राहणार का? लिंगबदलाच्या शस्रक्रिया, त्यासंदर्भातला मोकळेपणा वाढत असताना आता नवनवे पेच समोर येऊ लागले आहेत...

- गजानन दिवाण

स्त्री म्हणून जन्म घेतला; पण आपण स्त्रीच्या देहात पुरुष आहोत असं तिला वाटतं. किंवा त्याउलट आपण पुरुष देहांत स्त्री आहोत असं ‘त्याला’ वाटतं. पण केवळ कुटुंब, नातेवाईक, शेजारी आणि अख्खा समाज यांचा विचार करून आयुष्यभर काहीजण घुसमट सहन करतात. आणि काही हिंमत करून वैद्यकीय मदत घेऊन, शस्त्रक्रिया करून लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतात. सोपा नसतोच तो प्रवास; पण अनेकदा समाजमान्यही नसतो. मानवी अधिकारांतर्गत लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याही जातात. पण त्यानंतरच्या आयुष्याचं काय? म्हणजे स्त्री वा पुरुष म्हणून एखाद्या प्रशासकीय व्यवस्थेत ती - तो काम करीत असेल तर लिंगपरिवर्तनानंतर त्या नोकरीचं काय? तिची/त्याची सेवा तशीच पुढे सुरू राहील, की नव्याने भरती व्हावं लागेल? मागील सेवेचा लाभ मिळेल की नाही? असे अनेक प्रश्न आहेत आणि यासंदर्भात आपल्याकडे कुठलाच कायदा नाही. लिंगपरिवर्तनाच्या बाबतीत सध्या एक मोठी अडचण नेमकी हीच आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील महिला पोलिसाने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेसाठी केलेला रजेचा अर्ज पोलीस दलानं फेटाळल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. लिंगबदल करण्यापासून तिला रोखणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही; पण लिंगबदलानंतर ती पोलीस दलात कायम राहील, की नाही, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. २००९ साली ती पोलीस दलात दाखल झाली. अगदी सुरुवातीपासून तिचा कल तसा पुरुषी. वय वर्षे २७. आपण ‘पुरुष’ आहोत अशी भावना. मात्र एवढी वर्षे समाजाला घाबरून तिने आतल्या आत ही घुसमट सहन केली. गेल्या आठवड्यात सारे बळ एकवटून ती जगासमोर आली. मला लिंगपरिवर्तन करायचे आहे, यासाठी रजा हवी आहे, असा अर्ज तिने पोलीस अधीक्षकांकडे केला. अधीक्षकांनी तो फेटाळला. नंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सकारात्मक पावले उचलली गेली; पण तिची लढाई अजून संपलेली नाही. लिंगपरिवर्तन झाल्यानंतर पोलीस दलात पूर्वीप्रमाणेच कायम राहाता यावं हा तिचा मुद्दा आहे. मागणी आहे. आणि आता प्रश्न लिंगबदलाची परवानगी मिळाल्यानंतर दुसºया प्रश्नाचं उत्तर शोधणंही क्रमप्राप्त आहे. उच्च न्यायालयानं या संदर्भात तिने दाखल याचिकेवर निकाल देताना लिंगबदल शस्त्रक्रिया हा मुलभूत अधिकार असल्याचे सांगत शस्त्रक्रियेसाठी सुटी देण्याची जबाबदारी मॅटची असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटची सुटी देण्याची जबाबदारी आहे असे निर्देश आता उच्च न्यायालयाने दिले आहेत. २३ जूनला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय चाचणीत तिच्यामध्ये ‘वाय’ या पुरुषी गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास आलं होतं. तिने मानसोपचारतज्ज्ञाकडूनही समुपदेशन घेतलं. तिला जेंडर डायसोफोरिया असल्याचं स्पष्ट झाल्यानं तिनं लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. आणि वरिष्ठांकडे केलेले सुटीचा अर्ज मंजूर होण्यापूर्वीच आपलं पुरुषी नाव लावण्यास सुरुवातही केली. तिच्या या निर्णयाला कुटुंबाचा पाठिंबा आहे. माजलगाव तालुक्यातील अख्खं गावही तिच्या पाठीशी आहे. प्रश्न आहे तो या लिंगपरिवर्तनानंतर पोलीस प्रशासनात नोकरी टिकेल की जाईल हा? कारण पोलीस दलात भरती करीत असताना महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे निकष आहेत. आता लिंगबदल केल्यानंतर महिला पोलीस म्हणून मिळालेल्या नोकरीचं काय? पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार इच्छा म्हणून ती लिंग बदलत असेल तर पोलीस दलात तिला पुरुष म्हणून नव्यानं भरती व्हावं लागेल. मात्र, वैद्यकीय गरज म्हणून ती हे करीत असेल तर नव्याने भरती होण्याची गरज राहणार नाही. यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. दुसरीकडे शस्त्रक्रियेनंतरही आपल्याला सेवेत कायम ठेवावं, अशी मागणी या महिला पोलिसाने लावून धरली आहे. या पेचाचं पुढे काय होणार हा प्रश्न आहेच. मात्र येत्या काळात असे प्रश्न समाजासमोर येतील आणि प्रशासनासमोरही. तेव्हा हे प्रश्न कसे सोडवले जाणार? त्यासंदर्भात कायदे केले जाणार का? त्याची अंमलबजावणी कशी होणार, असे अनेक प्रश्न आता या एका घटनेने समोर आणले आहे. एकीकडे वैयक्तिक इच्छा, कल, दुसरीकडे समाज आणि कायद्यासह पोटापाण्याचे प्रश्न यासाºयात अशा नाजूक प्रश्नांचं काय होणार? उत्तर म्हणून या घटनेकडे लक्ष ठेवायला हवंय..

