तिला भेटल्या की आजही बायका मोकळ्या होतात.. बदलू म्हणतात!
 
कितीतरी ठिकाणी  मी ‘व्हय, मी सावित्रीबाई’चे प्रयोग केले. सावित्रीचं बोट धरून कुठेकुठे फिरले. किती आयाबायांना आतूनबाहेरून बदलताना पाहिलं....आता इतकी वर्षं झाली, पण ही सावित्रीची भूल उतरत नाही. तिची ऊर्जा अक्षय आहे...- सुषमा देशपांडे
 
आज ३ जानेवारी. सावित्री माझ्या बरोबर आली, त्याला आज २८ वर्षं पूर्ण झाली. गेली इतकी वर्षं ‘व्हय, मी सावित्रीबाई’ करते आहे. सावित्रीबाई फुले यांच्यावरला एकपात्री प्रयोग. ‘का?’ असं कोणी विचारलं तर त्याचं विशिष्टच उत्तर आहे असं नाही. मी मूळची पत्रकार. बारामतीची. शेता-गावात वाढलेली. एका क्षणी वाटलं, मला जिथं, ज्या लोकांपर्यंत पोचावंसं वाटतंय ते शब्दांतून साध्य होत नाही की काय? मग नवं माध्यम हाताळावं असं वाटलं. 
मला आठवतं, अंजोरच्या, माझ्या मुलाच्या जन्मावेळी मोठा काळ मी सगळं काही काळासाठी बंद करून घरात बसले होते. जे करायचं ते उत्कृष्ट करायचं, नाही तर नाहीच ही माझी वृत्ती. मी घरी बसून वाचनाला वेळ देत होते. दरम्यान, माझा मित्र वसंत पोतदार एकदा म्हणाला की, ‘तू सावित्रीबाई फुलेंवर काही काम का करत नाहीस?’ 
 
 
- माझ्यासमोर काहीतरी लख्खकन चमकलं. मी राम बापट यांच्याकडे गेले. ते म्हणाले, ‘तू कर सावित्रीबार्इंवर काम. मी तुला देतो पुस्तकं.’ मग त्यांच्याकडून पुस्तकं आणणं, ती वाचणं आणि परत नवं पुस्तक आणायला जाणं असा सिलसिला चालू झाला. एकदा अशीच पुस्तकं परत करायला गेले होते. त्याचवेळी पुण्यात कोथरूडमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आली होती. आता आपण रोज बलात्काराच्या बातम्या ऐकतो-वाचतो, तसं तेव्हा नव्हतं. ते मनात घोळत होतंच. मी एकाएकी सरांना विचारलं की, ‘सावित्री समजा आज असती तर तिनं काय केलं असतं या अशा वेळी?’ - या प्रश्नानंच या प्रयोगाचं बीज पाडलंं. 
 
 
मला रस्ता सापडल्यावर मी सरांना म्हणाले, ‘सावित्री स्वत:चा इतिहास, संघर्ष स्वत:च सांगेल, त्याला समकाळाशी जोडत बोलत राहील...’ मी सरांना मग रोज अशा कल्पना सांगायचे. सांगतानाही स्वत:शीच बोलत असायचे खरंतर. माझ्या मनीचं लिखाणातून उतरत गेलं त्याचं सर्व श्रेय त्यांचंच. दरम्यान, वाचणं, शोधणं, समजून घेणं सुरूच होतं. मी संदर्भासाठी काही अंक शोधायला दिल्लीला गेले होते. तिथे मला मधू लिमये भेटले. ते म्हणाले, ‘पीएचडी केल्यासारखं काम नको करूस. उत्स्फूर्त लिहून टाक’.
 
मी संदर्भासाठी काही अंक शोधायला दिल्लीला गेले होते. तिथे मला मधू लिमये भेटले. ते म्हणाले, ‘पीएचडी केल्यासारखं काम नको करूस. उत्स्फूर्त लिहून टाक.’ ...मग मी लिहित गेले. ते करताना लक्षात आलं की लिखाणाची आणि परफॉर्मन्सची प्रोसेस वेगळी असते. त्यादरम्यान एक दुसरंही नाटक मी बसवलं. त्यातून ही प्रोसेस शिकले. ३ जानेवारी १९८९ ला ‘सावित्री’चा पहिला प्रयोग झाला! त्यानंतर ग्रामीण बायकांसोबत काम सुरू केलं. लहान गावांत. स्टेज नाही, लाइट, म्युझिक नाही अशा पार्श्वभूमीवर प्रयोग करून पाहिले. त्या आयाबायांमध्ये भेटत राहिलेल्या सगळ्या जिवंत सावित्रींनी मला समृद्ध केलं. या बायकांना आतूनबाहेरून बदलताना पाहता आलं. संधी मिळाली की बायका त्या संधीचं कसं सोनं करतात, हे पाहिलं मी. माझी बहीण म्हणते की, ‘हेवाच वाटतो तुझा.. या इतक्या निर्मळ बायका तुझ्या अवतीभवती असतात हे बघून.’ 
 
