Tire toys! | टायरची खेळणी!
टायरची खेळणी!

 

 
तास न् तास ‘गेम’ खेळणार्‍या मुलांना रिचार्ज करणारी, त्यांची शारीरिक क्षमता वाढवणारी,
जुन्यातून नवं घडवणारी खेळणीही मुलांच्या आयुष्यात खूप धम्माल आणतात. 
आणि प्रदूषण? - छे!
 
मुलांनी काय खावं काय प्यावं याकडे जवळजवळ सर्वच आई-बाबा कटाक्षानं लक्ष  देतात. त्यांच्या शाळा, क्लासचा बारकाईनं विचार करतात. त्यांना हवं नको त्या सर्व गोष्टींची काळजी घेतात. पण खेळ हाही मुलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याकडे मोठे खूप काही लक्ष देतात असं म्हणता येत नाही. आणि म्हणूनच तासन्तास कॉम्प्युटरसमोर बसून हातात मोबाइल घेऊन खेळणारी मुलं आई-बाबांना खटकत नाहीत.   
मुलांचा विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी सकस आहाराबरोबरच त्यांच्या व्यायामाकडेही लक्ष द्यायला हवं. पण सध्या जिकडे बघावं तिकडे सिमेंटचं जंगल झाल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही. शहरांमध्ये बागा आहेत पण तिथली गर्दी, जागेची उपलब्धता यामुळे अंगमेहनतीच्या कसरती करता येत नाहीत. शाळांमध्येसुद्धा मैदानं नाहीत. या सगळ्या मुलांना त्यांच्या शारीरिक विकासाची संधी कशी मिळणार? हा विचार अस्वस्थ करणारा आहे. 
आमच्या सेंटरमधले सूर्यावरचे दिवे दुरुस्त करण्यासाठी आलेले योगेश कोडोलीकर आणि प्रेरणा गुप्ता यांनी यावर एक छान उपाय शोधून काढला आहे .  ‘इकोलॉजिक’ ही त्यांची  एक कल्पक संस्था आहे जी यासाठी काम करते आहे.   
मुलांना खेळातला आनंद मिळावा म्हणून अतिशय अभिनव पद्धतीची खेळणी इकोलॉजिकनं शोधून काढली आहे. 
जुने टायर्स वापरून तयार केलेली खेळणी मुलांची खेळण्याची हौस तर भागवतातच त्याशिवाय त्यांच्यातल्या क्षमता वाढवण्यासाठीही मदत करतात.  शाळेत उपलब्ध असलेल्या छोट्या जागेत खेळता येतील अशी खेळणी या संस्थेनं तयार केली आहेत. यामध्ये टायरचा अत्यंत सुरेख वापर करून मुलांना घसरगुंडी, उंच उड्या, उंचावर चढणे यासारख्या गोष्टी आपोआपच शिकता येतात.
जुन्या गाड्यांचे, ट्रक्सचे मोठे मोठे वाया गेलेले टायर एकमेकांवर ठेवून किंवा आडवे-उभे एकमेकांना बांधून तयार केलेली ही खेळणी आहे. 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही खेळणी टायर रिसायकल करून केलेली असल्यामुळे टायर जाळण्याला आणि त्यामुळे होऊ शकणार्‍या प्रदूषणाला आळा  बसतो व प्रदूषणाचा त्रास कमी होतो. व्यायामशाळेसाठी खूप महागडी साधनं विकत घेण्यापेक्षा हा किफायतशीर पर्याय शाळांनी स्वीकारायला हरकत नाही. शिवाय लहान वयापासून जीममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा अशा प्रकारचे व्यायाम मुलांना तंदुरुस्त बनवतात आणि आनंदीही.
टायरची ही खेळणी गरजू बायकांकडून बनवली जातात. त्यामुळे बायकांना रोजगाराचं साधनही उपलब्ध व्हायला मदत होते.
पर्यावरण वाचवण्याचे धडे आपण पुस्तकातून मुलांना देतो. पण अशा प्रकारची खेळणी मुलांसाठी उपलब्ध करून देऊन, वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरण वाचवण्याचा धडा आपण मुलांना कृतीतून देऊ शकतो. मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देणारी, त्यांच्या शारीरिक क्षमतांचा पुरेपूर वापर करणारी ही खेळणी मुलांना आवडली नाहीत तरच नवल.
 
तेर पॉलिसी सेंटर 

Web Title: Tire toys!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.