स्पॉटलाइट : चित्रपट, वास्तव जसं आहे तसं मांडण्यासाठीचं साधन

By ऑनलाइन लोकमत on Tue, December 05, 2017 11:05am

सत्य शोधण्यासाठी माध्यमं किती महत्त्वाची असतात. वास्तव जसं आहे तसं मांडण्यासाठी सिनेमादेखील किती मोठं साधन ठरू शकतो हे सांगणारा एक चित्रपट.

- माधवी वागेश्वरी

'शहराची भरभराट तेव्हाच होऊ शकते जेव्हा सगळ्या सामाजिक संस्था एकत्र काम करतील.’ सगळ्यांच्या आदराला पात्र असलेले कार्डिनल. ते चेह-यावर समजूतदार भाव आणून हे बोस्टन शहराच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध वृत्तपत्राच्या संपादकाला हे सांगत असतात. त्यावर चेह-यावरची रेषदेखील हलू न देता संपादक म्हणतो, ‘वृत्तपत्रानं एकटंच असलं पाहिजे तेव्हाच लिहिलेल्या आशयाला न्याय मिळू शकेल.’

लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ समजल्या जाणा-या माध्यमाची भूमिका समाजातील सत्य शोधण्यासाठी किती महत्त्वाची असते हे आजच्या अशांततेच्या, असुरक्षिततेच्या काळात किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारा खूपच महत्त्वाचा सिनेमा म्हणजे ‘स्पॉटलाइट’. ‘स्पॉटलाइट’ ही २०१५ ची अमेरिकन बायोग्राफिकल क्राइम ड्रामा फिल्म आहे. टॉम मॅकार्थी हे या फिल्मचे दिग्दर्शक आहेत. ‘द बोस्टन ग्लोब’ या वृत्तपत्राच्या ‘स्पॉटलाइट’च्या शोधपत्रकारिता करणाºया टीमची गोष्ट या सिनेमात दाखवलेली आहे. बोस्टन भागात केलेले बाललैंगिक शोषण याविषयी जी शोधपत्रकारिता केली गेली ज्यासाठी ‘द ग्लोब’ला २००३ सालचे पब्लिक सर्व्हिस या क्षेत्रातील पुलित्झर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं त्याची गोष्ट या सिनेमात सांगितलेली आहे. या सिनेमात मार्क रफेलो, मायकल केटॉन, रीचेल मॅकड्मस, लाऐव्हे श्रायबर यांनी अप्रतिम काम केलं आहे. सिनेमाची गोष्ट सुरू होते १९७६ साली. कॅथलिक प्रिस्ट जॉन गेयागन याला बालकांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झालेली असते आणि त्यावर पोलीस स्टेशनमध्ये बोलणं सुरू असतं. ज्यात मुख्यत्वे या सगळ्या प्रकारणापासून मीडियाला दूर ठेवा असं निक्षून सांगितलं जातं. २००१ साल दाखवलं जातं. ‘द बोस्टन ग्लोब’मध्ये मार्टी बेरॉन या ज्यू असलेल्या व्यक्तीची संपादक म्हणून नियुक्ती केली जाते. तो पहिल्याच दिवशी स्पॉटलाइट टीमच्या मुख्य संपादक असलेल्या वॉल्टर रॉबिन्सन उर्फ रॉबीला भेटतो. वकील मिशेल गार्बेडीयन विषयीचा लेख मार्टी बेरॉननं ग्लोबमध्ये वाचलेला असतो. कार्डिनल बर्नार्ड लॉला जॉन गेयागन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करतो आहे हे माहीत असूनदेखील त्यांनी काहीही केलं नाही. यावर ‘स्पॉटलाइट’ टीमनं स्टोरी करावी असं मार्टी बेरॉन रॉबीला सांगतो आणि त्याची टीम कामाला लागते. सुरुवातीला त्यांना असं वाटतं की त्यांना एकाच प्रिस्टची स्टोरी करायची आहे ज्यानं गुन्हा करूनदेखील त्याची वेगवेगळ्या ठिकाणी प्रिस्ट म्हणून नियुक्ती झाली; परंतु ते जसजसं शोधू लागतात तसं त्यांच्या लक्षात येतं की पूर्ण मॅसेच्युएट प्रांतातच हा पॅटर्न असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. प्रिस्टकडून लहान असताना लैंगिक शोषण झालेल्या शोषितांची संघटना चालवणाºया फील सॅव्हियानोशी त्यांची भेट होते आणि प्रिस्टची संख्या १३ वर जाते. त्यांच्या शोधात धक्कादायक माहिती मिळत