डॉ. वर्षा जोशी - 
लवंगेबरोबर जोडीनं नाव घेतलं जातं ते दालचिनीचं. पुलाव, बिर्याणीच्या फोडणीत लवंगेबरोबर दालचिनीही वापरली जाते. काही घरांमध्ये मसालेभात, मूग-तांदळाची खिचडी यांच्या फोडणीतही लवंगेबरोबर दालचिनी घालण्याची पद्धत आहे. 
दालचिनीचं शास्त्रीय नाव सिनॅमोनम व्हेरम असून, त्याचे जवळजवळ १00 प्रकार आहेत. पण त्यातील दोन प्रकार सर्व जगभर प्रामुख्यानं वापरले जातात. त्यातील ‘सिनॅमोनम झिलॉनीकम’ हा प्रकार ‘सिलोनी दालचिनी’ म्हणून तर ‘सिनॅमोनम अँरमॅटिकम’ हा प्रकार ‘चिनी दालचिनी’ म्हणून ओळखला जातो. सिलोनी दालचिनीला खरीखुरी (शुद्ध) दालचिनी तर चिनी दालचिनीला ‘कॅसिया’ म्हणूनही ओळखलं जातं. दोन्हीमध्ये तोच वास, चव आणि गुणधर्म समान असले तरी सिलोनी दालचिनीचा स्वाद जास्त चांगला आणि नेमका असतो. दालचिनीचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून इजिप्तमध्ये केला जात होता. सरबताना स्वाद देण्यासाठी आणि औषधांमध्ये तिचा वापर होई. त्या काळी दालचिनीला इतके महत्त्व होतं की सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान म्हणून तिची गणना होई. ख्रिस्तपूर्व २७00 वर्षांपासून चीनमध्ये दालचिनी वापरली जात होती. कौटिल्यानं तिचा उल्लेख ‘कोका’ असा केला आहे. वाग्भटाचार्य आणि सुश्रुताचार्य यांनी तिचा उल्लेख तक् असा केला आहे. संस्कृतमध्ये ‘स्वादा’, ‘दारूसिता’ आणि ‘दाराचिनी’ अशीही नावं आहेत. यापैकी दारचिनीचा अर्थ चिनी खोड असा होतो. या नावावरूनच दालचिनी हे नाव रूढ झालं असावं. त्वक्पत्रचा अर्थ तमालपत्र असा होतो आणि कॅसिआ तसंच तमालपत्राच्या झाडांच्या खोडाचा वास दालचिनीपेक्षा वेगळा असतो.
दालचिनीचं रोप लावल्यावर ते मोठं होऊन झाड वाढू लागतं. झाड दोन वर्षाचं झालं की त्याची छाटणी करतात. पुढील वर्षी त्याच्या मुळांपासून साधारण: डझनभर रोपं उगवतात. त्यांच्या अंगठय़ाएवढय़ा जाड फांद्या कापून त्यावरचा बाहेरील भाग खरवडून काढला जातो. मग हातोड्यानं फांदी ठोकल्यावर आतील भाग सुटा होतो. या आतल्या भागाचे लांब रोल्स बनवतात. हे वाळले की ते ५ ते १0 से.मी.लांबीच्या पट्टय़ा कापल्या जातात आणि दालचिनी विक्रीस आणली जाते.  श्रीलंका जगातील दालचिनीचं सर्वात जास्त उत्पादन असणारा देश आहे. त्याच्या खालोखाल उत्पादन चीन, भारत व व्हिएतनाममध्ये होतं.
 
