- मनीषा सबनीस

आपल्याला एक मन असतं, तसं एक शरीरही असतं! शरीराची दुखणी-खुपणी पाहावी लागतात, 
त्याचं थोडं कोडकौतुक पुरवणंही अनेकींना आवडतंच! घडत नाही, तो त्या शरीराशी ‘संवाद’!- त्यासाठी एक दार उघडावं लागतं!मनाचं दार...

नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं. इतर प्लॅन्सबरोबरच यावर्षी जरा स्वत:ला ओळखण्याचा विषयही आपल्या वार्षिक कॅलेंडरमध्ये ठेवूयात का? आता तुम्ही म्हणाल, स्वत:ला ओळखण्याचा विषय ही काय भानगड आहे? मी ओळखतेच की मला!
- पण इथे मला जरा वेगळं म्हणायचंय. आपण एक ‘बाई’ आहोत. बाई असणं म्हणजे नक्की काय? सगळ्या बायकांमध्ये कॉमन काय आहे? 
- उत्तर सोपं आहे. 
सगळ्या बायकांमधली समानता म्हणजे त्यांचं शरीर.
मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर मरेपर्यंतचं आयुष्य हे या बाईच्या शरीराभोवतीच तर विणलेलं असतं. एक सजीव, मनुष्यप्राणी - निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती जन्माला घालण्याचं, त्याचं पालनपोषण करण्याचं काम करते ती आई म्हणजे स्त्री. निसर्गानं त्याचं हे महत्त्वाचं आणि अवघड काम स्त्रीला दिलं आहे. म्हणूनच बाईचं, म्हणजे आपलं महत्त्व वादातीत!आता बाईच्या या मातृत्वामागे काय आहे? या मातृत्वाचा आधार काय आहे? तर ती आहे ‘लैंगिकता’. ‘लैंगिकता’ या शब्दानं दचकू नका. 


लाजू नका किंवा तिला तुच्छही लेखू नका. आणि हो, लग्न होण्या न होण्याशीही त्याचा संबंध नाही हेही लक्षात ठेवा. आपण स्त्री म्हणून जन्माला आलो त्या क्षणापासून ती आपली झालेली असते.
लैंगिकता हा आपण माणूस असण्याचा गाभा! त्यावरच आपली बाई किंवा पुरुष असण्याची ओळख आहे. त्यावरच आपली वागणूक, जगाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आधारलेल्या आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यभरच्या प्रवासात ही आपली साथीदार आहे.


बाईपणाबद्दलच्या आपल्या विचारात स्पष्टता येण्यासाठी सध्या चर्चेत असणाऱ्या ‘सरोगेट मदर’, ‘लिव्ह इन रिलेशन’, ‘मुलगा-मुलगी’ मध्ये समाज करीत असलेला भेद आणि त्याची कारणं, कितीही शिकल्या तरी मुलीच्या वाट्याला येणारी कमीपणाची भावना, स्वत:च्या शरीराबद्दल, शरीरा-मनाच्या आजाराबद्दल स्पष्टपणे न बोलण्याची पद्धत, नीतिमत्ता, ‘पातिव्रत्य’ इ. व्याख्या व या सगळ्यात होत असलेले बदल या सगळ्यावर या वर्षात थोडं बोलण्याचा मानस आहे.


बाई म्हणून कोणाची मुलगी, कोणाची बहीण, कोणाची बायको, कोणाची आई अशी वेगवेगळी नाती निभावताना ‘मला नक्की काय हवं आहे?’ 
- हे समजावून घेण्याच्या प्रयत्नाची एक ठळक वाट स्त्रीच्या शरीर-भानातून जाते, हे नक्की!
स्वत:ला ओळखणं, स्वत:ला हवं ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणं, स्वत:चा आनंद शोधणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. 
ती एक सहजप्रवृत्ती आहे आणि जी व्यक्ती स्वत: आनंदी नसते ती इतरांना आनंद कसा देऊ शकेल? 
- कसा शोधायचा हा आनंद? 
त्याची सुरुवात पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ या कादंबरीतील एका गोष्टीनं करूया. 
गोष्टीचं नाव आहे ‘लच्छी आणि आजी’.
एक असते लच्छी. गावाबाहेरच्या जंगलात एका छोटुकल्या झोपडीत ती आणि तिची आजी राहत असतात. दिवसभर दोघीजणी काम करतात. दिवसापुरतं अन्न मिळवतात नी सुखात जगत असतात. एके दिवशी संध्याकाळी एक सुंदर मोर लच्छीच्या अंगणात येतो. आपला पिसारा फुलवून खूप नाचतो. लच्छी खूश होते. मोराची सांडलेली पिसं गोळा करून ठेवते. पुन्हा मोर अंगणात येण्याची वाट बघते. दुसऱ्या दिवशी पण मोर येतो. त्या दिवशी मोराबरोबर लच्छीपण नाच करते. खूप खूप खूश होते. थोडे दिवस हा सिलसिला सुरू राहतो. 


एके दिवशी का कोणास ठाऊक, मोर लच्छीच्या अंगणात येत नाही. लच्छी वाट बघून दमते. दु:खी होते. पण मोर काही येत नाही. ...मग आजी लच्छीला समजावून सांगते, ‘हे बघ बाळा, मोर आला, त्यानं नाच केला तर आपण खूश होणं साहजिक आहे. पण मोर जर आला नाही, तर आपणच मोर व्हायचं, आपण आपल्यासाठी नाच करायचा नी मनापासून खूश राहायचं. आपल्या खुशीसाठी कोण्या दुसऱ्या मोराची गरज नाही. आपणच आपल्याला खूश ठेवायचं.’ हे आनंदाचं सूत्र लच्छीच्या आजीनं तिला दिलं, आणि लच्छीचा मोर तिच्या मनातच नाचू लागला.
या गोष्टीचा आपल्या आयुष्यातला आपल्यापुरता अर्थ जाणणं महत्त्वाचं!
- तोच प्रयत्न करूया!!
आणि त्या प्रयत्नात आपल्याच शरीराशी नव्यानं संवाद साधण्याच्या शक्यता शोधूया.
...त्यासाठी आधी मनाची दारं उघडूया!

 

(लेखिका वित्त-अधिकारी असून, ‘लैंगिक शिक्षण आणि मानसशास्त्र’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ) shubhaprabhusatam@gmail.com