जाते. आणि प्रिस्टची संख्या ९० वर जाते. एकीकडे ते बळी ठरलेल्या लोकांच्या मुलाखतीदेखील घेत असतात आणि हे सगळं असं जोरात सुरू असताना ११ सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होतो आणि त्यांना त्याचं काम थांबवावं लागतं. पण तो भार ओसरल्यावर अखेर स्टोरी लिहिली जाते आणि दुसºया दिवशी आम्हीदेखील बळी ठरलो आहोत अशा अर्थाचे फोन पोस्टच्या आॅफीसमध्ये खणखणू लागतो. हा इतका अवघड सिनेमा आहे, इतक्या निसरड्या वाटेवरचा आहे की ज्या विवेकबुद्धीनं हा सिनेमा लिहिला आहे त्याला तोड नाही. धर्मसंस्था, समाज, श्रद्धा, भावना या सगळ्या संवेदनशील जागा तटस्थ राहून हाताळल्या आहेत आणि तरीही त्यातील मानव्य अधोरेखित केलं आहे त्याला तोड नाही. न्यूज रूममधल्या नाट्यमय घटना न दाखवता त्यातला साधेपणा शूट केलेला आहे. मूळ विषयातच इतकं नाट्य आहे की पहिल्यांदा जेव्हा तो समजतो तेव्हा आधीच आपली पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि या सरकलेल्या जमिनीवर मात्र स्पॉटलाइटची टीम अतीव संयमानं सत्याचा शोध घेत राहते. दिग्दर्शकाची सिनेमाध्यमाची समज किती सखोल आहे हे आशयावर असलेलं नियंत्रण आणि प्रचंड तपशीलवार काम यातून लक्षात येतं. सिनेमात सत्य शोधणारी माणसं ही आपल्यासारखीच हाडामाणसांची आहेत. कशावर तरी श्रद्धा ठेवणारी आहेत, त्यांनादेखील त्यांच्या संसाराची, लेकराबाळांची काळजी आहेच. तरीही ते निष्ठेनं त्यांचं काम करत राहतात. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे ज्याचा उल्लेख वरती केला आहेच. ती सत्यघटना इतकी हादरवणारी आहे की विश्वास बसत नाही. एकतर त्यावर सिनेमा करायचा विचार करणं, तो सिनेमा तयार होणं, तो प्रदर्शित होणं आणि तो तिथल्या समाजानं समजून घेणं ही भारतीय म्हणून आपल्याला अप्राप्य गोष्ट वाटते. या सिनेमाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात सत्य शोधण्याचा कुठलाच आविर्भाव आणलेला नाही आणि सत्य शोधल्यावरदेखील आपणच कसे महान असं म्हटलं गेलेलं नाही. स्पॉटलाइटची टीम किंवा एकूणच त्यातलं कोणीही ‘थोरपणा’ अजिबातच मिरवत नाही. ""If it takes a village to raise a child, it takes a village to abuse one"" हे यां सिनेमातलं सगळ्यात लक्षात राहणारं वाक्य आहे. वकील मिशेल गार्बेडीयन हे वाक्य म्हणतो. आपल्याकडे ‘लैंगिक शोषण’ हा इतक्या दबक्या आवाजात बोलायचा विषय आहे आणि त्यात बालकांचं होणारं शोषण हा इतका नाजूक आणि गंभीर विषय आहे की त्याविषयीची समज वाढवायची कशी, हा अग्रक्र माचा मुद्दा असला पाहिजे.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत. madhavi.wageshwari@gmail.com)

संबंधित

आर्थिक नुकसानीमुळे रिगल सिनेमागृहाला लागणार टाळे!
अभिमानास्पद! जगातील सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांत सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’
नव्या पिढीमध्ये चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ घडविण्याची ताकद : अरविंद जगताप
लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी 
साडे सहा लाख भरले पण चौदा कोटींचे काय?

सखी कडून आणखी

स्वमग्नतेसाठी एक मदतस्नेही पाऊल
नीट नेटका फ्रीज.. अवघड काय त्यात?
बाया डेजंर असतात.
हरवलेल्या निरागसतेच्या शोधाची सुरूवात करायची का आपण ?
व्यायामाला पर्याय नाही !

आणखी वाचा