लिंगबदलाची प्रक्रिया लिंगबदल करून पुरुषाचं रूपांतर स्त्रीमध्ये करताना स्तन, योनी यासारख्या अवयवांचं रोपण केलं जातं. तसंच स्त्रीचं पुरुषामध्ये रूपांतर करतानादेखील योनी काढून तिथं लिंगरोपण करावं लागतं. ही प्रक्रिया खूप काळ चालणारी असते. शिवाय अत्यंत गुंतागुंतीची असते. याशिवाय हार्मोन्सची औषधं, मानसिक समुपदेशन यांचीही नियमित मदत घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात ही प्रक्रिया वेगळी असू शकते. त्यात ५ लाखांपासून तब्बल ४० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. या संपूर्ण प्रक्रियेनंतर लिंगबदल केलेल्या स्त्रीच्या शरीरावर केस येतात. मिशी येते. आवाजात घोगरेपणा येतो. पुरुषाने लिंगबदल केल्यास स्त्रीचे सर्वगुण हळूहळू त्याच्यामध्ये दिसू लागतात. दीर्घकाळ चालणारी ही प्रक्रिया असते.

मुलीच्या शरीरातून बाहेर पडलेला सिद सांगतो, हे सोपं नसतंच ! मुलगी म्हणून जन्माला आलेल्या आणि अशीच घुसमट सहन करणाºया मुंबईकर ‘सिद’ने पाच वर्षांपूर्वी लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुषांच्या दुनियेत प्रवेश केला. तो म्हणाला, ‘पाचवीत असेन मी तेव्हा. मुलगी असूनही मला मुलींचेच आकर्षण असायचे. कॉलेजमध्ये मुलीचे कपडे घातल्याचं मला कधी आठवत नाही. मुलांच्या कपड्यातच मी स्वत:ला कम्फर्ट समजायचो. पुढे आॅर्कुटवर मला पहिल्यांदा लेसबियन मित्र भेटले. त्यांच्या बैठकांना मी हजर राहू लागलो. त्यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. लिंगबदल केलेला पहिला मित्र मला २००९ मध्ये भेटला. असेही काही असते हे मला पहिल्यांदा कळले आणि आपण काही चुकीचे आहोत, हा गैरसमज दूर झाला. मी मुलगी नसून मुलगा आहे, हे सांगण्याची हिंमत त्यानेच मला दिली. माझ्या अंथरुणाला खिळून असलेल्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. माझा हा बदल तिला कदाचित सहन झाला नसता. पण ती गेल्यावर मी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. घरच्यांनाही सांगितलं. त्यांना समजून घ्यायला थोडा वेळ लागला. आजही हा काय प्रकार आहे हे ते पूर्णपणे समजू शकले नाही. पण माझ्या कंपनीतील बॉसनेदेखील समजून घेतले. ते म्हणाले, ‘तू लिंग बदलण्याला माझा काहीच आक्षेप नाही. तू आधी जे काम करायचास तेच कर, त्यात लिंगबदलानं काही फरक पडणार नाही.’ अशा जवळच्या लोकांमुळे मी मनासारखं आयुष्य जगण्याचा मार्ग निवडू शकलो. लिंगबदलाची प्रक्रिया तशी मोठी आहे. २०१२ साली मी ती सुरू केली. माझ्या शरीरात थोडाथोडा बदल होत गेला. हार्मोन्समुळे पूर्ण पुरुषी शरीराकडे माझा प्रवास सुरू झाला होता. छोट्या-छोट्या गोष्टीत मी आता इमोशनल होत नव्हतो. मुलायम त्वचा जात होती. रंगही थोडासा डार्क होत होता. छातीवरचे उभार गेले. शेवटी मला