आजही समाजात मुलींचे जन्म गर्भातच मारले जातात, त्यापायी आयाबायांचे बळी जातात आणि त्या साऱ्यांच्या उरतात फक्त बातम्या,चर्चा, खटले आणि आरोपपत्र! मात्र हे सारं घडतं तेव्हा महिला आयोगासारख्या संघटना काय भूमिका घेतात, जनजागृतीसह पीडितांच्या मदतीसाठी काय काम करतात यासंदर्भात थेट चर्चा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष
विजया रहाटकर यांच्याशी...

म्हैसाळ.
पोटातल्या लेकीचा जन्म नाकारत गर्भातच चिरडून टाकलेल्या जिवांचे काही अवशेष या गावात सापडले. एक ना दोन १९ कळ्या अशा कुस्करल्या गेल्या. अजून किती अश्राप जीव पूर्वी यात चुरडले गेले असतील याचा अंदाज नाही.
पोटातल्या मुलीचा गर्भ बळजबरी काढून टाकायला भाग पडलेल्या एका महिलेचा जीव गेला या साऱ्यात, तर तिच्या विषण्ण व दु:खी बापानं तिच्या सासरच्या अंगणातच तिच्या देहाला अग्नी दिला..
धडधड राहिली ती चिता संतापानं..
आणि सर्वत्र उसळलाही चर्चेचा डोंब पुन्हा. पण पुढं काय?
किती दिवस आपल्या समाजात मुलीचा जन्म असा नाकारला जाणार आणि महिलांच्या जिवाशी खेळ होणार?
- असे काही अस्वस्थ प्रश्न थेट महिला आयोगाच्या अध्यक्षांपुढेच ठेवले. त्यांना विचारलं की महिला आयोग या साऱ्यात काय भूमिका घेणार? काय काम करणार? आणि अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून आयोगाकडे आहेत का काही उपाययोजना?
त्याच प्रश्नांची ही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिलेली उत्तरं..

तुम्ही नुकत्याच म्हैसाळला जाऊन आल्या म्हणालात, काय दिसलं त्या भेटीत?
तिथं जाऊन आयोगाच्या वतीनं पाहणी केली. आणि एका गोष्टीनं मला विलक्षण धक्का बसला. कुठलीही वैद्यकीय पदवी नसलेला डॉक्टर अवैधरीत्या या शस्त्रक्रिया तिथं करत होता. औषधं देत होता. आणि सारं राजरोस घडत होतं. अशावेळी अवतीभोवतीचे लोक काय करत असतात? ते शांत कसे? त्यांच्या काहीच कसं लक्षात आलं नाही? आणि आलं असेल तर त्यांनी त्याविषयी कुठेच काही का वाच्यता केली नाही, करू नये? गप्पच बसावं. हे किती संतापजनक आहे. काहीतरी भयानक आपल्या अवतीभोवती घडतं आहे आणि आपण त्यासंदर्भात गप्प आहोत हे वास्तव भीषण आहे. जागरूक होऊन जोवर नागरिक अशा अपप्रवृत्तींविरुद्ध जाहीर भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हे प्रकार असेच बिनबोभाट गावागावांत, गल्लोगल्लीत चालूच राहतील. 
नागरिक कधी जागरूक होऊन आवाज उठवणार?
महिला आयोगाचं काम पाहताना तुम्हाला वाटतं की, खेड्यापाड्यात अजूनही समाजात मुलीच्या जन्माचा आनंद होताना दिसत नाही? 
आपल्याकडे स्त्रीशक्तीचे, तिच्या धाडसाचे, जिद्दीचे वर्णन करणारे अनेक सिनेमे येतात. लोक पाहतात, कौतुक करतात; पण जेव्हा आपल्याच आजूबाजूला काहीतरी विपरीत घडत असतं, लेकीबाळींवर अन्याय होतो, मुलीचा जन्म झाला तर चेहऱ्यावर आनंद दिसत नाही ते सारं लोक पाहत नाहीत. त्यासंदर्भात आवाज उठवून त्याला विरोध करत नाहीत. स्त्रियांच्या कर्तबगारीवर आधारित सिनेमे चालतात पण समाजात मात्र आजही स्त्रियांचे प्रश्न तेच. हे दुटप्पीपण समाजासाठी धोकादायक ठरते. मुुलीचा जन्मच वाईट, खर्चिक, जोखमीचा हे सगळे जुनाट विचार बदलायला हवेत. 
मुलगी पण वंशाचा दिवाच आहे आणि ती पण आईवडिलांचा आधार बनू शकते याची अनेक उदाहरणे समाजात आज आहेत. लेकी आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करतात, त्यांच्या कर्तबगारीच्या असंख्य कहाण्या आहेत. त्याही आपल्याच समाजात आहेत.
म्हणजे आपलं आजचं वास्तव असं दुहेरी आहे. एकीकडे सामान्य स्त्रियांची कर्तबगारी रूपं दिसतात, तर दुसरीकडे गर्भातच कळ्या खुडणारे राक्षसी हातही आहेत. अशा दुहेरी चक्रातून आणि विरोधाभासी वास्तवातून आपला समाज जातो आहे. 
म्हणून खरंतर आपल्या वृद्ध आईवडिलांना सांभाळणाऱ्या मुलींचा समाजात सत्कार व्हायला हवा. कुटुंबातील लहान मुलामुलींमध्ये अगदी बालवयातच आपण समान आहोत ही भावना रुजवणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे, घरात आईने मुलामुलींना भिन्न वागणूक न देता सारख्याच मायेनं वागवलं पाहिजे.
दोघांचं उत्तम शारीरिक व मानसिक भरणपोषण ही उद्याच्या निकोप समाजाची गरज आहे. 

