Online women check online ... women in social media online harassment | बायकांना ऑनलाइन जाच...समाजमाध्यमांत होणारा महिलांचा ऑनलाइन छळ

मुक्ता चैतन्य

कोणीतरी ती सोशल मीडियावर एखादी पोस्ट लिहिते. विषय स्त्रियांबद्दल, धर्माबद्दल, राजकारणाबद्दल, नातेसंबंधांबद्दल किंवा अजून कशाही बद्दल. ती तिचं मत मांडत असते; पण अचानक काही पुरुष तिने मांडलेल्या मतावरून तिच्याच वॉलवर येऊन तिच्याबद्दल असभ्य बोलायला सुरुवात करतात. धमक्या देतात. लैंगिक शेरे मारतात. एखादीनं तिचे फोटो टाकले तर त्यावरून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. एखादीनं सरकारच्या एखाद्या योजनेवर टीका केली तर तिला मारून टाकण्याची किंवा तिच्यावर बलात्कार करण्याची जाहीर धमकी देतात. एखादीनं स्त्रियांच्या समस्यांविषयी लिहिलं तर तिला बाजारू म्हणून मोकळे होतात.
- हे सगळं आणि याहून बरंच काही गंभीर सोशल मीडियात सर्रास चालतं. लिहित्या अनेक महिलांच्या वाट्याला असा शाब्दिक छळ, गलिच्छ शेरे, ट्रोलिंग हे सर्रास होतं. आपल्याकडेही त्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. गलिच्छ ट्रोलिंग फक्त स्त्रियांचंच होतं असं नाही; काही प्रमाणात पुरुषांचंही होतं. पण प्रमाणाचा विचार केला तर स्त्रियांचा सोशल मीडियात होणारा छळ, शिवीगाळ कितीतरी अधिक प्रमाणात आहे.
आणि हे नुस्तं सोशल मीडियात दिसणारं वरकरणी चित्र नाही, किंवा ‘फील’ नाही तर या विधानाला आता शास्त्रीय अभ्यासाची आणि आकडेवारीचीही जोड मिळते आहे.
अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या जगप्रसिद्ध संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. हा अभ्यास म्हणतो की, समाजमाध्यमांत व्यक्त होणाºया दर पाच स्त्रियांपैकी एकीला सोशल मीडिया अब्यूझला अर्थात शिवीगाळ ते अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागतं. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. एकाच देशात नव्हे तर जगभरातल्या अनेक खंडातल्या ८ देशांत हा अभ्यास करण्यात आला. चार हजार स्त्रियांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. या विविध देशांतील स्त्रिया सांगतात की, आम्ही जेव्हा धर्म, पंथ, लैंगिक अग्रक्र म, राजकारण याविषयी लिहितो किंवा त्यांचे फोटो शेअर करतो त्यावेळी अशा प्रकारच्या आॅनलाइन छळाला वारंवार सामोरं गावं लागतं.
अ‍ॅम्नेस्टी रिसर्च आॅन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ह्युमन राइट्सच्या प्रमुख अझमीना ध्रोडिया यांच्या मतानुसार, इंटरनेट ही महिलांसाठी जितकी उपयुक्त गोष्ट आहे तितकीच ती अतिशय भीतीदायक, धोकादायक आणि मनावर दीर्घकाळ परिणाम करणारीही गोष्ट ठरते आहे. समाजमाध्यमांत गलिच्छ शिवीगाळ होते म्हणून ते बंद करून, लॉग आउट करूनही अनेकींचा त्रास संपत नाही. खुनाची किंवा बलात्काराची धमकी खुलेपणानं सोशल मीडियावर दिली जाते तेव्हा रोजचं आयुष्य जगणंही अनेक स्त्रियांना कठीण होऊन बसतं. कुणीतरी आपल्याला मारेल किंवा आपल्यावर बलात्कार करेल ही भीती सतत पाठलाग करते. स्वत:चे विचार खुलेपणानं मांडण्याची फार मोठी किंमत स्त्रियांना सोशल मीडियावर मोजावी लागते आहे. अ‍ॅम्नेस्टीच्या या संशोधनात ज्या स्त्रियांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी ४१ टक्के स्त्रियांना समाजमाध्यमातील भयंकर अनुभवांनंतर रोजच्या आयुष्यात, प्रत्यक्ष जगतानाही अतिशय असुरक्षित वाटतं.
अझमीना ध्रोडिया हा रिसर्च मांडताना म्हणूनच सांगतात की, सोशल मीडिया चालवणाºया कंपन्यांनीही त्यांच्या व्यासपीठावर येणाºया महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीरपणे हाताळला पाहिजे. त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं त्या ठामपणे सांगतात.
आज अ‍ॅम्नेस्टीचं सर्वेक्षण समोर आलं आहे उद्या अजून कुठल्या संस्थेचं येईल. पण या सगळ्यातून एक गोष्ट मात्र ठळक होते की जगभर सर्वत्रच स्त्रियांना आताशा या सोशल मीडिया अब्यूझला सामोरं जावं लागतंय.
समाजाच्या मान्यताप्राप्त चौकटीत बसेल इतकंच सोशल मीडियावर महिला लिहीत असतील तर त्या मानानं त्यांच्यावर हल्ले कमी होतात; पण जर या चौकटीच्या बाहेर जाऊन महिला लिहायला लागल्या, फोटो शेअर करायला लागल्या की ताबडतोब समाजमाध्यमांत त्यांच्यावर आगपाखड, शिवीगाळ याला सुरुवात होते.
दुसरीकडे बहुतेक स्त्रिया असा छळ झाल्यानंतर पोलिसांकडे न जाता त्या व्यक्तीला ब्लॉक करणं, अनफ्रेण्ड करणं किंवा स्वत:चा सोशल मीडिया वावर सीमित करून टाकणं हा पर्याय निवडतात. त्यामुळे आपण काहीही केलं तरी चालतं असं स्त्रियांना त्रास देणाºयांना सर्रास वाटतं.
असभ्य वर्तन करणाºया व्यक्तीच्या समाजातल्या सभ्य प्रतिमेला धक्का पोचत नाही. पण या छळाला सामोरं जाणाºया स्त्रियांना मात्र याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
महत्त्वाचं म्हणजे इथं मुद्दा फक्त एका स्त्रीचा छळ करणं, होणं हा आणि एवढाच नाहीये फक्त.
मुद्दा आहे तो समाज म्हणून, समुदाय म्हणून आपल्या सोशल मीडिया वर्तनाचा.
आपण सोशल मीडियावर काय बोलतो, कसे वागतो, कशा प्रतिक्रि या देतो याचा !
दुर्दैवानं जगभरात आज बायकांना आभासी जगात अशा गलिच्छ अनुभवांना सामोरं जावं लागतं आहे. आणि ‘आॅनलाइन छळ’ नावाचा हा गंभीर प्रश्न स्त्रियांच्या अभिव्यक्तीला नव्या काळातही कोंडून घालू पाहतो आहे..


