- मुक्ता चैतन्य

प्रसंग १
कुठलंसं लग्न. सगळ्या मोठ्यांची धावपळ. पाहुण्यांची ये-जा. नातेवाइकांच्या गप्पा आणि बरंच काही. सगळ्या घोळक्यांमध्ये काही खुर्च्या लहान मुलांनी व्यापलेल्या. आणि त्यात बसणारे हे चिमुकले जीव मोबाइलनं व्यापलेले. सहज त्यांच्या मोबाइलमध्ये डोकावलं तर ९९ टक्के जण गेम्स खेळताना दिसतील. 

प्रसंग २ 
कुठलंही घर. दिवस सुटीचा. आईबाबा टीव्ही बघतायेत आणि त्यांची मुलं त्यांच्या खोलीत बसून गेम्स खेळत आहेत. आईबाबांनी हाका मारल्या तरी त्या मुलांच्या कानापर्यंत पोचतीलच असं नाही. पोचल्या तरी मुलं लगेच उठून का हाक मारली होती हे विचारतीलच असं नाही. 

प्रसंग ३
पुन्हा सुटीचाच दिवस. एकेकट्या मुलांना घरात दिवसभर कंटाळा येऊ नये यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना कुणातरी एकाच्या घरी सोडलेलं असतं. थोडावेळ ही मुलं एकत्र खेळतात आणि मग सगळी जण आपापल्या बॅग्जमधून व्हिडीओ गेम्स काढून खेळायला लागतात. खेळण्यासाठी एकत्र आलेली ही मुलं आपापल्या गेमिंग गॅजेटमध्ये रमून जातात. घरी जायची वेळ आली की घरी जातात. या सगळ्यात सुरुवातीची काही वेळ सोडली तर एकत्र खेळणं मात्र राहून जातं. 
ही सगळी मुलं १० ते १३ वयोगटातली असतात. त्यांच्याकडे स्वत:चं गेमिंग गॅजेट असतं किंवा मग ते पालकांच्या स्मार्टफोनमध्ये गेम्स खेळत असतात.
मोबाइल गेमिंग आणि मुलं हा अतिशय नाजूक आणि विविध स्तरीय विषय आहे. मुलं कोणते खेळ खेळतात असा विचार केला तर मुलं जसे मोठ्यांचे खेळ खेळतात तसेच ते लहान मुलांसाठी तयार केलेले खेळही खेळतात. सध्याचा मुलांमधला सगळ्यात प्रसिद्ध खेळ आहे, ‘क्लॅश आॅफ क्लॅन’ आणि ‘क्लॅश आॅफ रॉयल’. 
जगभरातली मुलं एकमेकांबरोबर हा खेळ खेळत असतात. यात खेळणाऱ्याला एक खेडं वसवायचं असतं. इतर खेड्यांवर हल्ले चढवून जिंकून स्वत:चा क्लॅन म्हणजे कुळ मोठं करत न्यायचं असतं, तर क्लॅश आॅफ रॉयलमध्ये एकमेकांचे बुरूज फोडण्याच्या शर्यती असतात. सुपरसेल नावाच्या एकाच कंपनीनं हे दोन्ही खेळ तयार केले आहेत. फक्त ‘क्लॅश आॅफ क्लॅन’ २०१२ साली आला आणि ‘क्लॅश आॅफ रॉयल’ २०१६ मध्ये बाजारात आला आहे. हे दोन्ही खेळ खरंतर १३ वर्षांच्या पुढील मुलांनी खेळण्याचे आहेत. 
पण आपल्याकडे सर्वसाधारणपणे नवव्या किंवा दहाव्या वर्षी मुलं हे खेळ खेळायला सुरुवात करतात.
हे खेळ लहान मुलांनी खेळण्यावर आक्षेप घेणारे अनेक लोक आहेत. आक्षेपाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जगभर कुणीही कुणाशीही खेळू शकत असल्यानं खेळणारा कोण आहे याची काहीही कल्पना असत नाही. त्यामुळे वाईट भाषा वापरणं, बुलिंग करणं, एकमेकांवर इमोटीकॉनच्या माध्यमातून हसणं, टीका करणं, कमी लेखणं असले प्रकार होतात. विरोध आणि आक्षेप घेणाऱ्यांच्या मते या गोष्टी वाढीच्या वयातल्या मुलांसाठी चांगल्या नाहीत. 
जगभरात जवळपास दहा कोटी लोक हे खेळ खेळतात. त्यात लहान मुलांची संख्या प्रचंड मोठी आहे. मुलांना हे खेळ आवडतात. त्यात मारामारी आहे. त्यात डोकं चालवून युद्धाची रणनीती आखायची असते. त्यात अनोळखी लोकांशी स्पर्धा आहे. त्यात ओळखीतल्या मित्र- मैत्रिणींबरोबर स्पर्धा आहे. 
मोबाइल गेम्स मुलांसाठी चांगले की वाईट यावरून जगभर संशोधन सुरू आहे. मोबाइल गेमिंगचे मुलांच्या मेंदूवर, भावनांवर, सामाजिक वर्तणुकीवर, समजुतींवर, कुटुंबाशी असलेल्या संवादांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतायेत का याचा अभ्यास सुरू आहे. मेंदूला चालना देणारे जसे खेळ आहेत तसेच मेंदू थिजवून टाकणारे, भडक भावनांना खतपाणी घालणारे, स्वत:विषयी प्रश्नचिन्ह उभे करणारे खेळही आहेत. स्वप्रतिमा विस्कळीत करणारे खेळही आहेत. 
आपल्या मुलांच्या हातात कुठले गेम्स आहेत आणि त्याचा त्यांच्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो याबाबत जागरूक असण्याची नितांत गरज आहे. 
मुलांच्या हातातून मोबाइल आणि गेम्स आपण काढून घेऊ शकत नाही. पण त्यावर लक्ष ठेवून त्याबद्दल त्यांच्याशी सातत्यानं बोलू शकतो. त्यातले धोके जाणवले तर त्यांना ते समजावून देऊ शकतो. त्यांनी काय खेळावं, किती खेळावं, त्यासाठी किती वेळ द्यावा यावर नियंत्रण ठेवू शकतो. 
निदान तितकं तरी केलंच पाहिजे. मुलांच्या हातातला मोबाइल त्यांच्यासाठी घातक ठरता कामा नये इतपत काळजी आपण घेऊ शकतो. 
नाही का?

 

(लेखिका मुक्त पत्रकार आणि समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.) muktaachaitanya@gmail.com