हे सारं खरं आणि वारंवार बोललं जात असलं, तरी अशा प्रकारांत बळी ठरलेल्या महिला किंवा कुटुंबांना महिला आयोग कशी मदत करतं?
जिथं या भ्रूणहत्त्येच्या घटना घडल्या त्या भागातल्या आरोग्य विभागावरही या साऱ्याचा ठपका ठेवायला हवा. काही भयानक प्रकार या भागात घडत असल्याची एक तक्रार आरोग्य विभागाकडे आली होती असं कळलं. मात्र त्याची वेळीच योग्य ती दखल घेतली न गेल्यानं भ्रूणहत्त्येच्या घटनांना अधिक बळच मिळत गेलं. आता महिला आयोगानं तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकाराची विचारणा केली आहे. म्हैसाळातील तथाकथित डॉक्टर खिद्रापुरे याच्याविरुद्ध काय कारवाई होते आहे त्यासंदर्भातल्या सूचना आणि त्याचा पाठपुरावाही आम्ही करणार आहोत. 
या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबाला महिला आयोगातर्फे थेट स्वरूपात कुठलीच मदत दिली जात नाही; मात्र त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी महिला आयोग सर्व स्तरांवर त्यांच्यासोबत लढा देतो. कारवाईला गती यावी आणि घटनेचा योग्य पाठपुरावा व्हावा म्हणून आम्ही दक्ष असतो. स्त्रीभ्रूण हत्त्यांचे खटले वेगानं चालवले जाऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग प्रयत्नशील आहे.
केवळ पुरुषच नाही तर महिलांमध्येही यासंदर्भात जनजागृती होऊन त्यांना प्रसंगी अशा घटनांच्या विरोधात उभं राहण्यासाठी बळ मिळावं म्हणून आयोग काही काम करणार का? केलं जातं का?
आपल्या देशात सती प्रथा आता बंद झाली आहे, हुंडा प्रथाही बऱ्यापैकी मोडीत निघाली आहे, बालविवाहावर बंदी आहे. हे सगळं घडायला कित्येक वर्षे लागली. अनेक समाजसुधारकांनी आपलं आयुष्य त्यासाठी वाहून घेतलं. आता स्त्रीभ्रूण हत्त्येची कुप्रथा बंद होण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांनी सजग होणं आवश्यक आहे. मात्र त्यासाठी कुणी समाजसुधारक येईल याची वाट पाहत न बसता आपण पुढाकार घेऊन या कामात सजग व्हायला हवं. प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुषाने आपल्या समाजाचे सजग प्रहरी बनलेच पाहिजे. 
एखाद्या जहाजाला भोक पडलं तर ते काही वेळात बुडणार हे निश्चित असतं. पण जर वेळीच ते भोक बुजवलं गेलं तर जहाज तरू शकतं. समाजाच्या जहाजाचं रक्षण करण्याची जबाबदारीही समाज म्हणून आपलीच आहे.
त्यामुळे लोकांमध्ये या विषयासंदर्भात जागृती वाढीस लागावी म्हणून काम केलं जात आहेच; मात्र स्त्री-पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विचारवंत, अभ्यासक, राजकारणी, कलावंत हे देशावरील राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्राच्या मागे जसे एकमुखाने, एकदिलाने उभे राहतात, तसेच ठामपणे या भ्रूणहत्त्यांच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे. हा भयाण कारभार बंद व्हावा म्हणून सामाजिक क्रांतीची मानसिकता आवश्यक आहे. एकदिलानं लढा दिला तर मुलींच्या जिवाशी असा खेळ होणार नाही.

मुलाखत आणि शब्दांकन
वर्षा बाशू