-भक्ती सोमण

उन्हाळ्यात ताक तर सर्वच पितात. 
पण कोळसा जाळून ओव्याचा धूर देऊन 
तयार केलेलं धुरकट ताक 
ते कधी प्यायलंय का कोणी?

खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये असंख्य प्रयोग होता आहेत. नेहेमीच्या त्याच त्याच चवींनी कंटाळलेल्या जीभेलाही प्रयोगातलं नाविन्य चाखावसं वाटतंच. काही काही पदार्थांची नावं कानानं ऐकायला कशीशीच वाटतात पण चवींचं विचाराल तर मग पहिल्याच घासात किंवा घोटात आउट होतात इतक्या अफलातून असतात. स्मोकी ताकाच्या बाबतीतही तसंच झालं. जसं आपण बिर्याणी करताना तिला कोळशानं स्मोक देतो. तोच फ्लेवर आता काही ड्रींक्समध्येही दिला जातो. मी याबद्दल बरेच दिवस ऐकून होते. म्हटलं चव तर घेऊन बघूू. परवाच मी ते प्यायले. स्मोकी फ्लेवरचं म्हणजे स्मोकी ताक. मुंबईतल्या गिरगावात नाटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या साहित्य संघाबाहेर "ताक स्टेशन" नावाचं छोटसं दुकान आहे. ते दुकान चालवणाऱ्या प्रसाद वेदपाठकला ही कल्पना सुचली. ताक तर सगळेच विकतात. पण हे स्मोकी फ्लेवरचं ताक निव्वळ अफलातून. त्यासाठी प्रसादनं छोट्या वाटीत कोळसा घेतला. आजकाल एखादा पदार्थ वा कोळशासारखे तत्सम पदार्थ जाळण्यासाठी एक छोटं मशीन येतं. ते चालू करून पदार्थ हव्या त्या प्रमाणात भाजू वा जाळू शकतो. तर कोळशाला स्मोक देण्यासाठी प्रसादनं त्या मशीनचा उपयोग करत छोट्या वाटीत हा कोळसा जाळायला सुरूवात केली. ५ मिनीटांनी कोळसा जसा जळायला लागला तसा त्याने त्यावर ओवा टाकला. त्यातून धूर यायला सुरवात झाल्यावर त्याने लगेचच एक काचेचा ग्लास त्या वाटीवर ठेवून दिला. अवघ्या दोन मीनिटात त्या ग्लासात पूर्ण धूर गेला होता. मग त्या धूर गेलेल्या ग्लासात दुसऱ्या ग्लासात असलेलं ताक खालीवर केलं आणि लगेच प्यायला दिलं. ताकाच्या गोड चवीबरोबर कोळशाच्या चवीचा स्मोकी फ्लेवर आणि ओव्याचं कॉम्बिनेशन एकदम वेगळंच आणि मस्त लागत होतं. . 
कोळशात स्मोक करताना ओव्याऐवजी हिंग किंवा जीरेही वापरता येऊ शकतं. लोकांना बदल म्हणून हे ताक प्यायला आवडतं असं प्रसादनं सांगितलं. फक्त ताकच नाही तर प्रसाद म्हणतो की कोकम सरबत, लस्सी, पन्हं या ड्रींक्सवरही असा स्मोकी फ्लेवर देता येऊ शकतो.