ऑनलाइन छळाचा ‘कॉमन’ चेहरा..
@ अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने जगभरातल्या ८ देशांत सर्वेक्षण केलं.
@ न्यूझीलंड, डेन्मार्क, इटली, पोलंड, स्पेन, स्वीडन, इंग्लंड आणि अमेरिका.
@ हा अभ्यास सांगतो की, आॅनलाइन शिवीगाळ आणि गलिच्छ धमक्यांचा सामना करणाºया ६० टक्के महिला सांगतात की, आम्हाला वंशविद्वेषी, लिंगभेद करणाºया, समलिंगी, ट्रान्सफोबिक अशी लेबलं लावली जातात आणि जगणं दुष्वार केलं जातं.
@ ६५ टक्के बायकांना वाटतं की, समाजमाध्यमांत पुरुषांकडून (आणि स्त्रियांकडूनही) होणारा छळ ही अत्यंत ‘कॉमन’ गोष्ट आहे, हा त्रास लिहित्या बायकांना सर्रास होतो आहे.
@ महिलांना आॅनलाइन छळ सहन करावा लागणाºया देशांत अमेरिकेचा क्रमांक पहिला. त्याखालोखाल स्वीडन आणि न्यूझीलंडमधल्या महिलांना त्याचा सर्वाधिक सामना करावा लागतो.
@ ऑनलाइन छळ, शिवीगाळ सहन करणाºया ४९ टक्के महिला सोशल मीडिया वापरणंच बंद करून टाकतात असं हा अभ्यास सांगतो.
@ इंग्लंड, न्यूझीलंड या देशांत आता या आॅनलाइन छळासंदर्भात कडक कायदे करण्यात यावे यासाठी मोहिमाही सुरू झाल्या आहेत.

(लेखिका मुक्त पत्रकार व सोशल मीडिया अभ्यासक आहे.)