'Tiny Cutting PaperArt's Queen Mahalakshmi Wankhadekar | 'टायनी कटिंग पेपरआर्टस्'ची क्वीन महालक्ष्मी वानखेडेकर

मनोहर कुंभेजकर
मुंबई - लहानपणापासूनच उत्तम निरीक्षणशक्ती, सृजनशीलता, नवनवीन प्रयोग आपल्या कलाकृतीमध्ये उतरवण्याची उर्मी आणि निसर्गप्रेमी असलेली ' टायनी कटिंग पेपर आर्टस्'ची क्वीन कांदिवली(पूर्व)अशोक नगर मध्ये राहाणा-या महालक्ष्मी वानखडेकर यांच्यामध्ये एक कलाकार आणि शास्त्रज्ञ असा दुर्मिळ योग बघायला मिळतो. त्यांच्या या अद्वितीय आणि अंगभूत कलेमुळे त्यांनी या कलेतून साकारलेल्या हुबेहूब गरुडाच्या कलाकृतीमुळे त्यांचे नाव ' लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्येही नोंदवले गेले आहे.या त्यांच्या दुर्मिळ कले विषयी उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्याने त्यांनी लोकमतशी केलेली बातचीत

महालक्ष्मी यांना अतिशय नाविन्यपूर्ण अशी कला जोपासायची होती. त्या म्हणतात, "अती सुक्ष्म असा पेपर कापणे आणि त्याला टोकदार असा योग्य आकार आणत असताना,आणि हुबेहूब तो रंगवून त्यात जीवंतपणा आणतांना मला अतिशय आनंद व्हायचा. मग त्या कागदाला अति सूक्ष्म पद्धतीने कापून त्यातून छोट्या- छोट्या पक्षाचा शरीराचे बारकावे साकारणे फारच अवघड असायचे. त्यात प्रत्येक कागदाची किनार हि केसाच्या जाडीपेक्षाही बारीक आणि नाजूक असते. पेपर्सच्या कलाकृती साकारत असताना मी कधीही उगीच ओढूनताणून काम केले नाही. कागदाचा निसर्ग: एक आकार असतो, मला वाटत कि त्यामध्येही जीव आणि एकप्रकारची शक्ती असते जी माझ्या कलाकृतींतून मुहूर्त स्वरूपाने प्रकट होते.मी १ सेमी बाय १ इंच इतक्या लहान पेपर ७५ वेळा कापून त्यातून कलाकृती साकारली आहे."

टायनी कटिंग पेपर आर्ट्सद्वारे कागदाला कापून व नैसर्गिक आकार देऊन तो रंगवणे व त्यातून हुबेहूब पक्षी, पाने,फुलांचा आकार देऊन योग्य कलाकृती तयार करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो.कारण पक्षांची कलाकृती ही तयार करणे हे खूपच कठिण असते,कारण प्रत्येक पक्षांचे पंख हे वेगवेगळ्या रंगाचे असतात.

प्राणी तयार करण्यापेक्षा पक्षी तयार करणे खूपच कठीण असते. एका पक्षाचा अभ्यास करायला किमान १ महिना लागतो. त्या एका पक्षात १ हजार इमेजेस बघतात. तर टायनी कटिंग पेपर आर्टपासून एक पेन्टिंग तयार करायला त्यांना किमान १ महिना ते १ वर्षांचा कालावधी लागतो.या केले च्या माध्यमातून तयार केलेल्या कलाकृती जपून घरात ठेवायच्या आणि संसार सांभाळून साकार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवायला त्यांनी सुरवात केली.