जे हवं होतं ते अखेर मिळालं. आज माझे वय ३९ वर्षे आहे. १४ वर्षांपासून मी त्याच कंपनीत काम करत आहे. मला समाजाने एक पुरुष म्हणून पूर्णत: स्वीकारलं आहे. अर्थात, हे सारं इतकं सोपं नाही. फक्त लिंगपरिवर्तन केलं म्हणजे झालं सगळं सुरळीत असं होत नाही. तो बदल केवळ लिंगापुरता राहत नाही, तर पावलोपावली हा बदल तुम्हाला स्वीकारावा लागतो. एक मुलगी म्हणून समाजात कम्फर्ट झोन मिळायचा, तो पुढे मिळत नाही. सोपं नसतंच असं देह बदलून घेणं, पण करता येतं. समाजही स्वीकारतो हळूहळू असा माझा अनुभव आहे.’

नियमावलीच नाही मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी सांगतात, ‘आयुष्यभर घुसमट सहन करत राहण्यापेक्षा लिंगबदल करून घेण्याची चर्चा आताशा उघडपणे होताना दिसते. पण आपल्याकडे यासंदर्भात अजून निश्चित नियमावली उपलब्ध नाही. लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या व्यक्तीमध्ये स्त्री वा पुरुष होण्याची मानसिक तसेच शारीरिक ओढ किती हे पाहण्यासाठी वैद्यकीय जनुकीय पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. या चाचणीत तसा कल आढळला, तरच लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यात येते. मानसोपचारतज्ज्ञांनी निर्वाळा दिल्यानंतरच प्लॅस्टिक सर्जन, कॉस्टोलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्टकडून ही शस्त्रक्रिया केली जाते.’

मनीषकुमार गिरींचा नोकरीसाठी लढा मनीषकुमार गिरी सात वर्षांपूर्वी नौदलात रुजू झाले होते. गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये त्यांनी लिंगबदल करून स्त्रीत्व स्वीकारलं. पण पुढे तातडीने ‘आता तुमच्या सेवेची गरज नाही’ असं सांगून त्यांना नौदलातून काढून टाकण्यात आलं. आता आर्मी ट्रिब्युनलमध्ये ते दाद मागणार आहेत. तेथेही न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालय - सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत.

(लेखक मराठवाडा आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.gajanan.diwan@lokmat.com)  

संबंधित

कोल्हापूर : सीपीआरमध्ये थॅलेसेमियाची औषधे लवकरच उपलब्ध करु :सुधीर नणंदकर
तुम्ही एकटं जेवता का? असं करणं ठरू शकतं महागात!
तणावात असताना लोक 'या' शब्दांचा अधिक करतात वापर!
जगातील सर्वात विषारी झाडं; चुकूनही हात लागला तर मृत्यू अटळ!
ब्लॅक कॉफी घेता? वेळीच व्हा सावध; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

सखी कडून आणखी

शारकटरी या ताटभर मेजवानीचा एकदा अनुभव घेऊन पाहाच
कोण म्हणत सोनं फक्त बायकांनाच आवडतं ? सोन्याच्या मोहाची ही वैश्विक गोष्ट वाचाच!
ऑकलंडमधली मंगळागौर
जेष्ठा कनिष्ठा फरक नेमकं काय सांगू पाहतोय?
चटक मटकची भूक भागवणारे मुटके -सुशिला आणि कण्या!

आणखी वाचा