Snehhvan: - The story of a family of 57 people | स्नेहवन:- 57 जणांच्या कुटुंबाची गोष्ट
स्नेहवन:- 57 जणांच्या कुटुंबाची गोष्ट


अशोक देशमाने

स्नेहवन’ हे माझ्या घराचं नाव. माझ्या या कुटुंबात आम्ही 57 जण राहातो. मी, माझी बायको, आई-वडील आणि माझी 53 मुलं. इथला प्रत्येकजण रक्ताच्या नात्यानं नाही तर स्नेहाच्या, प्रेमाच्या धाग्यानं एकमेकांशी जोडलेला. स्नेह, प्रेम, आपुलकी हाच आमच्या एवढय़ा मोठय़ा कुटुंबाचा आधार. एका कुटुंबानं आनंदी असण्यासाठी घरात सुखोपयोगी वस्तू, भरभक्कम बॅँक बॅलन्स असावा लागतो असं नाही. घरात एकमेकांना समजून घेणारी, एकमेकांशी प्रेमानं, आपुलकीनं वागणारी माणसं असली की आपोआप घर हसरं नाचरं होतं. माणसांनी भरलेलं हे आमचं चार खोल्यांचं छोटुसं घर म्हणूनच आनंदानं नांदतं आहे.

मराठवाड्यातल्या परभणीत एका शेतकरी कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. घरात गरिबी इतकी की आई दुसर्‍यांचे फाटके ब्लाऊज शिवून घालायची. महिनोन महिने एक वेळ भात खाऊन राहावं लागायचं. शिकताना अनेकांनी मदतीचा हात दिला. सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो. एका चांगल्या आयटी कंपनीत नोकरीला लागलो. उत्तम पगाराची नोकरी. इतक्या पैशाचं करायचं काय? असं वाटायला लागलं. मला उभं राहायला इतकी मदत मिळाली की, आतून देण्याची ऊर्मी जागी झाली. मग पगारातली 10 टक्के रक्कम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवू लागलो. मग वाटलं की गरजवंतांना मदत करायला नुसता पैसा पुरेसा नाही. वेळ द्यायला हवा. मग मी शनिवार, रविवार गरजू मुलांचा वर्ग घेऊ लागलो. पण तरीही मन भरत नव्हतं.

2014 आणि 2015ला महाराष्ट्रात सलग भीषण दुष्काळ पडला. माझ्या गावातल्या कितीतरी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. गावात रोजगार नाही, शेती नाही, घरात खायला काही नाही म्हणून माणसं घर, गाव सोडून बाहेर पडू लागली. मी त्यांना म्हणत होतो,  ‘अरे तुम्ही तर चाललात, या लहान मुलांच्या शिक्षणाचं काय? इथल्या तुमच्या घरादाराचं काय?’ लोक म्हणत होते, ‘जगणं महत्त्वाचं. मुलांना कामाला लावू. निदान दोन घास तरी खाऊ. घरादाराचं काय घेऊन बसलात?’

माझ्या पोटात खड्डा पडला. मी ठरवलं की आपणच आपलं कुटुंब विस्तारायचं. लग्नही व्हायचं होतं माझं. आणि माझ्या घरात माझी 18 मुलं राहायला आली. मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची ती मुलं. 2015मध्ये मला 18 मुलं होती. आणि आज मला माझी स्वत:ची मुलगी धरून 53 मुलं आहेत. त्यातली 25 मुलं निवासी आहेत. ही निवासी मुलं आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची आहेत. आणि 27 मुलं रस्त्यावर भीक मागून, भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी होती. ही मुलं दिवसभर माझ्याकडे राहातात आणि रात्री झोपायला म्हणून त्यांच्या त्यांच्या घरी जातात. कुटुंब विस्तारायचं ठरवलं तेव्हा आई-वडिलांची साथ होती. त्यांना माझे विचार पटले. त्यांनी मी जे करतो त्यात साथ द्यायला मान्यता दिली.

मी नोकरीच्या ठिकाणी माझी नाइट शिफ्ट करून घेतली. दिवसभर मग मुलांना शाळेत पाठवणं, त्यांच्यासोबत खेळ आणि इतर उपक्रम घेणं, किराणा, भाज्या आणणं यात वेळ जायचा. हळूहळू माझ्या घरातले सदस्य वाढत होते. आई-वडिलांनी माझं लग्न करायचं ठरवलं. हुंड्याचा एक पैसा आणि घरात मुलीकडून आलेला एक चमचाही नको या अटीवर लग्नाला तयार झालो. मानवधर्म मान्य असलेल्या मुलीसोबतच लग्न करायचं हा माझा आग्रह होता. 

