ठळक मुद्देमहिला दिनानिमित्तानं आपल्या आयुष्यातील खास महिलांना काय गिफ्ट देता येईल, या विचारात सध्या तुम्ही मग्न असाल. केवळ महिला दिन म्हणून तुम्ही तिला एखादं गिफ्ट, सरप्राईज देणं फक्त एका दिवसापुरते मर्यादित का? तिला सुखी, समाधानी, आनंदी पाहायचं असेल तर नेहमीपेक्षा निराळं आणि भन्नाट काही तरी करा.

मुंबई : 8 मार्च, जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्तानं आपल्या आयुष्यातील खास महिलांना काय गिफ्ट देता येईल, या विचारात सध्या तुम्ही मग्न असाल. केवळ महिला दिन म्हणून तुम्ही तिला एखादं गिफ्ट, सरप्राईज द्याल. पण हे सर्व काही फक्त एका दिवसापुरते मर्यादित का? तिला सुखी, समाधानी, आनंदी पाहायचं असेल तर नेहमीपेक्षा निराळं आणि भन्नाट काही तरी करा. आता निराळं व भन्नाट म्हणजे नेमके काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी तुम्हाला अधिक असे काही कष्ट करावे लागणार नाहीत. केवळ या 5 गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी तुमच्या आयुष्यातील खास असलेल्या 'ती'ला स्पेशलवालं फीलिंग येईल, यात काही वाद नाही.

1. तिला पुरेसा वेळ द्या 

कुणी आपल्या महत्त्व देतंय ही भावनाच एखाद्या स्त्रीला सुखावणारी असते. आपल्याला कुणीतरी प्राधान्य देतंय व क्वॉलिटी टाईम देतंय, हे पाहून कोणत्याही स्त्री जो आनंद होतो तो ती शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पुष्कळदा काय होतं, पुरूष एखाद्या स्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यापूर्वी तिला बराच वेळ देतात. पण एकदा का नातेसंबंध निर्माण झाले की एकेकाळी मिळणार भरपूर वेळ अचानक कुठेतरी नाहीसा होता. पण ही वृत्ती टाळा. ज्याप्रमाणे तुम्ही आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी वेळ काढता त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यातील खास 'ती'च्याही वेळ नक्की काढावा. तिला बाहेर फिरायला न्यावं, फिरणं शक्य नसल्यास घरातल्या घरातच एखादी डेट प्लान करावी. मस्तपैकी वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन तिच्यासोबत खूप बोला. तिला पुरेसा वेळ दिल्यानंतर ती नक्कीच खूश होईल. पण तिला दिलेल्या वेळेत दुसरी कोणतीही गोष्ट करणं किंवा आणणं कटाक्षानं टाळावं.

2. तिच्याप्रती कृतज्ञता आणि आदर दाखवणे 

कुटुंबातील प्रत्येक जण आनंदीत राहावा, यासाठी 'ती' अतोनात कष्ट करत असते. प्रत्येकाच्या छोट्या-मोठ्या आवडीनिवडी जपण्याचा 'ती' प्रयत्न करत असते. तुमच्यादेखील कुटुंबात अशी 'ती' असणारच. हो ना. पण अनेकदा तिची मेहनत, तिचं काम, तिच्या प्रत्येक गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. याबाबत ती कधीही तुमच्याकडे तक्रार करणार नाही. या मोबदल्यात तिला केवळ प्रेमाचे काही शब्द, सुखावणा-या काही गोष्टी, ती जे काही करतेय त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे, या साध्या साध्या गोष्टीदेखील तिच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा असतात. कारण कुटुंबातील प्रत्येकामध्ये तिचा जीव असतो, तेच तिचं विश्व असतं. यामुळे तिला खूश करण्यासाठी एखाद वेळेस मोठमोठे सरप्राईज किंवा गिफ्ट दिले नाहीत तरी चालेल पण ती जे काही तुमच्यासाठी करतेय, त्यासाठी एक थँक यू, एक जादू की झप्पी तो बनती हे ना बॉस.  

