Pakistani writer Fahmida Riaz has gone but India will never forget the message given by her! What was the message? | पाकिस्तानी लेखिका फहमिदा रियाज गेल्या पण त्यांनी दिलेला संदेश भारत कधीच विसरणार नाही! काय होता तो संदेश?
पाकिस्तानी लेखिका फहमिदा रियाज गेल्या पण त्यांनी दिलेला संदेश भारत कधीच विसरणार नाही! काय होता तो संदेश?


-मेघना ढोके 

इथं राहणा-या  कुणाही सामान्य पाकिस्तानी माणसाला विचारा, आम्ही सतत उदाहरण देतो भारताचं ! इंडिया हमारे लिए एक जिंदा मिसाल है, कम्युनकल हार्मोनी और खुलेपन की ! 

आम्ही नेहमी सांगतो की, बघा जरा, एकाच वेळी स्वतंत्र  देश म्हणून आपण प्रवास सुरू केला. भारत कुठं पोहचला, कुठं आहोत आपण? कुठं जातोय? कुठल्या दिशेनं प्रवास करतोय? जे भारताला जमतं ते आपल्या देशात का जमू नये? पण माझ्यासारख्यांचे असे आवाज आमच्या देशात ‘हिंदुस्थानप्रेमी’ म्हणून दडपले तरी गेले नाहीतर आझाद जगण्याची मागणी करणार्‍यांची देशनिकाली तरी झाली ! देशनिकालीची ही अवस्था मी जगले आहे. माझ्याच देशातून हद्दपार होत दोन लहान मुलांना घेऊन दिल्लीतच राहिले होते. पण मला तिथं कुणी परकेपणाची वागणूक दिली नाही. भारताच्या मातीतच माणसांना सामावून घेण्याचा अद्भुत गुण आहे.  आमच्या देशातल्या मातीत जो द्वेष, जो विखार उगवला तो सुदैवानं तुमच्या देशातल्या मातीत रुजला नाही, ही भारताची मोठी ताकद आहे.

ज्या विखारी जगात आम्ही जगतोय, तिथल्या घुसमटीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तरीही आम्ही बोलतो आहोत. लेखक म्हणून इथं बोलण्या-लिहिण्यावर किती पाबंदी तरी झगडतो आहोत आणि त्याची भलीभक्कम किंमतही मोजतो आहोत.  लेखकानं आपल्या शब्दाची किंमत मोजायचीच असते, त्यात मोठं असं काय आहे? ती किंमत मोजली तरच तुमच्या शब्दाला वजन येतं. जनतेला वाटतं की, हा माणूस नुस्ता बोलत नाही, तर व्यक्तिगत जीवनातही त्यासाठी बरंच मोल चुकवतोय !  बुद्धिवाद्यांच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा मिळणं अवघड असतं म्हणतात, पण का? तर कथनी आणि करणीत अनेकदा लोकांना अंतर दिसतं ! ते अंतर दिसलं की लोकही बुद्धिवाद्यांना अंतर देतात. तसं होऊ नये!

लेखकांच्या नुस्त्या प्रतीकात्मक कृतीवर लोक तरी का विश्वास ठेवतील? त्यामुळे लेखक-विचारवंतांची जबाबदारी जास्त वाढली आहे. कारण माहौल खराब होतो आहे.
हिंदुस्थानात तर सलोख्याचा, सांझी जिंदगीचा माहौल किती वर्षे जुना आहे. नुस्ती संस्कृती नाही, तर ती ताकद आहे हिंदुस्थानाची ! म्हणून हिंदुस्थानाकडे मोठय़ा आशेनं पाहणार्‍या माझ्यासारख्यांना वाटतं की, हा सुजाण-सुसंस्कृत-बहुविध जगण्याचा वारसा जपायला हवा. जो जिंदगी सुकून की है. वो और खुशहाल बने! पडोस में रह कर यही मेरी आस है!!

कोण होत्या फहमिदा रियाज?

या पाकिस्तानातल्या ज्येष्ठ कवी, लेखक आणि कार्यकर्त्या. त्यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातल्या उत्तर प्रदेशात मेरठमध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षणतज्ज्ञ होते. शिक्षणव्यवस्थेसंदर्भात काम करण्यासाठी त्यांचे वडील सिंध प्रांतात गेले आणि मग कुटुंब तिकडेच हैदराबादमध्ये स्थायिक झाले. डाव्या विचारांचे कार्यकर्ते असलेल्या जफर अली उजन यांच्याशी विवाहानंतर त्या दोघांनी ‘आवाज’ नावाचं मासिक सुरू केलं. मात्न सरकारच्या विरोधात बोलणा-या या मासिकातील त्यांच्या लेखांमुळे त्यांच्यावर अनेक खटले घातले गेले. अनेक दिवस तुरुंगात गेल्यावर  1981 ते 1987 या काळात त्या भारतात विजनवासातही राहिल्या. होत्या. पुढे बेनझीर भुत्ताे सत्तेत आल्या त्यानंतरच त्यांना पाकिस्तानात परतता आलं. आपल्या लेखन-स्वातंत्र्यासाठी आणि विचारांसाठी फहमिदा यांनी आपल्या लहानग्या लेकरांसह अनेक वर्षे परवड सहन केली. 
मात्र त्या कायमच आपल्या विचारांना, लेखन-स्वातंत्र्याला बांधील राहिल्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्यावर ठाम राहिल्या. 

sakhi@lokmat.com


Web Title: Pakistani writer Fahmida Riaz has gone but India will never forget the message given by her! What was the message?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.