Right to Drive | राइट टू ड्राइव्ह : जगभरातल्या स्त्रियांच्या आयुष्यात डोकावणारी खिडकी

- कलीम अजीम
नवं वर्ष सौदी अरेबियातील महिलांसाठी क्रांतिकारी वर्ष ठरणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सौदी सरकारनं महिलासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे. सौदीचे राजे किंग सलमान यांनी महिला आणि मुलींना बाइक चालवण्याची परवानगी दिली आहे. सौदी सरकारनं आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला कल्याणाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तूर्तास बाइक, ट्रक आणि कार चालविण्यावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. यासह महिलांना स्पोर्ट्स स्टेडियममध्ये एण्ट्रीची परवानगी देण्यात आली आहे. यासह अजून एक महत्त्वाचा निर्णय सौदी सरकारनं घेतला आहे, तो म्हणजे देशातील सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी सौदी सरकारनं दिली आहे. भारतच काय तर इतर देशातील नागरिकांसाठी ही गोष्ट फुटकळ वाटू शकते, पण सौदी महिलांसाठी हे निर्णय एक पर्वणी आहे.

आॅक्टोबर महिन्यात सौदीत महिलांच्या ड्रायव्हिंगवरचे निर्बंध उठवण्यात आले, तर डिसेंबर महिन्यात म्हणजे आठ दिवसांपूर्वी सौदीच्या शाही सरकारने दोन महत्त्वाचे निर्बंध उठवले. पहिली म्हणजे महिलांना बाइक आणि ट्रक चालविण्याची परवानगी दिली, तर दुसरं म्हणजे देशात तब्बल साडेतीन दशकानंतर सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सौदी सरकारने घेतला.
या निर्णयामुळे सौदीतील स्थानिक महिलांपेक्षा आणि नोकरीसाठी त्या देशात असलेल्या परदेशी महिलांना मोठा फायदा मिळू शकेल. पण या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला आणखी थोडासा वेळ लागेल. मार्च महिन्यापासून सिनेमागृह सुरू होतील. तर प्रत्यक्ष ड्रायव्हिंगसाठी जूनपर्यत थांबावं लागणार आहे.

१९९० साली कायद्यात सुधारणा करत सौदी सरकारनं महिलांच्या ड्रायव्हिंगवर निर्बंध लादले. त्या काळात शाही परिवाराविरोधात उघड बंड करणं अशक्य होतं. त्या काळात बंडखोरांना थेट जेलमध्ये टाकण्यात येई, तरीही परिणामांची पर्वा न करता तब्बल ४७ महिलांनी शाही परिवाराच्या निर्णयाचा बहिष्कार करत रियाधच्या रस्त्यावर गाड्या चालवल्या. या महिलांना अटक करण्यात आली. सौदीतील विद्वान धर्मगुरुंनी या महिलांविरोधात कायदेशीर आदेश काढत महिलांना ड्रायव्हिंगला बंदी केली. ‘महिलांनी गाडी चालवली तर त्यांची जवळीकता पुरुषांशी वाढेल आणि त्यातून अनैतिक कामं होतील’ अशा हास्यास्पद आदेशाला सौदीच्या शाही परिवारानं मान्यता दिली. विरोध करणाºया महिलांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येऊ लागले. पण महिलांचा विरोध कायम होता. कार ड्रायव्हिंगवरील निर्बंध उठवण्याची मागणी सातत्यानं सुरू झाली. सरकारनं याकडे दुर्लक्ष करत जेलभरो सुरू ठेवलं.

मात्र सौदीतील महिलांनी ‘वुमेन टू ड्राइव्ह मुव्हमेण्ट’ अशा नावे हे अभियान सुरूच ठेवलं. काही पुरुषांनीदेखील समर्थन दिलं. २०१४ साली दुबईच्या सामाजिक कार्यकर्त्या ‘लुजैन अल हथलौल’ यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सीमेवरून कार चालवत सौदीत प्रवेश केला. त्यांना सौदी पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर दहशतवादाचे आरोप ठेवून जेलमध्ये डांबण्यात आले. पण ड्रायव्हिंग बंदीविरोधात चळवळ सुरूच होती. अखेर सरकारनं नमतं घ्यावं लागलं. सौदीच्या महिलांचा लढा नक्कीच कौतुकास्पद आहे; पण अशा मूलभूत गोष्टी मिळवण्याकरिता महत्त्वाचा काळ आणि एनर्जी खर्च व्हावी यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं दुसरं असू शकत नाही.


(लेखक मुक्त पत्रकार आहेत.kalimazim2@gmail.com) 


Web Title: Right to Drive
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.