- शुभा प्रभू-साटम

व्हॉटसअॅप आल्यापासून ‘लाइफ गुरू’ची गरजच भासेनासी झालीये. अपचनापासून ते अहंकारापर्यंत अनेक दुर्गुणांशी कसं लढावं? मालवेअर (नवा व्हायरस) ते एथनिक वेअर कस हाताळावं? यासारखी सगळी माहिती फटाफट मिळते. असो...
या धबाधबा आदळणाऱ्या अनेक मेसेजना आपण न वाचता उडवतो वा धाडकन पुढे पाठवतो. माझाही अपवाद नाही याला. असाच एकदा उडवण्याच्या टप्प्यातला एक मेसेज वाचला. इंग्रजीत होता तो. साधारण भाषांतर असं..
‘जेव्हा आपल्याला वाटतं की यापेक्षा आणखी वाईट काही होणारच नाही खरंतर तेव्हाच परिस्थिती पालटण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.’ वर वर अगदी साध्या वाटणाऱ्या या वाक्यात फार मोठा अर्थ दडलाय. आपण सर्वसामान्य लोक बरेचसे पापभिरू पण कधीतरी सिग्नल उडवून पळणारे वा क्वचित टोल न देणारे असतो. यापेक्षा फार काही वाईट सहसा आपण करत-वागत नाही. किंबहुना आपल्याकडून होत नाही, घडत नाही. 
वेळच्या वेळी टॅक्स भरणं, कायदे पाळणं, बिलं ड्यू डेटच्या आधी भरणं, अगदी लायब्ररीतले पुस्तकही परत करणं, जमेल तशी मदत करणं, कुठल्या तरी सामाजिक संस्थेला देणगी देणं, मतदान करणं अशी सर्व कर्तव्यं वेळच्या वेळी पार पाडत असतो. पण होतं काय की मनासारखं घडत नाही. 
अनेक गोष्टी असू शकतात यामागे. हुकलेल्या प्रमोशनपासून ते कोसळलेल्या शेअरपर्यंत, आजारपणापासून ते आर्थिक विवंचनेपर्यंत कौटुंबिक कलह, क्लेश बरंच काही असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सल असतोच असतो आणि परिस्थिती ढासळायला लागते. ‘बद से बदतर’ होत जातं जीवन. पण आपण तरीही खिंड लढवत असतो.. जमेल तशी आव्हानं झेलत असतो. 
पण वाटतंच की ‘झालं संपलं सगळं यापेक्षा वाईट काही होणारच नाही. शेवट झाला सगळा’. पण विश्वास ठेवा खरंतर तेव्हाच परिस्थिती सुधारायला लागते. आश्चर्य किंवा नवलकथा नाही. खरंच आहे. हे असं जेव्हा अगदी विनाशाचं, संकटाचं शेवटचं टोक येतं तेव्हा कुठेतरी बदल घडायला लागलेला असतो. फक्त आपल्याला तो बदल कळून घ्यावा लागणं गरजेचं आहे.
उदाहरण देते. परिचयाचे एक गृहस्थ. अपघातात कर्ता मुलगा कुटुंबासह गेला. त्याआधी पत्नीचं असाध्य आजारानं निधन झालं होतं. त्याच अपघातात बाकी कुटुंबीयही होते. तेही गेले. थोडक्यात, जवळचं कोणीही नाही. दु:खानं, शोकानं उन्मळून न गेले तरच नवल. ते स्नेहीसुद्धा तसेच होते. त्यांनी जिवाचं काही बरं वाईट करू नये याकरिता बाकीच्यांनी नकळत पहारा ठेवला. काही दिवसांनी ते स्नेही म्हणाले की, ‘मी काहीही वेडाचार करणार नाही. कारण आता आणखी दु:ख ते काय असेल? अत्युच्च परिसीमा गाठलीय दुखानं. निदान यापुढे तरी त्यापेक्षा अधिक दु:ख मिळणं शक्य नाही!’
मला सांगायचं हेच की आयुष्याकडे पाहायची नजर त्यांनी बदलली. त्या दु:खातही त्यांनी काहीतरी सकारात्मक पाहिलं. हेच ते टिपण्याची गरज आहे. 
रसातळाला पोहचल्यावर त्यापेक्षा आणखी खाली जाणं शक्य नसतं. मग आपसूकच वरचा प्रवास सुरू होतो. हवी ती फक्त तेवढी दृष्टी आणि सजगता. कुठलंही दु:ख, वेदना, यातना, संकटं कायम राहत नाहीत. आपण जसं जमेल तसं त्याच्याशी सामना करायचं, स्वत:ला थांबवायचं नाही. प्रयत्न चालू ठेवायचे. चुकांपासून शिकायचं. नवे धडे गिरवायचे. 

जादूची कांडी फिरणार नाही पण हळूहळू का होईना परिस्थिती बदलायला लागेल. आपण फक्त एक करायचं, उठताना एक म्हणायचं आजचा दिवस मी पूर्ण प्रयत्न करणार. आणि तसं करायचं. असं म्हणतातच की, बचेंगे तो और भी लढेंगे !