3. ती आहे तसा तिचा स्वीकार करा  

तुम्ही रागीट, चिडचिडे तापट किंवा अगदीच शांत आहात, या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी अगदी नगण्य असतात. तुम्ही आहात तसे तुमचा स्वीकार करते. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात ती तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट करताना ती स्वतःला झोकून देते. हे सर्व काही करत असताना ती स्वतःचं मन, भावना, मूड यांना कुठेही प्राधान्य देत नाही. पण कधी-न्-कधी तरी या सर्वाचा उद्रेक होतो. आपल्या भावनांकडे दुर्लक्ष होत आहे, आपल्याकडे कुणी लक्ष देत नाहीये, या व यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तिला त्रास होऊ लागतो. परिणामी चिडचिड होते, काही जणी अबोला धरतात. अशा वेळेस तुझ्या या सवयी बदल असे सांगत तिच्या मागे वारंवार भूणभूण लावण्याऐवजी तिच्या वागण्यामागील नेमकं कारण काय आहे, हे जाणून घ्या. तिचा आधार व्हा. ती आहे तसा तिचा स्वीकार करा. तिच्या भावना जपायला शिका. एखाद बदल जर चांगल्या गोष्टीसाठी असेल तर ती गोष्टी नक्कीच समजून घेईल. पण कारण नसतानाही तिला जवळील एखादी व्यक्ती स्वतःमध्ये बदल करण्यास सांगते, तेव्हा ही गोष्ट तिच्यासाठी त्रासदायक असते. आपल्या काही तरी उणीवा आहेत, असा विचार तिच्या डोक्यात वारंवार येऊ लागते. यामुळे ती स्वतःलाच कमी लेखू लागते. नकारात्मक विचारांमुळे ती खचून जाण्याची शक्यता अधिक आहे. असे होऊ नये यासाठी ‘तू जशी आहेस तशी मला आवडतेस’, असं एकदा तर तिला सांगा आणि मग तिच्या चेहऱ्यावरील येणार आनंद नक्की पाहा.

4. तिला साथ द्या, मात्र तिच्या कुबड्या बनू नका

तिची साथ देणं म्हणजे ती जशी आहे आणि ज्या परिस्थितीत आहे तसं तिला स्वीकारणं. ती स्वत:ला घडवण्याच्या प्रक्रियेत असते, स्वत:ला उत्तम बनवू पाहते, तेव्हा तिला साथ द्यावी, तिला पाठिंबा द्यावा. मात्र ती कायम तुमच्या अवलंबून राहील असे वागू नये. आत्मनिर्भर बनवण्यात तिला मदत करा, प्रोत्साहन द्या. तिला प्रत्येक चांगल्यावाईट गोष्टींचा अनुभव घेऊ द्या.  

5. तिला व्यक्त होऊ द्या  

पुरूषांच्या तुलनेत अर्थात निसर्गत: स्त्रियांना बोलायला फार आवडतं. मात्र तिचं म्हणणं ऐकणारे फारच कमी असतात. प्रत्येकीचा स्वभाव निराळा असतो, व्यक्त होण्याच्या सवयी निराळ्या असतात. काहीजणी प्रचंड बडबड करणा-या असतात, मात्र काहींना व्यक्तदेखील होत नाहीत. त्यामुळे जेव्हा केव्हा ती आपल्या भावना व्यक्त करत असेल तेव्हा तिला ऐका, मधे कुठेही थांबवू नका. तिला बोलून मोकळं होऊ द्या.

किमान या गोष्टी जरी केल्यात तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील 'ती' प्रचंड खूश होईल. तिला कायम आनंदी पाहण्यासाठी हे नक्की करा. मग ती आई, बहीण, बायको असो किंवा मुलगी. कुटुंबातील 'ती'चा आनंद नक्कीच जपण्याचा प्रयत्न करा.


Web Title: These '5' things keep women happy and satisfied forever
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.