- सारिका पूरकर-गुजराथी

पराठा, भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अतिशय चवदार व पोटभरीचा पदार्थ. नास्त्यासाठी तर सर्वात बेस्ट आॅप्शन समजला जातो. एवढेच नाही तर प्रवासातील खाणं म्हणूनही उत्तम.
पंजाबी खाद्यपदार्थांच्या वंशावळीतील हा पदार्थ आता भारतभर खाल्ला जातो. जिरे-ओव्याचा, बटाटा, पालक, मेथी, कोबी, दुधी, बिटाचा पराठा अशा अनेक प्रकारे पराठे करता येतात. पराठ्याचा हा प्रत्येक प्रकार प्रत्येकाच्या घरी करून झालेला असेल, त्याच त्याच प्रकारचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं करून पाहा की ! पराठा टेम्पटिंग करण्याचे पाच पर्याय आहेत. यातला कोणताही पर्याय ट्राय करुन पहा.

१) चॉकलेट पराठा
नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं असेल! सुटणारच. कारण चॉकलेट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचं. शिवाय केक, आइस्क्रीममध्येही हाच फ्लेवर बहुतेकजण आवडीनं खातात. मग पराठ्यातच का नको?
चॉकलेट पराठा हा तसा मुंबईच्या स्ट्रीट फूडपैकी एक प्रकार. पण आपल्याला हा पराठा घरीही बनवता येतो. 
यासाठी चोको चिप्स घेऊन या. परातीत कणीक घ्या. त्यात चवीला मीठ, तूप घाला. हातानं चांगलं चोळून घ्या. नंतर यात पाणी घालून कणीक मऊसर मळून घ्या. दहा मिनिटांनी या कणकेचे गोळे करून मध्यम आकाराच्या आणि जाडीच्या पोळ्या लाटून घ्या. आता पोळपाटावर एक पोळी ठेवून त्यावर चोको चिप्स पसरवा. लगेच वरून दुसरी पोळी पसरवून कडा दाबून बंद करून टाका. हा पराठा तव्यावर तूप सोडून शेकून घ्या. चोको चिप्स विरघळून पराठ्याला छान फ्लेवर येतो. बच्चे कंपनी तर खूश होतीलच शिवाय मोठेही आवडीनं खातील. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही मस्त पर्याय आहे.

२) पापड पराठा 
पराठा म्हटलं की थोडा खुसखुशीत, चटपटीत चवीचा हवा असतो. त्याकरिता पापड पराठा नक्की ट्राय करा. उडदाचे पापड तळून घ्या. भाजून घेतले तरी चालतील. थंड झाल्यावर हे पापड बारीक कुस्करून घ्या. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला घालून सारण तयार करा. पराठ्यांकरिता भिजवतो तशी कणीक भिजवून लाटून त्यात पापडाचं सारण भरा. पराठा लाटून तेल सोडून खरपूस शेकून घ्या. 

३) फरसाण पराठा
फरसाण कुस्करून घ्या. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला घालून सारण तयार करा. आवडत असल्यास चिंचेचा कोळ घालून हे सारण आंबटगोड करता येतं. हे सारण भरून नेहमीप्रमाणे पराठे लाटा आणि शेकून घ्या. पराठ्याला चटपटीत चव येते. नायलॉन शेव वापरूनही हा पराठा बनवता येतो.

४) खजुराचा पराठा
पराठा मुळात पौष्टिक असतोच, मात्र या पौष्टिकतेत आणखी भर घालायची असेल तर हा पराठा करायलाच हवा. खुजरातील बिया काढून टाका. तुकडे करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात अर्धा 
कप दूध आणि अर्धा कप खजुराचे 
तुकडे एकत्र करून वाटून घ्या. तयार पेस्टमध्ये कणीक, मोहन म्हणून तूप, चवीला मीठ घालून कणीक मळून घ्या. तयार कणकेचे पराठे लाटून तूपावर शेकून घ्या. 
खुजराचा रंग, त्याचा चिकटपणा मुलांना आवडत नाही म्हणून खजूर खायला ते नाक मुरडतात. हा पराठा मात्र मुलांना खजूर खाऊ घालण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. याचप्रकारे पिकलेली केळी कुस्करून त्यात मावेल तेवढी कणीक मळून पराठे करता येतात.
५) मूग मोगर पराठा 
राजस्थानी, मारवाडी बांधवांचा हा खूप लोकप्रिय पराठा. करायला सोपा आणि चवीला पौष्टिकही. यासाठी मूग डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर पूर्ण निथळून घ्यावी. मिक्सरमधून खरबरीत वाटून घ्यावी. परातीत कणीक, मीठ, हिंग, हळद-तिखट, मोहन म्हणून तेल, आवडत असल्यास जिरे आणि वाटलेली मूग डाळ घालून कणीक मळून घ्यावी. पराठे लाटून तेल सोडून खरपूस शेकून घ्यावेत. शेकताना पराठा दाबून शेकावा म्हणजे अर्धवट दळलेली डाळ छान खुसखुशीत होईल. हे पराठे पचायलाही हलके असतात.