-शुभा प्रभू-साटम

सोन्याच्या पावलांनी येणा-या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी स्वयंपाकघरात किती धावपळ चाललेली असते. गौराईला नैवेद्य करण्यासाठी विविध पदार्थ केले जातात; पण दरवर्षी आपण तेच तेच पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतो. 
खरं तर भारताच्या वेगवेगळ्या भागात नैवेद्य म्हणून वेगवेगळे पदार्थ देवाला/गौरीला अर्पण केले जातात. कोणी याला भोग म्हणतं, कोणी नैवेद्य, तर कोणी गौरीचं जेवण म्हणतं. काहीही म्हटलं तरी भाव किंवा श्रद्धा मात्र तीच असते. 
हे वेगळे पदार्थ यंदा गौरीच्या नैवेद्यासाठी आपणही सहज करू शकतो. श्रद्धेनं घरोघरी पूजल्या जाणार्‍या गौराईसाठी काही वेगळ्या पदार्थांचा हा नैवेद्य फुलोरा आहे.

 तुमच्या गौरी तृप्त होऊन खुशीनं राहू देत ही प्रार्थना!

 

 

सज्जीगे

हा कर्नाटकी प्रकार आहे. याला अननसाचा शिराही म्हणतात.

साहित्य : एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी छान पिकलेल्या  अननसाचे  छोटे तुकडे, पाऊण ते अर्धा वाटी साखर, दीड वाटी पाणी, आवडीप्रमाणे काजू, वेलची आणि शक्यतो यात केशर वापरू नये.

कृती : तूप तापवून सुकामेवा परतून बाजूला करावा. त्यात हवं तर अधिक तूप घालून रवा मंद आगीवर सुरेख खमंग भाजून घ्यावा. भाजलेला रवा बाजूला काढून त्यात सुकामेवा मिसळून ठेवावा. पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावं. त्यात अननसाचे तुकडे घालून उकळी आली की मंद आग करावी. भाजलेला रवा घालून परतून घ्यावा आणि मग साखर घालावी. मिश्रण व्यवस्थित ढवळून मंद आगीवर दणदणीत वाफ काढावी. शेवटी वेलची घालावी. वाटल्यास अननस इसेन्सही घालू शकता. पण तो सगळ्यात शेवटी घालावा.

 

चिरौजी-मखाना खीर
(चारोळी-मखाने खीर)

साहित्य : एक वाटी चारोळी निवडून भिजत घालावी. खवट किंवा किडकी चारोळी काढून टाकावी. पाववाटी मखाने, दोन खूप पिकलेली केळी, 
एक लिटर दाट घट्ट असं मलईदार दूध , थोडीशी साखर, अर्धी वाटी मिल्क मेड, वेलची, काजू आणि बदाम
कृती : दूध आटवत ठेवावं. थोडं आटलं की निवडून भिजवलेली चारोळी घालून मंद आगीवर ढवळत शिजवत राहावं. बाजूला दुस-या भांड्यात तूप तापवून त्यात मखाने लालसर करून बाजूला ठेवावेत. त्यात सुकामेवा तळून घ्यावा. या तुपात थोडी साखर लालसर करून (कॅरॅमल करून) केळी त्यात छान लपेटून घेऊन बाजूला ठेवावी. आटत असलेल्या दुधात मिल्क मेड घालावं. 
गोडाचा अंदाज घेऊन साखर वाढवावी. नंतर मखाने, सुकामेवा, वेलची, केळी सर्व घालून ते ढवळून गॅसवरून उतरवून ठेवावं. 
ही खीर अतिशय चवदार लागते.

 

पीठ पोळी / गवसणीची पोळी

कोकण आणि देशावरचा हा पदार्थ आहे. खीर, श्रीखंड आणि आमरस सोबत हा खाल्ला जातो.
 

साहित्य  आणि कृती : मोदकाच्या उकडीप्रमाणे एक वाटी तांदूळ पिठीची मऊ उकड काढून नीट मळून घ्यावी. पाण्यात तूप/लोणी घातल्यास चव आणि पोत चांगला येतो. कणीक एक वाटी घेऊन त्यात मोहन घालून छान तिंबून घ्यावी. कणकेचा उंडा करून त्यात उकडीचा गोळा भरून, उंडा बंद करून मैद्यावर पातळ लाटून पोळीसारखी लालसर शेकवून घ्यावी.

 


 

घारी/कोळी पद्धतीचा मालपुवा

साहित्य आणि कृती : मैदा आणि बेसन एक वाटी. बेसन जरा भरड असल्यास उत्तम. यात पाऊणवाटी गूळ किसून मिसळावा. त्यात वेलची पूड घालून थोडंथोडं पाणी घालून गूळ विरघळवून घ्यावा. पीठ भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्टसर हवं. 

तोपर्यंत तेल कडकडीत तापवून त्यात हे पीठ डावानं गोलसर ओतून ते खमंग लालसर तळून घ्यावे. वरून हवीतर भाजलेली खसखस पेरावी. 

वेगळा असा चवदार नैवेद्य आहे.

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणार्‍या लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

shubhaprabhusatam@gmail.com


Web Title: Special Dishes for offering to Gauri Ganpati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.