माझे विचार, माझं काम आणि आयुष्यातला पुढचा संघर्ष मान्य असणारी अर्चना भेटली. ती शिकलेली होती. एका मुलीनं शिकणं किती अवघड असतं हे तिनं तिच्या गावात राहून स्वत: अनुभवलं होतं. तिनं मी करत असलेलं काम विनातक्रार मान्य केलं. लग्नाच्या तिसर्‍या दिवसापासून तिनं 10 बाय 10 आकाराच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला. तेव्हापासून आजतागायत घरातल्या सर्व माणसांचा स्वयंपाक ती आनंदानं रांधते. लग्न झाल्यानंतर मला जाणवायला लागलं की घरातल्या मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. त्यांना काय हवं नको ते बघणं, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं. मी माझी नोकरी सोडून दिली. तोपर्यंत माझं काम लोकांपर्यंत पोहोचत होतं.

मित्रमंडळी हातभार लावत होती. समाजातली दानशूर मंडळी आर्थिक मदत देत होते. एवढय़ा मोठय़ा कुटुंबाचा गाडा हाकणं सोपं नव्हतं. आर्थिक अडचणी खूप होत्या. गरजा म्हटलं की पैसा लागतो. मग आम्ही आमच्या गरजाच कमी करून टाकल्या. माझी मुलं गरजू होती; पण स्वाभिमानी होती. लोकं वापरलेले; पण चांगले कपडे आम्हाला आणून देत. पण मुलं घालण्यास नकार देत. मग आम्ही स्वत:ला कपडे घेणं बंद केलं. आम्हीही वापरलेले कपडे वापरू लागलो. हे बघून मुलंही तयार झाली. हॉटेलिंग, सिनेमा, खरेदी या गरजा आमच्या आयुष्यात नव्हत्याच. त्यामुळे आपोआपच पैसा कमी लागू लागला. खाणं-पिणं आणि लाइटबिल सोडलं तर दुसरा खर्च नव्हताच. एक कुटुंबप्रमुख म्हणून आहे त्यात घर चालवणं आणि घरातल्यांना आनंदी ठेवणं हे माझं काम होतं. एका चांगल्या कुटुंबात मुलांना जे मिळतं ते देण्याचा मी प्रयत्न करू लागलो. एक चांगलं कुटुंब म्हणजे घरातल्यांना समजून घेणारं, त्यांना आधार देणारं. मी माझ्या कुटुंबासाठी हीच समजूतदारपणाची भूमिका घेतली. मुलांवर तू अमुकच कर आणि तमुकच शिक म्हणून आग्रह केला नाही, की काही लादलं नाही. मुलांना काय आवडतं, काय जमतं यावर माझं लक्ष असतं. मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना ते ते करण्याचं स्वातंत्र्य आमच्या घरात आहे. म्हणून इथे कोणी चित्र काढण्यात रमतं. कोणाला वस्तू बनवायला, कोणाला वाद्य वाजवायला आवडतं. कोणाला कम्प्युटर शिकायचा असतो. माझी भूमिका मुलांना जे हवं ते पुरवायचं ही असते. आज जवळ जवळ 10 शिक्षक आमच्या घरी येऊन मुलांना निरनिराळ्या गोष्टी शिकवतात. मुलं शाळेत जातात. घरी येतात. घरातल्या वेगवेगळ्या उपक्रमात रमतात. एकमेकांशी खेळतात. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत घर उत्साहानं भारलेलं आणि जिवंत असतं.

‘एकत्र जेवण आणि एकत्र जीवन’ हे आमच्या आनंदी घराचं सूत्र आहे. सकाळी सगळ्यांचं एकत्र बसून जेवण होत नाही म्हणून रात्री आमची सगळ्यांची अंगत-पंगत बसते. एकत्र बसून, गप्पा मारत जेवल्यामुळे सगळ्यांनाच दोन घास जास्त जातात. जेवणाआधी संध्याकाळी रोज घरात रिंगण भरतं. वारीत असतं ना तसं. या रिंगणात प्रत्येकजण दिवसभरातलं शेअरिंग करत असतो. कधी विषय वाचत असलेल्या पुस्तकाचा असतो, तर कधी चालू घडामोडीचा. प्रत्येकजण बोलतो, व्यक्त होतो हे विशेष.

