- सारिक पूरकर-गुजराथी 

फार पैसे असले किंवा नामांकित
इंटिरिअर डिझायनरनं आपलं 
घर सजवलं तरच ते चांगलं दिसतं 
असं कोण म्हणतं?


घर सजवायला सर्वांनाच आवडतं. परंतु इंटेरिअर डेकोरेटर हे शब्द उच्चारले की डोळ्यासमोर अव्वाच्या सव्वा बजेट येतं. 
शाहरुखची पत्नी गौरी खान किंवा सुझान खाननं अलीकडेच आलिया भट, करण जोहर यांचे आलिशान फ्लॅट्स त्यांच्या आयडियाच्या कल्पनांनी एकदम पॉश करून टाकले आहेत, हे तुमच्या एव्हाना वाचण्यात आलंच असेल. 
पण हे असंच काही नाहीये. म्हणजे सुझान, गौरीसारखा महागडा इंटेरिअर डेकोरेटर नसला तरी तुम्हीच तुमच्या घराचे ‘इंटेरिअर डेकोरेटर’ होऊ शकता आणि आपलं घर आपल्या कल्पनांनी सुरेख सजवू शकता. 
नुसत्या पाच सहा कल्पना वापरूनही आपण आपलं घर सजवू शकतो. खरंतर प्रत्येकाकडेच खूप काही कल्पना असतात. 
एकदा का त्यांनी त्या आपल्या घरासाठी वापरल्या तर आपलं घर उठून दिसलं नाही तरच नवल!
१) कोणत्याही घराला फ्रेश लूक देण्यासाठी ‘एअरी, ब्राइट आणि लाइट’ या त्रिसूत्रीचा वापर करावा. म्हणजेच घरात छान हवा खेळली पाहिजे, भरपूर उजेड हवा आणि छान प्रसन्न, आल्हाददायक फील हवा. त्यासाठीच घरातील काही वस्तू, काही भिंती या फक्त प्युअर व्हाइट रंगात रंगवून घ्या. उदाहरणार्थ, एखादा सेंटर टेबलचा बॉटम, लाकडी खुर्च्या या प्युअर व्हाइट रंगात रंगवा. घराला खूप फ्रेश लूक मिळेल. 
२) डिनर प्लेट्सदेखील तुमच्या घराची भिंत सजवू शकतात. वेगवेगळ्या आकारातील व प्रकारातील डिनर प्लेट्स (सिरॅमिक किंवा फायबरच्या वापरू शकता) भिंतीवर चिकटवून एक छान आर्टपीस सहज तयार होतो. 
३) घरातील इतर खोल्यांमधून दिवाणखान्याकडे जाणाऱ्या मधल्या भागात छान रनर घाला, गालिचे घाला. यामुळे एक शाही आणि डिसेंट लूक मिळेल. गालिचे फक्त दिवाणखान्यातच अंथरायचे असतात असं नाही. ते या पद्धतीनेही वापरता येतील.
४) बेडरूमच्या सजावटीसाठी मिक्स अ‍ॅण्ड मॅच पॅटर्नचा वापर करा. पिलो, बेडशीट आणि लॅम्पशेड यांच्या डिझाइन्स मिक्स अ‍ॅण्ड मॅच निवडा. थोडा नॉटी आणि रिलॅक्स फील येईल.
५) सेंटर टेबल, कॉफी टेबल यावर टेबल क्लॉथ, टेबल मॅट टाकत असाल तर तेच ते पाना-फुलांचं, फळांचं डिझाइन टाळून पॅटर्न्ड टेबलक्लॉथ अंथरा. टेबलाची आणि घराचीही शान नक्कीच वाढेल. 
६) बाथरूममध्ये फ्लोअरवर (भिंतींवर नव्हे) नेहमीच क्रीम, पांढऱ्या रंगाच्या टाइल्स लावल्या जातात. परंतु त्याऐवजी आकाशी रंगाच्या टाईल्स लावून बघा, बाथरूम टवटवीत दिसायला लागेल. 
त्याचप्रमाणे एखादा अ‍ॅण्टिक (लाकडी) टेबल कोपऱ्यात मांडा (अर्थात बाथरूम मोठं असेल तर) यामुळेही मॉडर्न आणि ट्रॅडिशनल लूूक मिळतो