चमचाभर मेथी आहे प्रचंड गुणकारी

By ऑनलाइन लोकमत on Tue, December 05, 2017 10:53am

केस गळतात. राठ होतात. त्यावर महागडे शॅम्पू लावताय? त्यापेक्षा घरच्या घरी मेथीचे उपचार करुन पहा..

-माधुरी पेठकर थंडीत हमखास आठवतात ते मेथीचे लाडू. कडूपणा मान्य करूनही हे लाडू आवडीनं आणि आवर्जून खाल्ले जातात. पण मेथीचा उपयोग फक्त लाडवापुरताच मर्यादित नाही. मेथी शरीरास जेवढी फायदेशीर तितकीच सौंदर्योपचारातही परिणामकारक ठरते. केसांच्या अनेक समस्यांवरचा प्रभावशाली उपाय म्हणून मेथी वापरता येते.

वेगवेगळ्या कारणांमुळे केस पातळ होणं, कोरडे होणं, कोंडा होणं यांसारख्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांचे उपाय मेथी दाण्यात आहेत. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केस नैसर्गिकपणे सुंदर करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो. त्यात फोलिक अ‍ॅसिड, अ, के आणि क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशिअम, कॅल्शियम, लोह यासारखी खनिजंही मेथी दाण्यात मोठ्या प्रमाणात आढळतात.

या गुणांमुळेच मेथी जर केसांसाठी वापरली तर केसांचा कोरडेपणा, कोंडा यासारख्या समस्या सुटतात. मेथी दाण्यांत मोठ्या प्रमाणात लेसिथिन नावाचा घटक असतो ज्यामुळे केस कोरडे होत नाही. केसांची मुळं मेथ्यांमुळे पक्की होतात. याशिवाय प्रोटिन, निकोटिनिक अ‍ॅसिड असतं याचा उपयोग केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. मेथीत उष्ण गुणधर्माच्या असतात. ही उष्णता कमी करून केसांसाठी त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवाव्यात. यामुळे त्यातील उष्णता कमी होते. केसांच्या आरोग्यास पूरक असे अ‍ॅण्टिआॅक्सिडण्ट्स त्यामुळे मिळतात. केस गळती थांबविण्यासाठी केस गळतीवर उपाय म्हणून मेथीचा लेप लावावा. यासाठी दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घालावे. नंतर सकाळी वाटून घ्याव्यात. ही पेस्ट केसांचं लावावी. वीस मिनिटं ती केसांवर राहू द्यावी. केस धुण्याआधी हलक्या हातानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. आणि सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. जर केसात कोंडा असेल तर या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा. या पेस्टमुळे कोंडा जातो. केस मऊ हवे असतील तर या पेस्टमध्ये १ चमचा नारळाचं दूध घालावं. काळ्याभोर आणि मऊसूत केसांसाठी दोन चमचे मेथी मिक्सरमध्ये वाटाव्यात. मेथ्यांच्या पूडमध्ये एक चमचा खोबरेल तेल किंवा आॅलिव्ह तेल घालावं. ती पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी. नंतर ती केसांना लावावी. दहा मिनिटं ती केसांवर तशीच राहू द्यावी. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. हा उपचार नियमित केल्यास केस उत्तम राहातात. घरच्याघरी सहज करुन पहावेत असे हे सोपे उपाय आहेत. केसांना पोषक आणि उत्तमही.

 

संबंधित

रुग्णालयातील आयुष विभाग पोरका
विजेअभावी आरोग्य सेवा कोलमडली
आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीने सेवा द्या
वॉरेन बफेंच्या नव्या कंपनीचे सीईओ डॉ. अतुल गावंडे आहेत तरी कोण?
धक्कादायक ! दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने महिलेचा मृत्यू 

सखी कडून आणखी

वयात येणा-या मुलीशी मैत्री करण्याचा सोपा मार्ग
‘गव्हाचा खीच’ नाश्त्याचा एक पौष्टिक प्रकार
उरलेल्या भाताचा चटपटीत प्रकार
आयर्लण्डमधल्या एका चळवळीची गोष्टाण्डमधल्या एका चळवळीची गोष्ट
बांग्लादेश महिला क्रिकेट संघाला टी ट्वेण्टी चॅम्पिअन बनवणार्‍या दोन मुंबईकर मुली

आणखी वाचा