Strong and charming tile, easy to decorate a house with a pleasant and pleasant formula | मजबूत आणि मोहक फरशी, मनासारखं घर सजवण्याचं सोपं आणि प्रसन्न सूत्र
मजबूत आणि मोहक फरशी, मनासारखं घर सजवण्याचं सोपं आणि प्रसन्न सूत्र


- स्नेहल जोशी

जमिनीचा स्पर्श झाल्याशिवाय पायांना आपली पावलं जाणवत नाहीत. जमिनीशी आपलं पहिलं नातं जोडतात ते आपले तळवे. कशी गंमत आहे बघा, ठेच लागेपर्यंत आपल्याला ना जमीन जाणवते ना तळवे. नित्य परिपाठात ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याची, केसांची, खाण्यापिण्याची खूप काळजी घेतो पण आपल्याला पूर्ण वेळ पेलणाºया पावलांकडे मात्र क्वचितच लक्ष देतो; त्याचप्रमाणे घराचा, घराच्या रचनेचा, सौंदर्याचा, सजावटीचा विचार करताना सगळ्यात गृहीत धरलेला आणि त्यामुळे दुर्लक्षित राहिलेला मूलभूत घटक म्हणजे भूतल किंवा जमीन. खरं तर घराची एकंदरच बांधणी, आपला संपूर्ण वावर आणि त्याचा अनुभव या जमिनीवर अवलंबून असतो.
‘आम्ही नवीन पद्धतीची, झाडायला-पुसायला सोपी म्हणून ही गुळगुळीत टाइल बसवली खरी; पण आमची सोनू सारखी पडते!’,
‘दिवसातून दोनदा झाडलं तरी फरशी काही स्वच्छ दिसत नाही बुवा!’,
‘परवा मी जरा दिवाण हलवला आणि केवढा कचरा उमटला!’
- अशा तक्रारींच्या खेरीज जमिनीचा उल्लेख आपल्या बोलण्यात फारसा येत नाही. पण यातूनच जमिनीची बांधणी, तिचा रंग-पोत किती महत्त्वाचा असतो हे नक्कीच अधोरेखित होतं.
जमीन मुख्यत: घराचा, भिंतींचा आणि त्यातल्या स्थिर-अस्थिर वस्तूंचा भार पेलत असते. त्यामुळे तिची मजबूती, सपाटी (फ्लॅटनेस) आणि क्षितिजा (होरिझॉनटॅलिटी) या तीनही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. घरात फरशी बसवण्याआधी, जमीन तयार करताना तिच्या सपाटी, पातळी आणि मजबुतीसाठी केलेला भराव घट्ट असणं गरजेचं आहे. भराव सैल झाला तर जमिनीची भार पेलण्याची क्षमता कमी होते आणि ती लवकर धासू शकते. त्याच वेळेला तिची क्षितिजा/समतलता सांभाळणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण घरातल्या सगळ्याच वस्तूंची सापेक्ष पातळी जमिनीच्या समतलतेवर अवलंबून असते. जमिनीचा आपल्याशी संपर्कात येणारा पृष्ठभाग म्हणजे लादी किंवा फरशी. ही बसवण्याआधी जमिनीच्या बांधणीकडे कटाक्षानं लक्ष देणं जरूरीचं आहे.
लादी जमिनीचा दृश्य आणि स्पर्शानुभव आपल्याला देते. भिंतींप्रमाणेच जमीनही प्रकाश परावर्तित करते. खोलीचं आकारमान कमी-अधिक जाणवण्यामध्ये, त्यावरचं फर्निचर उठून दिसण्यामध्ये लादीच्याही रंगाचा मोठा वाटा आहे. पण भिंतीच्या अपेक्षेत लादीची घनता अधिक असल्यानं पोत जास्त गुळगुळीत असतो. त्यामुळे लादीवरून परावर्तित आणि प्रतिबिंबित होणारा प्रकाश जास्त प्रखर जाणवतो. जी गोष्ट प्रकाशाची तीच आवाजाची. घरातले सगळेच पृष्ठभाग आवाजाचं परावर्तन किंवा शोषण करत असतात, त्यात लादीचा बराच मोठा हिस्सा आहे. तेव्हा ती निवडताना बारकाईनं विचार करायला हवा. लादीचेही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. कडप्पा, शाहबाद, कोटा, संगमरवर (मार्बल) यासारखे दगड; स्पारटेक्स किंवा विट्रीफाइड सिरॅमिक टाइल; लाकडी पट्ट्या (पॅरक्वेट फ्लोरिंग) असे अनेक प्रकार फ्लोरिंगसाठी वापरले जातात. यातला प्रत्येक प्रकारचा दृश्य आणि स्पर्शानुभव अगदी निराळा आहे.
