- यशोदा वाकणकर

आईबाबानं आम्हाला दोघींना
नगरपालिकेच्या शाळेत घातलं.
अर्थात मराठी माध्यम.
त्या शाळेनं आणि शाळेबाहेरच्या
वातावरणानं जे दिलं
त्याचं अप्रूप काय सांगू?

नुकताच मी ‘हिंदी मीडियम’ सिनेमा पाहिला. मला वाटलं की हा सिनेमा म्हणजे सध्याच्या काळात सर्व भारतीयांनी आवर्जून पाहण्याची गोष्ट आहे. उच्चभ्रू इंग्रजी माध्यमातल्या शाळा आणि त्याचं पसरलेलं स्तोम हे खूप छान पद्धतीनं या सिनेमात दाखवलंय. उच्चभ्रू इंग्रजी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळण्यासाठी पालक किती जिवाचं रान करून आटापिटा करतात हे पाहताना मजा येते.
मुलांना इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घालणं हे आजकाल इतकं नित्याचं झालं आहे की त्यात काही वेगळं वाटत नाही. भरपूर शुल्क, एक सो कॉल्ड उच्च वर्ग, फाडफाड इंग्लिश हे आजकाल खूपच प्रतिष्ठेचं समजलं जातं. त्यामुळेच सिनेमाच्या सुरुवातीपासून आपण प्रत्येक गोष्ट रिलेट करू शकतो आणि त्यात अडकत जातो. 
मला मात्र सिनेमातला वेगळाच भाग भावला. झोपडपट्टीतली दृश्यं, तिथल्या माणसांमधली आत्मीयता आणि नगरपालिकेची शाळा ! या गोष्टी बघितल्यावर डोळ्यांत टचकन पाणीच आलं. आणि लहानपणच्या खूप साऱ्या गोष्टी आठवू लागल्या. 
आमचं एक मध्यमवर्गीय कुटुंब. माझ्या आईबाबांनी मला आणि माझ्या ताईला पुण्यातल्या महानगरपालिकेच्या शाळेत घातलं. हे अर्थात त्यांनी विचारपूर्वकच केलं. आमच्या आजूबाजूच्या डॉक्टरांची मुलं कॉन्व्हेण्ट शाळांमध्ये जायची. आणि आम्ही दोघी येरवड्याच्या संत ज्ञानेश्वर विद्यालय या नगरपालिकेच्या शाळेत. 
शाळा झोपडपट्टीनं वेढलेली. त्यामुळे आम्ही दोघी डॉक्टरांच्या बंगल्यात राहणाऱ्या मुली आणि बाकी सर्व विद्यार्थी झोपडपट्टीतले आणि तिथल्या आसपासच्या वस्त्यांमधले. ताईच्या आणि माझ्या सगळ्या खास मैत्रिणीसुद्धा तिथल्याच. 
माझी आई मेंटल हॉस्पिटलमधली वरिष्ठ सायिकॅट्रिस्ट, तर माझ्या शेजारी बसणारी मैत्रीण नीतू, हिचे वडील मेण्टल हॉस्पिटलमधले एक शिपाई सेवक होते. वर्गातल्या अनेक मैत्रिणींचे आईवडील घरकाम, मजुरी, भाजी विकणे असे उद्योग करायचे. आणि त्यामुळेच पहिलीपासून मी समाजातलं वास्तव बघत गेले. 
अनेकांच्या मनात येऊ शकतं की झोपडपट्टीतली मुलं खूप अस्वच्छ असतील. पण तसं अजिबात नसायचं. शाळेत येताना सर्वजण व्यवस्थित अंघोळ करून, डोक्याला तेल आणि चेहऱ्याला पावडर कुंकू लावून यायच्या. माझी आई अनेकदा रविवारी या सगळ्या मैत्रिणींना घरी बोलावून त्यांची हाता-पायाची नखं कापून द्यायची. कुणाच्या डोक्यात उवा झाल्या असतील तर त्या काढून द्यायची. 
आमची नगरपालिकेची शाळा असल्यामुळे ती अत्यंत साधीसुधी होती. आम्हाला बसायला लाकडी बाक नव्हते तर आम्ही बसकरांवर मांडी घालून बसायचो. आजकाल सगळ्या नगरपालिकेच्या शाळांमधे कढी-खिचडीचं जेवण देतात. तेव्हा तसं जेवणही नाही द्यायचे. 
