Menstrual cycle: month-long disturbance | मासिक पाळी : महिन्याचं लांबलेलं दुखणं

-वैद्य विनय वेलणकर 
मासिक पाळी. प्राय: वयाच्या १४-१५ व्या वर्षापासून ते ४२-४५ वयापर्यंत ही मासिक पाळी येत असते. सध्या ८-९ व्या वर्षापासून मासिक पाळी चालू झालेली अनेक उदाहरणं आहेत. यामध्ये वय-प्रकृती- ऋतू- आहार इ. अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. ज्यावेळेला मासिक पाळीच्या वेळेला होणारा रक्तस्त्राव अधिक मात्रेत व अधिक दिवस होतो त्यावेळेस त्यास रक्तप्रदर (प्रदर) किंवा टील्लङ्म११ँँ्रं असं म्हणतात. साधारण ४-५ दिवसांच्या ऐवजी १२-१५ दिवस, क्वचित त्यापेक्षाही जास्ती दिवस रक्तस्त्राव होतो. त्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा त्यास प्रदर म्हणतात. रज:स्त्रावाचे स्वरूपसुद्धा यामध्ये बदलले जाते. क्वचित अधिक घट्ट, ग्रंथित (गाठीयुक्त), कृष्णवर्णी (काळसर रंगाचे) पिच्छिल (चिकट), क्वचित पातळ, क्वचित घट्ट, कधी कधी वेदनायुक्त, क्वचित वेदनारहित असा रक्तस्त्राव (रज:प्रवृत्ती) होते.
आयुर्वेदानुसार याचे वातज, पित्तज, कफन व सात्विपातिक असे चार प्रकार पडतात. दोषांनुसार यामध्ये विविध लक्षणे दिसतात. व्याधीचा परिणाम जास्ती असल्यास यामुळे प्रचंड दौर्बल्य म्हणजे थकवा येतो. मेंदूकडील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे चक्कर येणे, मुर्च्छा येणे यासारखी लक्षणे दिसतात. शरीरातील पाण्याचे (द्रवांशाचे) प्रमाण कमी झाल्यामुळे शोष पडतो (तहान जास्त लागते), रक्त कमी झाल्यामुळे नाडीशोध होऊन अंगाचा दाह होतो.
रक्तक्षय झाल्याने पांडूता ( अ‍ॅनिमिया) निर्माण होते. त्यामुळे पायात गोळे येणे, कंबर, पाठ दुखणे, चालल्यावर धाप (दम) लागणे, आवाज स्पष्ट न होेणे, चिडचिडेपणा, झोप न लागणे, कृशता येणे (वजन कमी) क्वचित प्रसंगी वात प्रकोपामुळे प्रलाप (अनावश्यक बडबड) ही लक्षणे निर्माण होतात. वेळेवर योग्य चिकित्सा न केल्यास गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते.
कारणांचा विचार केल्यास पचण्यास जड, गुरु, विदारी, आम्लरसात्मक, खारट (लवणयुक्त) पदार्थांचे अति सेवन, मद्यपान, आंबवलेले पदार्थ जास्ती प्रमाणात खाणे, अति मैथून या कारणांनी हा विकार होऊ शकतो. अति वेगवान वाहनातून प्रवास, जागरण, शोक, भीती, चिंता, संताप इ. मानस कारणांचा सुद्धा विचार करावा लागतो.

अंत:स्त्रावी ग्रंथीचे विकार
पीसीओडी (बीजग्रंथी वर गाठी येणे), थायरॉइड ग्रंथीचे विकार, गर्भाशयाच्या अंत:त्वचेचा क्षोम होणे, गर्भाशयाचा कॅन्सर यासारख्या विकाराचा परिणामस्वरुप अत्याधिक रज:प्रवृत्ती किंवा रक्तप्रदर ही व्याधी होते. रोग्याचा पूर्ण इतिहास बघून, त्याच्या कारणांचा अभ्यास करून त्यानुसार चिकित्सा करावी लागते.

काय काळजी घ्याल?
१) बºयाच स्त्रिया याकडे सुरुवातीस दुर्लक्ष करतात व नंतर गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
२) सर्वप्रथम आंबट, खारट व तिखट पदार्थांचं प्रमाण कमी करावे. पूर्ण विश्रांती घ्यावी. पोटावर नाभीच्या खाली काळ्या तुळशीच्या खालील मातीचा लेप करावा किंवा नाभीच्या खाली ओटीपोटावर बर्फाचा शेक करावा.
३) पाणी उकळून ते खाली उतरवल्यावर त्यामध्ये नागकेशर चूर्ण टाकून ते पाणी रुग्णास पिण्यास द्यावे.
४) पानफुटीची पाने धुऊन चावून त्याचा रस घ्यावा. अन्यथा पाने वाटून त्याचा रस काढून तो प्यावा.
५) अडुळशाच्या पानांचा रस काढून तो सकाळ/ सायंकाळ घ्यावा. थोडा कच्चा पेरु घेऊन तो कापावा व त्यामध्ये तुरटीची पावडर टाकून तो खावा.
६) वड, उंबर, पिंपळ यापैकी कोणत्याही वनस्पतीच्या पानांचा काढा करून त्यामध्ये साजूक तूप (गाईचे) टाकून घ्यावा.
७) दूर्वांचा रस काढून तो घेतला तरी रज:प्रवृत्ती कमी होते.
८) त्रिफळा चूर्ण व हळद एकत्र करून खावे. तीन-चार दिवस मीठविरहित आहार घ्यावा.
९) सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, मौक्तिक भस्म, चंद्रकला रस, बालारिष्ट, उशिरासव, लोथ्रासव, चंदनासव, प्रबाळ पिष्टी, वासाधृत यासारख्या औषधांचा उपयोग योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा.
१०) योग्यवेळी तज्ज्ञ वैद्याला दाखवून सल्ला घ्यावा. आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करून घ्यावी.
११) पंचकर्म चिकित्सेमध्ये विरेचन, बस्ती, उत्तरबस्ती वमन इ. कर्मांचा उपयोग होतो. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने त्याचा उपयोग करावा. बºयाचवेळा/ क्षुल्लक कारणांसाठी गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा योग्य विचार करावा.


(लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत. vd.velankar@gmail.com)


Web Title: Menstrual cycle: month-long disturbance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.