एका टप्प्यावर मी ‘सावित्रीबाई’ हिंदीतही केलं. प्रख्यात नृत्यांगना मलिका साराभाई यांना त्याचं श्रेय जातं. मला कधी प्रसिद्धी, प्रतिष्ठेचं आकर्षण नव्हतं. पैसेही मिळाले. ते नाकारायचं काही कारण नव्हतं. मला जगायला पुरतील इतके पैसे मिळत. कुठे मिळायचेही नाहीत. मग ते प्रयोग तसेच करायचे. मी करत राहिले. एका टप्प्यावर मला वाटलं, की नक्की ‘पोचतंय’ का ‘सावित्री’? कारण प्रेक्षक म्हणून तिथं असलेले लोक प्रयोग पाहिल्यावर ‘इमोशनली चार्ज’ होतात. पण मग पुढं या ऊर्जेचं काय होतं हे मी पाहू अन् अनुभवू शकत नाही. ते काय करतील वा नाही हे माझ्या हातात नसतं. त्यासाठी विचारांची प्रक्रिया, ऊर्जा कृतीत उतरवण्यास प्रेरणा देणारी माणसं आजूबाजूला असावी लागतात. ज्या मुलींनी खूप काळापूर्वी हा प्रयोग पाहिला त्या आता आया झाल्या आहेत. त्या म्हणतात, ‘आम्ही आमच्या मुलींना हा प्रयोग दाखवायचं असं ठरवलंच होतं. आम्ही मुलीला खूप विचारीपणे वाढवलं त्याचं श्रेय तुम्हाला आहेच.’ 
 
 
हे माझं म्हणजे सावित्रीचं श्रेय!
कुणाततरी काहीतरी रुजतं हे नक्की. मी ‘थिएटर जर्नालिझम’ म्हणेन या सगळ्या धडपडीला.
इतकी वर्षं हे करीत राहीन हेही नक्की नव्हतं स्वत:शी. आज काळ अजून अवघड, असुरक्षित बनलाय. आता खूप जणी पुढं यायला हव्यात ‘सावित्री’ करायला. राजकारणाच्या आखाड्यात ‘महात्मा फुले-सावित्रीबाई फुले’ ही नावं वापरून-वापरून इतकी गुळगुळीत केली गेली आहेत, की वर्तमानासाठी या जोडप्याची महत्ता नीट उलगडूच शकलेली नाही. 
 
 
गेल्या दोन वर्षांपासून फक्त हिंदी प्रयोग करतेय. हे प्रयोग मी अझीम प्रेमजी फाउंडेशनतर्फे करत असते. हिंदी भाषिक पट्ट्यातल्या या प्रयोगांना खूप पुरुषही असतात. त्यांना सावित्रीबाई फुल्यांची ही कहाणी ‘हे बायकांचं बायकांसाठी’ असं वाटल्याचं कधी जाणवत नाही. आता प्रयोगानंतर मी सांगते, की कुणीही हा प्रयोग करू शकता. याचे हक्क खुले आहेत. मी मध्यंतरी शिबिरही घेतलं. त्यात सत्तावीस मुलींना प्रयोगासाठी प्रशिक्षित केलं. म्हटलं राहा आता तुम्हीच उभ्या सावित्री म्हणून! त्यात आलेली कोकणातली सोनाली पाटील खूप प्रयोग करते आहे. आता अजून काहीजणी करतील, नव्यानं करतील. त्यांचं स्वागतच आहे! 
 
 
या प्रयोगादरम्यान आणि नंतरही मिळणारे अनुभव कमालीचे उत्कट असतात. बायका रडतात, मोकळ्या होतात. दिल्लीत एका संघटनेच्या बायका आल्या प्रयोगाला. म्हणाल्या, ‘आमच्यात संघटना पातळीवर बरेच ताणतणाव होते. हे पाहिल्यानंतर आता काहीच उरलं नाही. सगळं मोकळं झालंय.’ 
एक बाई जवळ आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली, ‘अबके बाद मेरा तो खून का रिश्ता लगा तेरे सावित्री के साथ!’ उत्तराखंडमध्ये प्रयोग असताना एक तरुण शिक्षिका आली. म्हणाली, ‘मुझे पहले सावित्री पता नहीं थी. अब मैं बहोत अच्छी, सावित्री जैसी टीचर बनने की कोशिश करूंगी.’ 
भाषा, संस्कृती आणि अजूनही कोणकोणती अंतरं ओलांडत ‘सावित्री’ जिवंतपणे पोचत राहते.. माणसांकडून माणसांपर्यंत!! अनेकजण मला ‘सावित्री’ म्हणूनच हाक मारतात. ‘तुम्ही त्या ‘सावित्री’च ना?’ असं सतत विचारत असतात. सावित्रीला सोबत घेऊन जगण्याचं मला ओझं नाही वाटत. 
 
- मागं पाहते तेव्हा वाटतं, मी सावित्रीचं बोट धरून आयुष्य जगले. तिचा धाक असतो मला ! लहान-मोठा कुठलाही निर्णायक क्षण असो, ती मला चुकीचं वागू देत नाही. ‘सावित्री’ व्यक्ती म्हणून फार वेगळा संस्कार मला देत आली आहे. वाटत राहतं, मी कशी हिची उतराई होऊ?(शब्दांकन : शर्मिष्ठा भोसले)