मोनालिसा स्माइल... ‘तिच्या’ सिनेमाच्या आटपाट नगराची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत on Tue, October 31, 2017 6:00am

कॅथरीन. कलेच्या इतिहासाची शिक्षिका. ती विद्यार्थिनींना सांगते की, प्रश्न विचारा. उत्तरं शोधा. मनासारखं जगा. केवळ पुरुषांना आवडावी अशी सुंदर बाहुली बनण्याचा अट्टाहास सोडा. पण हे सांगणं त्याकाळीही समाजाला पचणारं नव्हतं, आणि कदाचित आजही !

माधवी वागेश्वरी

आयुष्यात ध्येय ठेवा असं आपल्याला कानीकपाळी ओरडून सांगितलं जातं; पण ‘ती’ मात्र ध्येयच नसलेली. ध्येय गाठून नेमकं आयुष्यात करायचं काय असतं असाच उलटा प्रश्न ‘ती’ विचारते. एखादातरी उनाड दिवस आयुष्यात असावा यासाठी मरमर करणारे आपण; पण, तिच्यात प्रत्येक दिवस तसा घालवण्याची ताकद आहे. सत्य शोधण्यासाठी ‘ती’ कधीही परंपरांच्या कुबड्यांचा आधार घेत नाही. ‘ती’ चुका करायला अजिबात घाबरत नाही, ‘ती’ सगळ्या संज्ञाच्या पलीकडची आहे, सगळ्या प्रतिमांना भेदून जाणारी. कॅथरीन. तिचं नाव. कॅथरीन वॅटसन. ‘मोनालिसा स्माइल’ मधली शिक्षिका. ‘मोनालिसा स्माइल’ ही वर्ष २००३ची, ११७ मिनिटांची अमेरिकन ड्रामा फिल्म आहे. माइक न्यूवेल यांनी ही फिल्म केली आहे. ज्युलिया रॉबर्टसनं यात मुख्य भूमिका केली आहे. यातील ‘द हार्ट आॅफ एव्हरी गर्ल’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळालं होतं. ही गोष्ट आहे १९५३ सालची. हे वर्ष महत्त्वाचं आहे कारण, या काळात स्त्रीवादाचे बायबल समजल्या जाणाºया सिमोन द बोव्हुआरच्या ‘सेकण्ड सेक्स’ या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर उपलब्ध झालं होतं. कॉलेजच्या शिक्षणाकडे केवळ लग्नाचा थांबा म्हणून बघणाºया आपल्या विद्यार्थिनींमध्ये कॅथरीन कसा बदल घडवून आणते हा या सिनेमाचा विषय आहे. कॅलिफोर्नियाच्या आॅकलंडमधून ३० वर्षांची कॅथरीन वॅटसन मॅसेच्युएट्स प्रांतातील ‘वेलस्ली’ नावाच्या प्रतिष्ठित; पण विचारांनी कर्मठ असलेल्या महिला कॉलेजमध्ये ‘कलेचा इतिहास’ हा विषय शिकवायला येते. १९५०च्या काळाचा विचार करता कॅथरीन खूप प्रगल्भ विचारांची व्यक्ती असते. हाडाची शिक्षिका असलेली कॅथरीन कलेवर मनापासून प्रेम करते. तिच्या दृष्टीनं कला म्हणजे जगण्याचा जिवंत अनुभव असतो; केवळ श्रीमंत घरात मांडलेलं प्रदर्शन नाही. १९४०च्या सुमारास पुरुष युद्धावर गेल्यावर कामं करायची कोणी हा अत्यंत धोरणी विचार करून बायकांना शिक्षण देण्याची योजना अमेरिकी सरकारतर्फेआखली गेली; परंतु युद्ध संपल्यावर मात्र पुन्हा बायकांनी ‘हाउस वाइफ’ असलं पाहिजे, असा आग्रह कायम राहिला. कितीही शिकलात तरी बायकांनी ‘आज्ञाधारक पत्नी’ आणि ‘प्रचंड मायाळू आई’ झालंच पाहिजे कारण यातच त्यांच्या जगण्याचं सार्थक आहे असं प्रत्येक बाईला वाटलंच पाहिजे असा छुपा अजेंडा पुरुषसत्ताक व्यवस्थेत राबवला जातोच. आणि त्यासाठी काय काय केलं जातं याचा प्रत्यय हा सिनेमा पाहताना येतो. या सिनेमाचं शीर्षक फार महत्त्वाचं आहे. ‘मोनालिसा’ या जगप्रसिद्ध चित्राबद्दलचं कुतूहल आजही शमलेलं नाही. मोनालिसा आणि तिचं हास्य हे जगातलं गूढ आजही