- डॉ. वर्षा जोशी

पाश्चात्त्य संस्कृतीचा शिरकाव आपल्याकडे होण्याआधी सूप हा प्रकार आपल्या खाद्यसंस्कृतीत नव्हता. आपल्या खाद्यसंस्कृतीत होता तो सार. विविध प्रकारच्या भाज्या पोटात जाण्यासाठी त्याचं सूप हा एक अत्यंत चविष्ट प्रकार आणि उत्तम पर्याय आहे. आजारी माणसासाठी ते उत्तम असतंच पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ते प्यायला सर्वांनाच मजा येते. अ‍ॅपिटायझर म्हणूनही ते पिता येतं आणि पोटभरीचं म्हणूनही विशेष प्रकारे ते तयार करता येतं. सूप बनवण्याची विशिष्ट पद्धत असते. ती जर पाळली तर उत्तम चवीचं आणि पौष्टिक सूप आपण तयार करू शकतो. 

ब्रॉथ
सूप चविष्ट होण्यासाठी भाज्या ज्यामध्ये शिजवायच्या ते पाणी म्हणजे ब्रॉथ आधी तयार ठेवावं लागतं. त्यासाठी बऱ्याचदा पाण्यात चिरलेलं गाजर, कांदा, लसूण, तमालपत्र, थोडी मिरी आणि थोडी कोथिंबीर किंवा पुदिना घालून उकळी आणून मग मंद विस्तवावर बराच वेळ (तासभर) शिजत ठेवावं लागतं. त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन ब्रॉथ म्हणून वापरायचं.
भाज्या शिजत असताना त्यात थोडं मीठही घालायचं म्हणजे भाज्यांमधला सर्व स्वाद बाहेर येतो. 

सूप बनवताना.. 
आपल्याला ज्या भाजीचं किंवा ज्या भाज्यांचं सूप बनवायचं आहे ती भाजी किंवा त्या भाज्या ब्रॉथमध्ये शिजत ठेवायच्या. सूपमध्ये जिरेपूड, आलं, ओरेगॅनो, बेझिल यापैकी एखादाच मसाल्याचा पदार्थ घालावा. भाज्या शिजायला अगदी कमी वेळ लागतो आणि त्या कमीत कमी वेळात मंद विस्तवावर शिजवाव्यात. चवीप्रमाणे सुपात मीठ आणि मिरपूड घालावी. थोडासा लिंबाचा रस घालावा म्हणजे सुपाला चकचकीतपणा येतो आणि स्वादही चांगला येतो.

क्रीम सूप ते कसं?
क्रीम आॅफ व्हेजिटेबल सूप बनवायचं असेल तर थोड्या दुधात थोडं कॉर्न फ्लोअर चांगलं मिसळून ते मिश्रण सूपमध्ये घालून ढवळून एक उकळी आणून पाच मिनिटं शिजवावं.
दुसरी पद्धत म्हणजे थोड्या बटरवर कॉर्न फ्लोअर जरा भाजून त्यात दूध हळूहळू घालून एकजीव करून घ्यावं. मग त्यात सूप घालून एक उकळी आणून पाच मिनिटं मंद विस्तवावर शिजवावं. तिसऱ्या पद्धतीत नारळाच्या घट्ट दुधात थोडं कॉर्न फ्लोअर घालून एकजीव करून ते मिश्रण सूपमध्ये ओतावं आणि एक उकळी आणून पाच मिनिटं शिजवावं. सूप घट्ट वाटल्यास त्यात थोडं पाणी मिसळावं. क्रीमसाठी काजूची पेस्ट बनवून सूपमधे घालू शकतात.

पालकाचं सूप
पालकाचं सूप बनवताना ब्रॉथ उकळत ठेवून त्यात पालकाची पानं काही मिनिटं ठेवून मग बाहेर काढून घ्यावीत. मग मिक्सरमध्ये क्रीम आणि पालकाची पानं घालून पेस्ट बनवून ती ब्रॉथमध्ये घालावी. थोड्या दूधात थोडं कॉर्न फ्लोअर एकजीव करून ते त्यात मिसळावं. उकळी आणावी. पोटभरीचं सूप बनवण्यासाठी ब्रॉथमध्ये भाज्यांबरोबर उकडलेले मूग, मॅकरोनी, बटाटे असंही काय काय घालून चविष्ट सूप बनवू शकतो.