आमच्या या घरात इतकी माणसं आहेत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. प्रत्येकाला त्यांची त्यांची मतं आहेत. पण इथे वादविवाद नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमचं कुटुंब एकविचारी आहे. एकविचारी कुटुंब असलं की घरात एकी असते. मुलगा भरभक्कम पगाराची नोकरी सोडून हे काय करतो आहे अशी तक्रार कधी आईवडिलांनी केली नाही, तर कधी बायको रुसून-फुगून माहेरी गेली नाही. घरातली कामं ओढून ओढून बायकोचा एकदा गर्भपातही झाला. पण तिनं तक्रार केली नाही, की मला दोष दिला नाही. दुसर्‍या वेळेस सातव्या महिन्यातच मुलगी झाली. मुलगी कमी वजनाची. डॉक्टरांनी इतक्या जास्त माणसांच्या घरात तिला ठेवू नका. ती जगणार नाही म्हणून सांगितलं. आम्ही मात्र मुलगी वाढेल तर या सगळ्यांसोबतच असा निर्णय घेतला. जे इतर मुलांना तेच तिला हेच आमचं धोरण. या सगळ्यांच्या गोतावळ्यात मुलगी जगली आणि आता ती सगळ्यांच्या अंगाखांद्यावर खेळते, वाढते आहे. आमच्यासाठी सगळ्यांसारखीच ती. त्यामुळे तिच्याकडे लक्ष आणि इतरांकडे दुर्लक्ष असं होत नाही.
घरात एकी, समजूतदारपणा आणि प्रेम असलं की मुलं जबाबदार होतात हे आम्ही अनुभवतो आहोत. आमच्या घरात सात वर्षाच्या मुलापासून सतरा वर्षाच्या मुलापर्यंत मुलं आहेत. मोठी मुलं स्वत:हून लहान मुलांची जबाबदारी घेतात. त्यांचा अभ्यास घेणं,  त्यांना शाळेत पोहोचवणं, आणणं, त्यांच्याशी खेळणं, गोष्टी वाचून दाखवणं हे मुलं आनंदानं करतात. घरातल्या  या आनंदानं आर्थिक संघर्षाचं ओझं आम्हाला कधीच जाणवलं नाही. आता तर आमचं छोटं घर मोठं होतं आहे. बायकोचं बाळंतपण ज्या दवाखान्यात झालं त्या ्नरवींद्र आणि स्मिता कुलकर्णी डॉक्टरांनीच खेड तालुक्यातील कोयाळी  गावातील त्यांची दोन एकर जागा आम्हाला घरासाठी दिली. गावाकडची शेती, बायकोचे दागिने विकून घर बांधलं. आता आम्ही तिकडे मोठय़ा घरात राहायला जाणार. मुलांना राहायला बागडायला आणखी मोठी जागा मिळणार. आज या घरात 25 निवासी मुलं आहेत तिथे मोठय़ा घरात 50 निवासी मुलं असतील. आमचं कुटुंब आणखी मोठं होणार.
आमची जबाबदारी वाढणार हे खरं; पण आनंदही वाढणार हे नक्की !
---------------------------------------------------------------------------

आमच्या या घरात..

आमच्या कुटुंबात सक्तीचे नियम नाहीत; पण शिस्त मात्र आहे. ही शिस्त प्रत्येकजण आनंदानं आणि स्वत:हून पाळतो. मुलं आपल्या आईबाबांकडे पाहून वागायला शिकतात. आमची मुलं ही आमचं अनुकरण करतात. सुरुवातीला व्हायचं असं की आम्ही टीव्ही पाहायचो तर मुलंही इतर महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टी सोडून टीव्ही पाहात बसायची. मग आम्ही टीव्ही पाहाणं सोडून दिलं. आमच्या घरात एक लायब्ररी असून, त्यात 2500 पुस्तकं आहेत. ‘वन बुक वन मुव्ही’ नावाचा एक उपक्रम आहे. आठवड्याभरात एक पुस्तक वाचलं की मुलांना घरात एक चित्रपट दाखवला जातो. या पुस्तकाच्या निमित्तानं गप्पांना विषय मिळतो. 

एकमेकांशी गप्पा मारणं, घरातली माणसं बोलती असणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं. संध्याकाळी रिंगण करून पुस्तकावर किंवा इतर कशावरही आम्ही पोटभर गप्पा मारतो. गप्पा मारतच आमचं संध्याकाळचं जेवण होतं. आमचा सगळ्यांचा दिवस सकाळी 6 वाजता सुरू होतो. सकाळी साडेसहा वाजता अय्यंगार योग केला जातो. आणि मग जो तो आपल्या आपल्या कामाला लागतो.

मी दर तीन महिन्यांनी मुलांना छोट्या छोट्या सहलींना घेऊन जातो. फिरणं, मजा करणं यासोबतच नवीन माहिती मिळवणं हाही त्यामागचा उद्देश असतो. एक कुटुंबप्रमुख म्हणून माझी मुलं  नोकरीच्या  उद्देशानं शिकणारी आणि शिकून नोकरीच्या मागे धावणारी नको आहेत.  त्यांनी स्वत:चा व्यवसाय, काम स्वत: उभं केलं पाहिजे. यासाठी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्राची, व्यवसायाची माहिती करून देण्याचं काम मी करतो. अभ्यास सहलीच्या निमित्तानं वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना त्यांना झेपेल, समजेल ते क्षेत्र बघायला घेऊन जातो. 

मुलांना या सर्व गोष्टींची मजा वाटते. मुलं वर्षभर इथे घरीच असतात. दिवाळीत पंधरा दिवस आणि उन्हाळ्याच्या सुटीत एक आठ दिवस घरी जाऊन येतात.

(आत्महत्या केलेले शेतकरी आणि रस्त्यावर राहणारी मुलं यांच्यासाठी स्नेहवन प्रकल्प ते चालवतात.)

snehwan@yahoo.in

(शब्दांकन- माधुरी पेठकर)


Web Title: Snehhvan: - The story of a family of 57 people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.