महालक्ष्मी यांच्या वडिलांची इच्छा होती की,त्यांनी आयएएस अधिकारी व्हावे तर आईची इच्छा होती की तिने शिक्षिका व्हावे. खुद्द त्यांची इच्छा आर्टिस्ट आणि उद्योजिका होण्याची होती. मात्र आई-बाबांच्या आग्रहाला बळी न पडता त्यांनी लपवून जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेतला आणि डिप्लोमा मिळवला. घरून पाठिंबा नसल्याने त्यांनी पार्ट-टाईम नोकरी करत शिक्षण पूर्ण केले आणि बोरिवली मधील एका शाळेत आर्टस् शिक्षिका म्हणून नोकरी स्विकारली. शाळेत शिकवत असताना त्यांचे आर्टिस्ट होण्याचे स्वप्न आपल्या विद्यार्थांमध्येच पाहत होत्या. त्यातच लवकर लग्न झाल्याने आपले करिअर संपुष्टात आले कि काय अशी भीती मनात होतीच. त्यातच त्यांनी ग्रेड परीक्षेसाठीचा अभ्यास वर्गात घेतला. त्यांचे विद्यार्थी ८ वी ९ वी पर्यंत ग्रेड परीक्षांसाठी पूर्णपणे तयार झाली. त्यामुळे त्यांना शिक्षकी पेशाचे चीज झाल्यासारखे वाटले. 

 शास्त्र या विषयाची उपजतच आवड असल्याने त्यांनी टीचिंग एड ची सर्व बक्षीस पटकावली. मात्र नियतीने घाला घातलाच आणि अपघातामध्ये त्यांची नोकरी सोडावी लागली आणि त्यांनी मोठ्या जिद्दीने घराचं सराव केला.स्वतःमधले सुप्त गुण ओळखून त्यांनी शाळेत विश्वकोश वाचण्यास सुरवात केली.आयुर्वेदाचा अभ्यास करायलाही सुरवात केली. निसर्गाची मुळातच आवड त्यामुळे पण-फुलांत रमणा-या महालक्ष्मी यांनी कागदी पाने-फुले बनवण्यास श्रीगणेशा केला. एका साध्या पेपर पासून  टायनी कटिंग पेपर आर्ट्स मधून हुबेहुब व अप्रतिम कलाकृती सादर कारणा-या त्या देशातील पहिल्या महिला असाव्यात.  

त्या म्हणतात, " आज पर्यावरणाचा मोठा -हास होत आहे. पक्षांच्या जाती कमी होत आहेत. आजकाल चिमण्या तर दिसताच नाहीत,त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन पक्षीसुद्धा राहिले पाहिजेत यामुळे टायनी कटिंग पेपर आर्ट्सच्या माझ्या कलेद्वारे मला निरनिराळे दुर्मिळ पक्षी तयार करण्याचे जणू व्यसनच लागले आहे." महालक्ष्मी फ्लेमिंगो, बर्फातील रेड कार्डिनल पक्षांची जोडी, पेझंट पक्षी, पॅराडाइस पक्षी, हमिंग, किंगफिशर, हिमालयन मोनाल, ग्रे-पिकॉक, निकोबार पिजन, फ्रुट डव, सुगरण, मंडेरीयन बदक यासारखे दुर्मिळ पक्षी बनवण्यात त्या पारंगत आहेत.त्यांच्या कलाकृती नावाजलेल्या कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत. हि कला आपल्यापर्यंत मर्यादित न राहता याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्या कार्यशाळाही घेतात. आपल्या चित्रकार वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन आपल्यासारखेच अनेक कलाकार बनावेत असा त्यांचा मनोदय  आहे.

* सर्वात लहान कलाकृती ८ बाय १० सेमीची असून सर्वात मोठी कलाकृती ७० बाय १२० सेमीची आहे.  
* २००५ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्येही त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
* 2007 मध्ये चायना इंटरनॅशनल वर्ल्ड एक्स्पो मध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेली. ज्यासाठी एयर इंडियाने सहकार्य केलेले. 
* २०१६ मध्ये त्यांच्या कलेची दाखल घेत त्यांचे नाव ' लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ' मध्ये नोंदवण्यात आले होते. 
 


Web Title: 'Tiny Cutting PaperArt's Queen Mahalakshmi Wankhadekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.