Mesh shovel | जाळीदार घावन

- डॉ. वर्षा जोशी
नास्त्यासाठी जे अनेक प्रकार केले जातात त्यामध्ये घावन आणि धिरडी यांचा नंबर खूपच वरचा असतो. पण चुरचुरीत घावन आणि चविष्ट धिरडी बनवण्यासाठी जरा विचार करून कृती करावी लागते. घावन या प्रकारात मोडणारा लोकप्रिय घावन म्हणजे डोसा. कोकणातल्या अनेक छोट्या हॉटेल्समध्ये डोशाला आंबोळी किंवा घावन म्हटलं जातं. पण पातळ कुरकुरीत चविष्ट डोसा बनू शकतो किंवा अत्यंत वाईट, जाड, मऊ पांढरा डोसाही बनू शकतो. त्यामुळे त्याची कृती लक्ष देऊन करावी लागते.

कुरकुरीत घावन
डोसा किंवा कुठलाही घावन किंवा धिरडं नेहमी बिडाच्या तव्यावर करावेत. ती अप्रतिम तर होतातच पण त्यामुळे लोह पोटात जाण्यासही मदत होते. डोसा तव्यावर घालण्यापूर्वी तवा तयार करून घ्यावा लागतो. म्हणजे तो मोठ्या विस्तवावर ठेवून त्यावर थोडं तेल सगळीकडे पसरवावं. मग त्यावर पाणी शिंपडावं. मोठे मोठे बुडबुडे येतात. मग एका स्वच्छ फडक्यानं तव्यावरचं पाणी पुसून घ्यावं. आता तव्यावर तेलाचा अगदी थोडा अंश शिल्लक राहतो. ज्यामुळे त्यावर घातलेला डोसा चिकटत नाही पण पातळ पसरवताही येतो. पाणी शिंपडल्यानं तव्याचं तपमानही योग्य होतं. आता त्यावर मधोमध पीठ घालून ते वाटीनं किंवा डावाच्या पाठीनं पातळ पसरावं. पीठ आंबण्याच्या प्रक्रियेत त्यात कार्बनडाय आॅक्साइड वायू तयार झालेला असतो. पीठ पसरलं की उच्च तपमानानं तो प्रसरण पावून बाहेर येतो. म्हणून डोशाला छिद्रं पडतात. आता त्यावर एक-दोन चमचे तेल घातलं की ते छिद्रांतून खाली तव्यावर जातं. मायलार रिअ‍ॅक्शन होऊन डोशाचा तव्याला चिकटलेला भाग सोनेरी होतो. मग डोसा उलथल्यानं काढून घेता येतो.
घावन हे बहुतेकवेळा तांदळाच्या पिठाचं करतात. घावनासाठी तांदळाचं पीठ थोडं मीठ घालून अगदी पातळ भिजवतात आणि मग बिडाच्या किंवा नॉनस्टिक तव्यावर स्टीलच्या पाणी प्यायच्या भांड्यानं ते पीठ सगळीकडे पसरवून ओततात. बिडाच्या तव्याला त्या आधी थोडं तेल लावून घ्यावं लागतं. पातळ कुरकुरीत घावन तयार होतं.

गोडाचं घावन
तांदळाचं पीठ दुधात भिजवून त्यात गूळ घालून गोडाचं घावन करता येतं. तसंच तांदळाचं पीठ ताकात भिजवून त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण यांचं वाटण आणि कोथिंबीर घालून आंबट-तिखट चवीचे घावन करता येते. तांदळाच्या पिठात काकडी किसून घालून पीठ दुधात भिजवून त्यात थोडं मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ घालून काकडीचे गोड घावनही करता येतात.

चुरचुरीत धिरडी
धिरड्यांमध्येही प्रमुख घटक तांदळाचं पीठ असतं. कारण त्यामुळे धिरडं चुरचुरीत होतं. धिरड्यांसाठी तांदळाच्या पिठाबरोबर काही प्रमाणात चणाडाळीचं पीठ, मूगडाळीचं पीठ, ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन यापैकी कशाचंही पीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे वापरू शकतो. पिठामध्ये कांदा, टोमॅटो यापैकी काही घालता येतं. कोथिंबीर तर हवीच हवी. हिरवी मिरची किंवा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालता येतं. आलं-लसणाची पेस्ट किंवा जिरे-मिरे-हिंग-ओवा असा आपल्या आवडीप्रमाणे स्वाद वापरता येतो. धिरड्याचं पीठ घट्ट भिजवू नये. त्यामुळे धिरडी जाड होतात. पीठ पातळसर असेल तर धिरडी पातळ आणि चुरचुरीत होतात.

कडधान्यांची धिरडी
कडधान्यांना मोड आणून ती मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ, कोथिंबीरसह वाटून त्यामध्ये हळद आणि तांदळाचं पीठ घालून पाण्यानं धिरड्याचं पीठ भिजवता येतं. अशी धिरडी उत्तम होतात आणि अत्यंत पौष्टिक असतात. विशेषत: मूग किंवा उडीद यांना मोड आणून वापरल्यास धिरडी फार छान होतात. धिरड्याच्या पिठात थोडं मेथीचं पीठ घातलं तर चवही चांगली येते आणि पौष्टिकताही वाढते.


(लेखिका भौतिकशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून, त्यांची दैनंदिन विज्ञानाबद्दलची पुस्तके प्रसिद्ध आहेत. varshajoshi611@gmail.com)