Talk about health! | आरोग्याचं बोला!

- मुक्ता गुंडी
मराठी काव्यांमध्ये स्त्रीला नववसनधारिणी, अलंकार -धारिणी असं संबोधलं गेलं आहे. स्त्रीमधील विविध शारीरिक बदलांना पृथ्वीच्या सर्जनशीलतेची रूपकंही दिलेली मराठी साहित्यात आढळून येतात. भारतात कित्येक ठिकाणी स्त्रीच्या प्रजननक्षमतेला वंदनीय मानून तिच्या सर्जनशीलतेला देवींचं रूप दिलेलं आढळतं. आपला समाज आजही स्त्रीच्या वस्रांना, बाह्यरूपाला, अलंकारांना, तिच्या प्रजननक्षमतेला महत्त्व देताना दिसतो; परंतु सर्वात मोठी वानवा दिसते ती समाजात आणि साहित्यात स्त्री-आरोग्याचा व्यापक विचार मांडण्याची. गरज आहे ती स्त्री ही केवळ अलंकारधारिणी, नववसनधारिणीच न राहता ‘आरोग्यधारिणी’ होण्याची ! केवळ मातृत्वाशी संबंधित आरोग्याचा विचार न मांडता स्त्रीच्या आरोग्याचा सर्वसमावेशक आणि परिपूर्ण विचार होणं गरजेचं आहे, असा महत्त्वाचा विचार डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग हे १९८९ पासून मांडत आहेत.

एक अतिशय सहज पडू शकणारा प्रश्न असा की, ‘स्त्रियांच्याच आरोग्याचा का बरं वेगळा विचार करायचा? आजकाल स्त्रियांना आणि पुरुषांना दोहोंना मधुमेह होतो, गुडघ्याचे विकार जडतात, हृदयविकाराचा त्रास होतो. मग स्त्रियांच्या आरोग्याला असं वेगळं महत्त्व का द्यायचं?’ मनाला सहज पटून जाईल असा हा युक्तिवाद ! परंतु प्रथम हे समजून घ्यायला हवं की स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करणं ही काही त्यांना दिलेली ‘खास वागणूक’ नव्हे तर गरजेपायी धुंडाळावी लागणारी बिकट वाट आहे !

स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करताना बहुतांश समाजांमध्ये स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, अपुरा आहार, अपुºया आरोग्यसेवा, घरगुती हिंसाचाराचा अनुभव किंवा भीती, पाळीसारख्या अनुभवातून जाताना त्याविषयी मिळणारं अपुरं ज्ञान, वाट्याला येणारे निर्बंध, त्यांच्या शरीरयष्टीविषयी कुटुंबाकडून, समाजाकडून असणाºया अवास्तव अपेक्षा आणि सौंदर्याच्या अनैसर्गिक कल्पनांचा त्यांच्यावर केला जाणारा भडीमार. या आणि अशा अनेक घटकांना विसरून चालणार नाही. मुळात आरोग्याचा विचार करताना ‘असमानता’ हा महत्त्वाचा निर्देशांक बाजूला ठेवला जाऊ शकत नाही. किंबहुना, अनेक बाबतीत स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुय्यम वागणूक ही त्यांच्या आरोग्यनिर्देशांकाच्या मुळाशीच बसलेली असते.

याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतातील माता मृत्युदर. मातृत्वाला अनन्यसाधारण महत्त्व देणाºया आपल्या देशात आजही जन्माला येणा-या दर एक लक्ष बालकांमागे सुमारे १७० माता जीव गमावतात (आसाम, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये हे प्रमाण याहूनही जास्त आहे), ते कशामुळे? लहान वयापासून शरीराला अपुºया प्रमाणात मिळणारं लोह, पाळीच्या विकारांकडे कौटुंबिक अथवा सामाजिक बंधनांपायी केलं गेलेलं दुर्लक्ष, गरोदरपणात करावी लागणारी अतीव कष्टाची कामं आणि प्रसूतीच्या काळात उपलब्ध असलेल्या तोकड्या आपत्कालीन सोयीसुविधा या सर्वांचा घातक परिपाक म्हणजे हा निर्देशांक आहे. म्हणजेच स्त्रीच्या बालवयापासून तिच्या वाट्याला येणारे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक अनुभव तिच्या आरोग्यावर आपले जणू ठसे उमटवीत जातात.
पुरुष आणि स्त्रियांचे आयुर्मान वाढत आहे; परंतु आयुष्याची प्रत सर्व बाबतीत सुधारते आहे का? ती स्त्रियांबाबत नेमकी किती सुधारते आहे किंवा नाही? वर्षाकाठी उदयाला येणारे नवनवीन आणि अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे आजार आणि समाजात दबून राहिलेल्या अन्याय्य रूढी-परंपरा यांचा स्त्रियांच्या आरोग्यावर होणारा विशिष्ट प्रभाव कोणता? भारतात आढळून येणा-या प्रत्येक रोगासाठीची स्त्री-पुरुष यांची लिंग-विशिष्ट आकडेवारी काय सूचित करते? गृहिणी, घरबसल्या व्यवसाय करणाºया स्त्रिया, कष्टकरी स्त्रिया, कार्पोरेट जगतातल्या स्त्रिया यांना अनुभवास येणारी असमानता मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम करते? अन्नाच्या किमतीत होणारी वाढ गरीब घरातल्या स्त्रियांच्या ताटातले किती घास हिरावून घेते? आरोग्याची धोरणं आखताना सर्व आर्थिक स्तरातील, सर्व जाती-धर्मातील स्त्रियांच्या आरोग्याच्या गरजांचा विचार होत आहे का? या धोरणांबाबत स्त्रियांना नेमकं काय वाटतं? स्वत:च्या आरोग्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता स्त्रियांमध्ये रुजली आहे का? व्यायाम करण्यायोग्य किती जागा शहरी भागातील स्त्रियांकरिता उपलब्ध आहेत?
..असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत. येणाºया काळात एकेका प्रश्नाची उकल करण्याचं आव्हान आपण पेलले नाही तर देशाच्या सुमारे ५० टक्के लोकसंख्येच्या आरोग्याकडे आपण पुरेसे गांभीर्याने पाहात नाही, हे जणू सिद्ध होईल.
हे सर्व प्रश्न गंभीर आहेत, हे खरं ! पण काळ्या ढगाला कुठेतरी चंदेरी किनार सापडते, हेही तितकंच खरं. आपल्या देशात, तसेच इतर देशांमध्येही स्त्रियांच्या आरोग्य प्रश्नांवर अथकपणे काम चालू आहे. कुठे पाळीसंबंधी विवेकी आरोग्यसंवाद राबवला जात आहे, तर कुठे नवजात बालकांच्या आरोग्यासाठी ‘कांगारू पद्धत’ राबवली जात आहे, स्तनाच्या कर्करोगासंदर्भात कुठे परिपूर्ण विचार केला जात आहे तर ‘बॉडी शेमिंग’चा (शरीराच्या धाटणीवरून चिडवणं) स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात विचार केला जात आहे.
येत्या वर्षात आपण स्त्रियांच्या आरोग्याच्या अशा विविध पैलूंकडे पाहू. प्रश्न समजून घेता घेता जिथे उत्तम कल्पना राबवल्या जात आहेत, त्यांचाही कानोसा घेऊ.
स्त्रियांच्या आरोग्याविषयी चर्चा करताना तिच्या प्रजनन-आरोग्याबरोबरच इतरही बाबींचा विचार करू. स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करताना ‘रोगा’पलीकडे आणि औषधाहून अधिक विचार केला तरच संपूर्ण समाजाचं आरोग्य उत्तम राहू शकेल !


(लेखिका सार्वजनिक आरोग्य विषयाच्या अभ्यासक आहेत mukta.gundi@gmail.com)