- प्रियदर्शिनी हिंगे

सेरेना विल्यम्स.
गेल्या जानेवारीत तिनं आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.
पण त्या स्पर्धेत खेळताना ती तीन ते चार आठवड्यांची गर्भवती होती हे मात्र नुकतंच उघड झालं. 
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात
स्पर्धात्मक टेनिससारखा अवघड खेळ स्त्रीनं खेळावा का,
यावर सध्या जगभर खल सुरू आहे. 
सेरेना मात्र शांतपणे म्हणाली, 
‘त्यात काय? मी खेळले आणि जिंकले!’ 
हे कसं जमलं तिला?

पहिलं मूल येण्याची चाहुल लागताच भारतीय कुटुंबात आनंदाचं वारं वाहू लागतं, लगबग आणि काय काय तयारी सुरू होते. गर्भवती आईचीही काळजी घेणं सुरू होतं. तिचं कोडकौतुक केलं जातं. काय हवं - नको बघितलं जातं. अनेक मुली यादरम्यान हवे तेवढे लाड पुरवून घेतात. मात्र या कोडकौतुकात भरपूर लाड होत असले तरी अनेकींना ते नकोसेही वाटतात. 
एकदा का गरोदर राहिलं की ठरलेल्या पठडीत वागायचं. हेच खा, असंच वागा, असंच राहा अशा अनेक बंधनांची मालिका सुरू होते. मग मात्र अनेकींची चिडचिड सुरू होते. रोजच्या व्यवहारांनाही बंधनं येतात, तेव्हा मात्र कहर झाल्यासारखं वाटतं. खरा प्रश्न उभा राहतो जेव्हा करिअरवर वेगवेगळ्या प्रकारे या गर्भावस्थेचा परिणाम व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे अनेकदा गर्भावस्था महिलांच्या करिअरमधला अडसर समजली जाते.
खरंच गर्भावस्था ही करिअरमधला अडसर आहे की तो आपण करून घेतला आहे, असा प्रश्न उभा राहतो.
पण म्हणूनच सेरेना विल्यम्सने टेड टॉक्सला नुकतीच दिलेली मुलाखत फार महत्त्वाची वाटते. तेविसावी टेनिस आॅस्ट्रेलियन ओपन ग्रड स्लॅम स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच ती गर्भवती असल्याची बातमी तिला समजली. अर्थातच, याचा तिला ताण वाटू लागला. कारण स्टेफी ग्राफचं रेकॉर्ड मोडायचं एक मोठं ध्येय अनेक वर्षांपासून तिच्या डोळ्यासमोर होतं. ते असं एका झटक्यात नाकारणं तिला शक्य नव्हतं. वयाच्या १७ व्या वर्षापासून टेनिस हा श्वास मानलेल्या या मुलीला न खेळताच असं हरणं काही मान्य नव्हतं. 
मात्र गर्भारपण सुरू झालेलं होतं. आपल्याला जमेल का? थकवा आला तर काय? पोटातल्या बाळाचं काय, असं विचारांचं चक्र सुरू होणार होतंच. मात्र या विचारांनी मनाचा ताबा घेण्यापूर्वीच तिनं ही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. ती खेळली नेहमीसारखीच. जोशात. तडाखेबाज आणि जिंकलीही. 
त्यानंतर अनावधानाने सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोंमुळे ती गर्भावस्थेत असल्याचं लोकांना समजलं. चर्चेला उधाण आलं. त्या साऱ्या गलक्याकडे दुर्लक्ष करत सेरेना सांगते, ‘येणाऱ्या बाळाबद्दल मी अतिशय उत्सुक आहे. आयुष्यातला हा टप्पा आनंदानं जगते आहे. मात्र हा टप्पा म्हणजे माझ्या खेळाचा शेवट नक्कीच नाही. शारीरिकरीत्या मी एकदम फिट आहे. अजून कित्येक वर्षे मी खेळेल आणि माझं मूल तो खेळ प्रेक्षकांत बसून मला चिअर अप करेल!’
सेरेनाचा हा आत्मविश्वास बोलका आहे.
कारण केवळ खेळातच नाही तर अनेक क्षेत्रांतही अशी जोडपी आहेत की, ज्यांना वाटतं की मूल झालं की करिअरमध्ये अडचणी येतात. मूल झाल्यावर घर किंवा करिअर यापैकी एकच काहीतरी निवडावं लागतं. नाइलाज म्हणून किंवा समाजाच्या दबावापोटी घर व मूल स्वीकारण्याचा पर्याय मुली निवडतात तेव्हा त्या कुठलाच आनंद मनमुराद लुटू शकत नाहीत. मग आयुष्यभर कुढत बसतात. 
तर काहीजणी मूल नाकारत करिअरच्या दिशेनं जगणं दामटत राहतात.
या दोन्हींचा मध्यम मार्ग असा काही काढता येऊ शकतो का?
करिअर करणाऱ्या काही मैत्रिणींशी याविषयी गप्पा मारल्या. इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणारी पत्रकार एक वर्षाच्या मिहिकाची आई अमृता दुर्वे सांगते की, सतत कामाची सवय असल्यानं मीही गरोदरपणात काम केलंच. कारण गर्भारपण म्हणजे काही आजार नाही. डॉक्टरांचा सल्ला मात्र यात घ्यायला हवाच. मूल होणार म्हणून घरी नऊ महिने नुस्त बसून 

