Lok Sabha Election 2019; The Chief Minister spontaneously said, 'Maharaj ... get ready' | Lok Sabha Election 2019; मुख्यमंत्री उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘महाराज... कामाला लागा’ 
Lok Sabha Election 2019; मुख्यमंत्री उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘महाराज... कामाला लागा’ 

ठळक मुद्दे गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासह शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीसोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार अमर साबळे यांची नावे चर्चेत

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासह शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साधारणत: अर्ध्या तासहून अधिक काळ चाललेल्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराजांना ‘कामाला लागा’ असे सांगितल्याची माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार अमर साबळे यांची नावे चर्चेत आहेत. पण बनसोडे यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे यापूर्वीही सांगितले आहे. खासदार अमर साबळे यांना पक्षानेच सोलापुरात पाठविले होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो, असे भाजपाचे नेते सांगत आहेत. यादरम्यान, डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्यासह नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य, मैंदर्गी मठाचे नीलकंठ शिवाचार्य, सोनपेठ, परभणी येथील नंदिकेश्वर शिवाचार्य, जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य, मुखेडचे विरुपाक्ष शिवाचार्य, मादनहिप्परग्याचे शांतवीर शिवाचार्य यांनी बुधवारी दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

या भेटीत महाराज म्हणाले, देशात मोदी लाट कायम आहे. सामाजिक कामांमुळे आम्हाला अडचणही येणार नाही. भाजपाच्या नेत्यांनी तर मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी आम्हाला मदत करु, असे सांगितले आहे. चर्चा संपताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि कामाला लागा, असे सांगितले. दरम्यान, महाराज मंडळींच्या या भेटीची शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांनी कल्पना नसल्याचे सांगण्यात आले. 

विशेष म्हणजे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातच होते. महाराज मुख्यमंत्र्यांना संपर्क साधून स्वत: भेटण्यास गेले. 

महाराज म्हणाले होते, विचार करून सांगतो
- मागील आठवड्यात दोन्ही मंत्र्यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मुख्यमंत्र्यांना भेट घालून दिली होती. त्यावेळी महाराजांनी विचार करून सांगतो, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यानंतर शेळगी, अक्कलकोट, भंडारकवठे येथे बैठका घेऊन भक्तांचे मत जाणून घेतले होते. भक्तांनी महाराजांना निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह केला. गुरूबंधूंशी चर्चा करून निर्णय घेतो, असे महाराजांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी विविध पदाधिकाºयांच्या भेटी घेतल्या आणि आज वर्षा बंगल्यावर जाऊन गुरुबंधूसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाराज... कामाला लागा.’

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी परवा विचार करून सांगतो, असे कळविले होते. बुधवारी त्यांनी आणि त्यांच्या गुरूबंधूंनी मुख्यमंत्र्यांची भेट  घेतल्याने त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचा अर्थ यातून निघतो. महाराजांना उमेदवारी मिळाली तर आनंदच आहे. पण त्यांच्याऐवजी इतर कुणाला उमेदवारी मिळाली तरी भाजपाचे कार्यकर्ते त्याच जोमाने काम करतील. देशातील सामान्य लोकांप्रमाणेच साधू-संतांचाही भाजपच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसत आहे.
- प्रा. अशोक निंबर्गी, 
शहराध्यक्ष, भाजपा. 


Web Title: Lok Sabha Election 2019; The Chief Minister spontaneously said, 'Maharaj ... get ready'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.