सुटलेलं नाही. प्रत्येकाला, प्रत्येक पिढीतील स्त्री पुरुषाला मोनालिसा आणि तिचं हास्य याचे अर्थ लागतच राहतील. असं हा सिनेमा पाहून वाटून जातं. कॅथरीनचा इथला संघर्ष वेगळ्या प्रकारचा असतो कारण तिला इथं श्रीमंत घरातील मुलींच्या डोक्यात प्रकाश पाडायचा असतो. मुलांना आपण कायम आवडलो पाहिजे या विचारानं भारलेल्या त्या मुली, कायम सुडौल बांधा राहावा यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा, त्यांचे ते कायम सुंदर आणि व्यवस्थित असणारे केस. सगळ्याजणी म्हणजे कशा गोड, चुणचुणीत बाहुल्याच. कॅथरीनचं विवाहित नसणं, प्रत्येक परिस्थितीत प्रश्न विचारणं, तिचं निखळ असणं हे सगळं काही तिच्या विरुद्ध कट कारस्थानासारखं वापरलं जातं. ती कोलमडून पडते, एकटी पडते; पण ती धीर सोडत नाही. ज्या मुलींसाठी ती झटत असते त्याच तिला वेळोवेळी दुखावत राहातात, तिचा अपमान करतात; पण ती त्यांच्या कलाकलानं घेत त्यांच्यात बदल घडवतेच. त्यांच्यातलं ‘बाहुलीपण’ काढून टाकून तुम्ही जिवंत माणूस आहात ही जाणीव देते. कॅथरीन तिच्या विद्यार्थिनींना कलेविषयी प्रश्न विचारण्यास भाग पाडते. असे प्रश्न की, जे त्यांना आत्मशोधाकडे जाण्यास उद्युक्त करतील. चित्रकार व्हीन्सेन्ट व्हॅन गॉगविषयी जे कॅथरीन बोलते ते कायम लक्षात ठेवावं असं आहे. ती म्हणते, ‘त्याला डोळ्यांनी जे दिसलं त्याचं चित्र त्यानं काढलं नाही तर त्याला आतून जे वाटलं ते त्यानं कॅनव्हासवर चितारलं. लोकांना त्याची चित्रं समजली नाहीत. त्यांना ती रफ आणि बालिश वाटली. व्हॅन गॉगची चित्रं समजायला समाजाला खूप रियाज करावा लागला. त्याच्या ब्रशचा स्ट्रोक इतका जबरदस्त आहे की चित्रातलं आकाश आत्ता हलेल असं वाटून जातं. त्याच्या हयातीत त्याचं एकसुद्धा चित्र विकलं गेलं नाही. त्याचं सेल्फ पोट्रेट म्हणजे केवळ शुद्ध प्रामाणिकपणा आहे. पण आपण त्याच्या चित्रांचं व्यावसायिकरण करून टाकलं आहे. ‘मोनालिसा स्माइल’ यां सिनेमाचा काळ जुना असला तरी अजूनही बहुतांश देशांतील कित्येक मुली, बायका मागासलेल्या मानसिकतेच्या आहेत. शहर, तालुका आणि गाव पातळीवर मुली मोठ्या संख्येनं शिक्षण घेत असल्या तरी त्या शिक्षणाचा संबंध केवळ नोकरी मिळवणं हा नसून त्याचा हेतू व्यक्ती म्हणून स्वतंत्र होण्याशी, विचार करण्याशी, परंपरांना प्रश्न विचारण्याशी आहे, असा दृष्टिकोन ठेवून शिक्षण घेतलं जातं हा प्रश्नच आहे. सिनेमाच्या शेवटी मुलींच्या इच्छेविरुद्ध आणि तत्त्वासाठी कॅथरीनला कॉलेज सोडावं लागतं; पण तिच्यामुळे मुली आतूनच बदलतात. त्यामुळे ती तिथं असण्यानं आणि नसण्यानं फरक पडत नाही. तिनं त्यांच्यात ज्याची रुजवात केलेली असते ती झाडं कुठेही आणि कशीही फुलून येणार, बहरणारच.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

संबंधित

हुग्गी आणि चित्रान्न
अया
गोऱ्या हट्टाची काळी बाजू
पॅनकेक
दिवाणखाना

सखी कडून आणखी

पौष्टिक बिस्किटांची देशी रेसिपी
उब्याचे लाडू कसे करतात?
सपाट पोटासाठी काय कराल?
प्लाय फर्निचर करायचंय मग हे वाचा !
दोन व्हीलचेअर गर्ल्सची प्रेरणादायी गोष्ट वाचायला चुकवू नका.

आणखी वाचा