राहायचं ही कल्पनाही असह्य होती. काम करताना कुठेही थकवा जाणवला नाही. लहानसहान कुरबुरी असायच्या, पण कामात त्या फार जाणवल्या नाहीत. उलट अधिक उत्साही वाटायचं. पावसाळा असल्याने टॅक्सी करायचे. रोजचे टॅक्सीचालकही या काळात काळजी घ्यायचे. सहकाऱ्यांनी खूप मदतही केली. सातव्या महिन्यापर्यन्त शो अ‍ॅँकरही केले. आॅफिसमध्ये कोणीही तू गरोदर आहेस तर हे काम करू नकोस असं सुचवलंदेखील नाही. उलट लाडच पुरवले. आपण घेतलेला निर्णय योग्यच ठरल्याचं अमृता सांगते. 
बॅँकेतून रिटायर झालेल्या ६० वर्षांच्या, दोन नातवंडाची आजी असलेल्या, नीता पांढरे सांगतात ‘बॅँक देईल तेवढीच रजा बाळंतपणासाठी मिळे. त्यामुळे घरी बसणं गरोदर काळात शक्य झालं नाही. कारण कुटुंब जगवणं ही पहिली गरज होती. त्यामुळे स्वत:चे लाडकोड करण्याची चैन परवडणारी नव्हती. त्यामुळे मुलीनं- सुनेनं ही चैन करावी असं मनापासून वाटत असलं तरी त्यांना काम करताना जास्त आनंद वाटतो तर तो आनंद इतरांनी हिरावून घेऊ नये. 
ऐश्वर्या राय असो की करिना कपूर, या सेलिब्रिटींनीही आपल्या गर्भारपणात काम थांबवलं नाही. जुदाई चित्रपटात एका सिनची गरज म्हणून श्रीदेवी गर्भार असताना धावलीही होती. 
ही झाली काही लोकप्रिय, माहितीतली उदाहरणं. मात्र अनेकजणी आता गरोदरपणात काम करतात. आपण गरोदर आहोत, आजारी नाही हे स्वत:ला आणि इतरांनाही समजावून सांगतात. आणि आपण गरोदर असणं एन्जॉय करतात.
अर्थात आपलं गरोदरपण एन्जॉय करत काम करणं आणि अट्टाहासानं डॉक्टरांनी सुचवूनही आराम न करणं यात फरक आहे हेही समजून घेतलं पाहिजेच.