पण शाळेत आल्या आल्या सगळ्यांना भाजलेल्या दाण्याच्या पुड्या द्यायचे आणि काहीवेळा केळी दिल्याचं पण आठवतंय. मी ते दाणे आवडीनं खाऊन टाकायचे. ताई ते दाणे बाबाला आवडतात म्हणून त्याच्यासाठी घरी घेऊन यायची. तसंच वह्या-पुस्तकं पण सगळ्यांना मोफत मिळायची. पण ती खूप उशिरा यायची. त्यामुळे आईबाबा आमच्यासाठी आधीच घेऊन ठेवायचे. शाळेचा ड्रेस निळा स्कर्ट पांढरा ब्लाऊज होता. तेही सर्वांना मोफत मिळायचे. आई आमच्यासाठी ड्रेस घरी शिवायची. पण मी तो शाळेतून मिळणारा ड्रेसपण आवडीनं घालायचे. 
कधी शाळा सुटल्यावर मी नीतूबरोबर तिच्या वस्तीतल्या घरी गेले की ती घरची भांडी घेऊन कॉमन नळावर घासायला न्यायची. (हे मी पहिली-दुसरीत असतानाचं सांगते आहे!) मग मी पण नीतूला भांडी घासण्यात मदत करायचे. नीतू इतर पण बरीच घरकामं करायची. 
माझी शाळेतली मैत्रीण आशा तिच्या आजीबरोबर राहायची. तिची आजी रोज महिला उद्योगाचे पापड लाटायची. मग आशा पण आजीला भरपूर मदत करायची. किंबहुना, आशानं तसं करावं हे तिच्या घरी गृहीतच धरलेलं होतं. मी पण कुतूहलानं आशाबरोबर काहीवेळा पापड लाटले होते. 
माझ्या अनेक मैत्रिणी वैदू समाजातल्या होत्या. मी तिसरी- चौथीत असताना, त्यापैकी अनेक मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिल्याचं चांगलंच स्मरतंय! त्या लाल मोठं कुंकूसुद्धा लावायच्या. त्यांचे बालविवाह झाले होते. इतक्या लहानपणापासून समाजातलं वास्तव पाहत असल्यामुळे बालविवाह या शब्दाचा अर्थ मला तिसरीत असतानाच नीट समजू लागला होता. पण अर्थातच त्या मुली अजून वयात आल्या नसल्यानं आईवडिलांकडेच राहत होत्या. 
ताई आणि मी आमच्या मैत्रिणींकडे राहायलासुद्धा जायचो. आईबाबा आम्हाला त्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. शिवाय आम्हीसुद्धा त्या मैत्रिणींना घरी राहायला बोलावायचो. 
ताईची आरती नावाची मैत्रीण नागपूरचाळीत राहायची. तिच्याकडे ताई जायची, आणि मी नीतूकडे. राहायला गेल्यावर समजायचं की एका खोलीत सात-आठ माणसं कशी सुखानं राहतात. पंख्याशिवाय कशी झोपतात आणि दुसऱ्या दिवशी सार्वजनिक शौचालयाचा अनुभव. इतक्या लहानपणी या गोष्टी प्रत्यक्ष बघितल्यामुळे आईबाबांना आम्हाला वेगळं काही शिकवावंच लागलं नाही. 
मैत्रिणींकडे नेहमी अ‍ॅल्युमिनियमच्या ताटल्या आणि भांडी असायची. घरी सगळं स्टीलचं असल्यामुळे हे वेगळंच वाटलं होतं. पण मला ते आवडायलासुद्धा लागलं होतं. एकदा मी माझी वैदूवाडीत राहणारी मैत्रीण देवी हिच्याकडे जेवायला गेले होते तर तिने शेजाऱ्यांकडून माझ्यासाठी स्टीलचं ताट उसनं आणलं होतं. ते बघून मला तर भरूनच आलं होतं. 
पावसाळ्यात नदीला पूर यायचा तेव्हा सर्व झोपड्यांमध्ये पाणी शिरायचं. पूर्ण झोपडपट्टी आमच्या शाळेत राहायला यायची. शाळा आठ दिवस बंद. बाबा आम्हाला ते पाहायला घेऊन जायचा. 
आता या सर्व आठवणींना अनेक वर्षं लोटली तरी या आठवणींचे स्क्र ीन शॉर्ट्स मनात पक्के म्हणजे पक्के बसले आहेत. ते डिलीट होणं शक्यच नाही! मी आणि माझा नवरा जगात अनेक देशांमध्ये फिरलो. उत्तमोत्तम क्रॉकरीज आणल्या. पण तरीही मी ती अ‍ॅल्युमिनियमची थाळी आणि त्यातला चवदार डाळ भात काही विसरत नाही. त्यातलं प्रेम आणि आत्मीयता विसरत नाही. 
खेड्यांमधून सोलो ट्रॅव्हल करत असताना सार्वजनिक शौचालयात जायला मी कचरत नाही. कुठल्याही विहिरीचं पाणी मी आनंदानं पिऊ शकते. 
म्हणूनच आज ‘हिंदी मीडियम’ सिनेमा बघत असताना का कुणास ठाऊक मला मराठी माध्यमात शिकल्याचा खूप खूप आनंद होत होता.