नैसर्गिक साधनसामग्रीत जिवंतपणा असतो आणि म्हणून त्या जास्त जवळच्या वाटतात. आपल्या वापरानुसार त्या घडत जातात. दगडी फरशीचं रूप हे वापरून वापरून खुलायला लागतं. जिथे वावर जास्त तिथे ती अधिक चमकदार होते आणि त्यातले रंगही खुलून येतात. उन्हाळ्यात दगडी फरशी घरात छान थंडावा आणते. थंडीमध्ये मात्र त्यावर एखादा गालिचा हवासा वाटतो. दगडातही बरेच रंग असतात. काही मातीच्या जवळचे करडे, विटकरी, खाकी तर काही शुभ्र पांढरे, गडद पिवळे. संगमरवर वगळता सगळे दगड फार प्रकाश परावर्तित करत नाहीत, त्यामुळे शक्यतो मोठ्या खोल्यांमध्ये दगडी लादी जास्त प्रशस्त दिसते. पांढरा संगमरवर खूप मोहक पर्याय आहे - दिसायला स्वच्छ आणि हलकीशी चमक असलेला; पण बाकी दगडांपेक्षा सच्छिद्र असल्याने डाग पटकन पकडतो. एखाद्या खोलीत खूप कमी आणि काळजीपूर्वक वावर असेल तर तिथे संगमरवर उत्तम. अर्थात आभासी संगमरवरासारख्या दिसणाºया सिरॅमिक किंवा विट्रीफाइड टाइल हा पर्याय आहेच. सिरॅमिक टाइल्समध्ये रंग, छटा, नक्षी, आकार, पोत या सगळ्यांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. खोलीच्या वापरानुसार रंग-पोत निवडता येतो. सामान्यत: खोल्यांमध्ये फिक्या रंगाची छटा चांगली दिसते किंवा मूळ रंग पांढरा असलेली त्यावर हलक्या रेषा/नक्षी असलेली मऊ स्पर्शाची फरशीदेखील सुखद वाटते. लाकडी फरशीची (पॅराक्वेट फ्लोरिंग) तर मजाच निराळी. पारंपरिक धाटणीच्या घरात तर ही खुलतेच पण स्वच्छ पांढºया भिंतींच्या पाश्चात्य घरालाही छान उबदार रूप देऊ शकते. गच्ची, वरांडा किंवा बाल्कनी यासारख्या खुल्या/ अर्धखुल्या जागांचा विचार करताना तिथे येणारे ऊन, वारा, धूळ आणि पाणी गृहीत धरायला हवं. अशा वेळेला गडद रंगाची फरशी धुळीची जाणीव होऊ देत नाही. तसंच तिचा पोत न घसरणारा (अ‍ॅण्टिस्किड) असावा.
आता प्रश्न उरतो लादीच्या स्वच्छतेचा! सिरॅमिक टाइलचा नंबर पहिला - ही लादी पाण्यानं धुता-पुसता येते. डाग पडल्यास थोडं साबण, अ‍ॅसिड सहन करू शकते. त्याखालोखाल दगड - सर्वात भक्कम आणि टिकाऊ पर्याय, पाण्यानं पुसता येतो, हळदी-तेलाचा फारसा प्रतिकार करू शकत नाही आणि साबण-अ‍ॅसिडही सहन करू शकत नाही. आणि सर्वात शेवटी लाकूड याचा स्पर्श पायाला सर्वात आल्हाददायी आहे. कुठल्याही ॠतूमध्ये याचं तपमान सुखकर असतं. पण या फरशीला मजबूतपणा द्यायला भक्कम पाया असावा लागतो. लाकडावर फार डाग दिसत नाहीत; पण पुसताना फार पाणी वापरता येत नाही.
सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपली जमीन स्वस्थ असेल तर स्वप्नातला इमला उंच होऊ शकतो!

(लेखिका आर्किटेक्ट आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)
 


Web Title: Strong and charming tile, easy to decorate a house with a pleasant and pleasant formula
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.