Size India has the opportunity to celebrate the size of an Indian body. How? | भारतीय देहाचे आकार उकार साजरे करण्याची संधी साइज इंडियात आहे. ती कशी?
भारतीय देहाचे आकार उकार साजरे करण्याची संधी साइज इंडियात आहे. ती कशी?

-वेण्डेल रॉड्रिक्स

युरोपियन आणि अमेरिकन देहयष्टीच्या प्रमाणीकरणातून केलेले साइझ-चार्ट्स भारतीय स्त्रियांना ‘बसत’ नाहीत, याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय स्रियांच्या देहयष्टीतली विविधता.

2. खरं तर भारतीय स्त्रियांची देहयष्टी ही कोणत्याही फॅशन डिझायनरसाठी आव्हानात्मकच आहे. भारतीय स्त्रिया या अमेरिकन मापांच्या तुलनेत जरा बारीक आणि फ्रेंच मापांच्या तुलनेत काहीशा जाड असतात एवढय़ापुरताच हा फरक मर्यादित नाही. त्यामध्ये अनेक बारीक बारीक देह-वैशिष्ट्ये आहेत.

3. उत्तर भारतीय स्रियांचे खांदे पसरट असतात, तर दक्षिणेकडे लहानखुरे असतात. इतकंच कशाला दक्षिणेत तर हाडांच्या संरचनेनुसार देहयष्टी बदलत जाते. त्यामुळेच संपूर्ण दक्षिणेतल्या स्त्रियांच्या आकारमानात सारखेपणा नसतो. द्रविडियन स्त्रियांचं ‘बोन स्ट्रक्चर’ काहीसं भक्कम असतं, तर तमिळी स्त्रियांचं नाजूक ! 

4. भारतात  देहयष्टीतला फरक हा फक्त प्रातांनुसार पडतो असंही नाही, तर एकाच व्यक्तीत दोन मापं दडलेली असतात. हे भारतातलं आणखी एक वैशिष्ट्य ! उदा. मानेपासून कमरेपर्यंतचा भाग कमनीय; पण कंबर आणि नितंब मात्र त्या तुलनेत मोठे.

5. भारतीय मापांचा विचार करायला बसल्यावर एवढी विविधता दिसायला लागली. जवळजवळ  27 वर्षं मी चिकाटीनं निरीक्षण केलं.  तेव्हा कुठे भारतीय मापांचा एक प्रमाणभूत तक्ता मी तयार करू शकलो. 

6. भारतीय स्त्रियांसाठी कपडे डिझाइन करताना फक्त कपड्यांचा विचार करून चालत नाही. भारतीय स्त्रियांच्या दृष्टीनं दागिनेही खूप महत्त्वाचे असतात. आपण घातलेले दागिने छान उठून दिसावे असं प्रत्येकीला वाटतं. हातातल्या बांगड्या, गळ्यातले हार, नेकलेस यांचा विचार करता भारतीय स्रियांवर तीन-चतुर्थांश बाह्यांचे आणि खोल गळ्यांचे कपडे उठून दिसतात.

7. भारतीय देहयष्टीतली वैशिष्ट्यपूर्ण कमनीयता ही कपड्यांमधून उठून दिसायला हवी. पण हल्ली ती झाकलेलीच जास्त प्रमाणात आढळते. जुन्या काळातल्या स्त्रिया, त्यांचे कपडे आठवून पाहा. त्या वस्रांमधून दिसणारी देहाची वळणं फार मनोहारी होती. पाश्चात्त्य मापांच्या कपड्यात स्वत:ला बसवण्याचा अट्टाहास भारतीय स्त्रिया करू लागल्या, तसं या भारतीय कमनीयतेचं दर्शन हरवत गेलं.   सणावाराला, लग्नसमारंभात भारतीय स्त्रिया जेव्हा खास भारतीय पोषाख घालतात तेव्हा त्या खूप आकर्षक दिसतात. मोकळ्या वावरतात. या पेहरावात देहयष्टीचे आकार उकार छान खुलून दिसतात. 

8. आज जागतिक बाजारपेठेत भारत हा मोठा ग्राहक आहे. पण आपल्याकडे आपल्याकडच्या मापांचा प्रमाणभूत तक्ता नाही ही खरं तर शरमेची आणि खेदाची गोष्ट आहे. चीन आणि थायलंड या देशात त्यांच्या त्यांच्या मापांचा प्रमाणभूत तक्ता आहे. त्यामुळे भारतीय मापांचा प्रमाणभूत तक्ता असणंही आता महत्त्वाची गरज आहे. भारतीय मापांचा प्रमाणभूत तक्ता असेल तर मापांचा गोंधळ थांबेल आणि प्रत्येकीला आपल्या मापाचे कपडे मिळतील. ते कपडे घालताना आपण बारीक दिसतोय की जाड हा संकोच नसेल. याउलट आपल्या वैशिष्ट्यपूर्ण देहयष्टीचं ते ख-या अर्थानं सेलिब्रेशन असेल.

(वेण्डेल रॉड्रिक्स हे ख्यातनाम फॅशन डिझायनर आहेत. 2016च्या लॅक्मे फॅशन वीक विण्टर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी खास भारतीय स्त्रियांसाठी स्वत: तयार केलेल्य कपड्यांच्या मापांच्या प्रमाणभूत तक्त्याचं सादरीकरण केलं होतं. त्या कार्यक्रमापूर्वी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा हा संपादित भाग.)


Web Title: Size India has the opportunity to celebrate the size of an Indian body. How?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.