बाजरीच्या खजुऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, November 07, 2017 4:09pm

बाजरीच्या भाकऱ्या तर खातोच पण बाजरीचा हा विशेष पदार्थ म्हणे आमच्या भागात सुगरणीचं खास कौतुकच!

- शीला मखरे

बाजरीच्या खजुऱ्या म्हणजे नगर जिल्ह्याचं विशेष. आमची आई पुणतांब्याला असताना हा पदार्थ नेहमी करायची. तर डबलका मीठा आणि हरारा हे पदार्थ खास बीडचे. डबलका मीठा हा पदार्थ बिर्याणीसोबत केला जातो तर हरारा हा पदार्थ खास बाळांतपणात खायला देतात. हे तिन्ही पदार्थ नुसते जिभेलाच आनंद देतात असं नाही तर आरोग्यदायीही आहेत.

बाजरीच्या खजुऱ्या साहित्य : एक वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ (गव्हाचं पीठ घातलं नाही तरी चालतं) अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ, वेलची पूड, तीळ आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृती : प्रथम बाजरीचं पीठ चाळून घ्यावं. त्या पिठात गव्हाचं पीठसुद्धा चाळून घालावं. थोडी वेलची पूड किंवा जायफळ टाकावं. अर्धी वाटी गूळ थोड्या पाण्यात विरघळून घ्यावा. नंतर ते गुळाचं पाणी आणि तीळ टाकून पीठ चांगलं मळून घ्यावं. पीठ मळल्यानंतर दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवावं. नंतर त्याची मोठी पोळी किंवा भाकरी लाटून घ्यावी. चाकूनं त्या पोळीच्या चौकोनी वड्या कापाव्यात. आणि त्या वड्या तेलात किंवा तुपात छान तळून घ्याव्यात. यालाच बाजरीच्या खजुऱ्या म्हणतात.

डब्बलका मीठा साहित्य : टोस्ट, काजू, बदाम, पिस्ते, मनुके, तूप, साखर आणि दूध.

कृती : टोस्टचे दोन तुकडे करायचे. पातेल्यात तूप गरम करावं. तुपात टोस्टचे तुकडे चांगले परतून घ्यावेत. त्यात मनुके, बदाम, पिस्ते, काजू टाकावेत. ते चांगलं परतून घ्यावं. नंतर त्यात साखर टाकावी. किंवा थोड्या दुधात साखर विरघळून घ्यावी. ते दूध टोस्टवर ओतावं. मिश्रण चांगलं उकळू द्यावं. झाला डबलका मीठा तयार. कोणी त्यात केशरसुद्धा घालतात.

हरारा साहित्य : गव्हाचं पीठ, साखर, चिमूटभर मीठ, देसी तूप, मनुके, बदाम, काजू आणि पाणी.

कृती : गव्हाचं अर्धी वाटी पीठ तुपात चांगलं परतून घ्यावं. नंतर त्यात बारीक केलेले मनुके, बदाम, काजू टाकावेत. अर्धी वाटीच्या निम्मी साखर आणि उकळलेलं पाणी घालून ते मिश्रण पातळ पेजीसारखं करावं. हा पदार्थ बाळांतपणात खूपच फायदेशीर ठरतो.

संबंधित

माझं ऐक, शांत बस!
गिफ्ट आपलंच आपल्याला
हसीना; वेदनेची अस्वस्थ करणारी गोष्ट..
गरमागरम देसी सूप
व्यायामाचा पॅक्ट; जाणून घ्या अमेरिकेतील पॅक्ट या अ‍ॅपबद्दल

सखी कडून आणखी

कॉल फॉरवर्ड
तिखट की झणझणीत; जाणून घ्या बारकावे
पित्ताशयात खडे; हे उपाय ठरतील फायद्याचे
बोला; पण सांभाळून!
क्रेडिट कार्ड : मर्यादा ओलांडली गेली तर कर्जाचा डोंगर अटळ

आणखी वाचा