अंदर की बात
 
दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात मॅगनिज, चोथा, लोह आणि काही प्रमाणात कॅल्शियम असतं. दालचिनीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत. लवंगेप्रमाणे दालचिनीचंही तेल काढलं जातं. सिनॅमल्डिहाइड, सिनॅमिल अँसिटेट आणि सिनॅमिल अल्कोहोल ही या तेलामधील प्रमुख रसायनं आणि इतर काही रसायनं दालचिनीला औषधी गुणधर्म देण्यास कारणीभूत असतात. सिनॅमल्डिहाइड रक्तात गाठी होण्यास प्रतिबंध करतं. रक्तातील प्लेटलेट्सच्या पटलामधून अँरॅकिडॉनिक अँसिड हे आम्ल स्त्रवू देण्यास ते प्रतिबंध करतं. त्यामुळे थ्रॉम्बोक्झेन ए-२ हा रेणू तयार होऊ शकत नाही, आणि गाठ बनू शकत नाही. तसेच सूज येऊन एखादा अवयव लाल होणं, त्याची आग होणं यालाही प्रतिबंध होतो.
दालचिनी आणि आरोग्य
दालचिनीचं तेल सूक्ष्मजीव विरोधक आणि बुरशी प्रतिबंधक आहे. त्यामुळे पदार्थ टिकविण्यासाठीही दालचिनीचा उपयोग होऊ  शकतो. दालचिनी आहारात असेल तर पोटात अन्न ढकलण्याचा वेग कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा वेगही कमी होतो. संशोधनातून असंही आढळलं आहे की, दालचिनीमुळे शरीराचा इन्शुलिनला मिळणारा प्रतिसाद जास्त चांगला होतो. डायबेटिस रिसर्च अँण्ड क्लिनिकल प्रॅक्टिस या र्जनलच्या आणि डायबेटिस केअरच्या डिसेंबर २00३च्या अंकात नमूद केलेल्या निष्कर्षावरून दिसतं की, एक ग्रॅम दालचिनी रोज आहारात असेल तर रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स कमी होण्यास मदत होते. स्नायूंच्या पेशीतील इन्शुलिन संदेश पद्धतीत सुधारणा होते. दालचिनीमध्ये असलेल्या शक्तिमान अँण्टिऑक्सिडंटस्चा उपयोगही मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अकाली वार्धक्य अशा व्याधींना दूर ठेवायला होतो. या सगळ्या गोष्टींपेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट दालचिनीबाबत आढळून आली आहे. फ्लोरिडामधील एका केमिरीसेप्शन सायन्सेसच्या सभेत डॉ. झोलाझ यांनी निदर्शनास आणून दिले की, दालचिनीच्या वासानं स्मरणशक्तीत सुधारणा होते. कोणत्याही बाबतीत सतर्क राहण्यात, हातानं काम करण्याच्या बाबतीत सुधारणा होते. मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचा दालचिनीचा हा गुणधर्म अद्भूतच म्हणावा लागेल. दालचिनीतील कॅल्शियम आणि चोथा यांचा उपयोग आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यास, आतडी कार्यक्षम ठेवण्यास होतो. यीस्टमुळे होणार्‍या इन्फेक्शन्सवरही दालचिनीचा उपयोग होतो असं आढळलं आहे.
 
दुखण्यांवर गुणकारी
 
आपल्याकडच्या शास्त्राप्रमाणे दालचिनीचा उपयोग लवंगेप्रमाणेच दातांच्या दुखण्यावर होतो. सर्दी, घशाची सूज वगैरे आजारांवर होतो. सांधेदुखीवर दालचिनीच्या तेलाचा उपयोग होतो. पित्ताच्या उलट्या, मलावरोध, आम अतिसार, डोकेदुखी अशा बर्‍याच रोगांवर होतो. पण दालचिनी उष्ण असते. त्यामुळे तिच्यात औषधी गुणधर्म भरपूर असले तरी तिचं सेवन अल्प प्रमाणातच केलं पाहिजे. 
 
मसाले असो की मिठाई.
 
दालचिनीला विशिष्ट वास तिच्यामधील तेलामुळे येतो. दालचिनी अख्खी किंवा पुडीच्या स्वरूपात अशी दोन्हीप्रकारे स्वयंपाकात वापरली जाते. आपण स्वयंपाकात वापरत असलेल्या बर्‍याच मसाल्यांमध्ये दालचिनीचा अंतर्भाव असतो. पुलाव, मसालेभात यासाठी केल्या जाणार्‍या फोडण्यांमध्ये दालचिनी वापरली जाते. मेक्सिकोमध्ये चॉकलेटच्या पदार्थांमध्ये दालचिनी वापरतात. पाश्‍चात्य देशांमध्ये अँपल पाय, डोनटस्, सिनॅमन बन्स, कॅन्डीज, कोको, चहा आणि लायकरमध्ये दालचिनीचा वापर केला जातो. अमेरिकेत दालचिनीची पूड आणि साखर यांचं मिश्रण ब्रेकफास्ट सीरीयल्स, पाव वापरून केलेले पदार्थ, फळांचे पदार्थ यामध्ये वापरलं जातं. पर्शियन पदार्थांमध्ये उदाहरणार्थ सूप्स, सरबते आणि मिठाई यामध्ये दालचिनी वापरतात. गुलाब पाण्यात दालचिनीची पावडर मिसळून मिठाईवर शिंपडण्यासाठी वापरली जाते.
दालचिनीच्या पानाचं तेल डासांची अंडी मारण्यासाठी उपयुक्त असतं असं आढळलं आहे. पदार्थ टिकविण्यासाठीही दालचिनीचा उपयोग सूक्ष्मजीवविरोधी असल्याने केला जातो. काहीवेळा कॅसिया झाडाची सालं दालचिनी म्हणून विकली जातात. शुद्ध दालचिनी ओळखण्यासाठी तोंडात टाकून पहावी. ती तिखट लागली नाहीतर ती खरी दालचिनी नाही. 

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.