Laugh! Smiling device? Can smile be smiling from inside? | हसा! हसवणारं यंत्र? हसू आतून उमलवता येईल?

- डॉ. मृण्मयी भजक

घरात गोतावळा जमला होता. ‘चला, आता सगळ्यांनी शांत बसा, मी आता जोक्स सांगणार आहे’ सौरभ म्हणाला. त्याचे विनोद म्हणजे एकदम भारी असतात. सगळेजण सरसावून बसले. सौरभनं नेहमीप्रमाणे एक विनोद सांगितला. घरातली सगळी मंडळी मोठमोठ्यानं हसू लागली आणि काही क्षणांनी हळूहळू शांत झाली; पण शर्वरी आणि मोना मात्र अजून त्याच आवेगानं हसत होत्या. अर्थात ही गोष्ट काही सर्वांसाठी नवीन नव्हती. पुढचा जोक सांगण्यासाठी सौरभ खोळंबला होता. शेवटी यांचा थांबण्याचा रागरंग दिसत नाहीये असं बघून तो म्हणाला, ‘एवढाच होता जोक’ ते ऐकून जरा कुठे मंदावलेल्या हास्यानं पुन्हा जोर धरला. सौºया, बघ काय म्हणतोय, एवढाच होता म्हणे जोक!’ - शर्वरी म्हणाली. आणि पुन्हा नवीन जोक झाल्याप्रमाणे दोघी हसू लागल्या. सौरभ विनोद सांगून सगळ्यांना हसवण्यात माहीर आणि या दोघी हसण्यात!‘काय बाई या दोघी दात काढत असतात’- मंगल मावशी म्हणाली. आणि त्या दोघा बहिणींच्या हसण्यावर मंगल मावशी आणि आशा मावशी या दोघी बहिणीही हसायला लागल्या. पुन्हा शरूनं हेल काढला आणि डोळ्यांत पाणी येईपर्यंत ती हसतच राहिली.
खुदूखुदू, फिदीफिदी, गालातल्या गालात, सात मजली गडगडाटी वगैरे अशी हसण्याची वर्गवारी आपण केली आहे. काही लोक पटकन हसतात, तर काहींना हसवणं हे महाकठीण काम असतं. एखाद्या गोष्टीवर किती हसावं, याला खरं तर काही मोजमाप नसायला हवं. पण सर्वसाधारणपणे एखाद्या जागेतल्या लोकांच्या हसण्याचा लसावि काढला की तेवढं हसणं योग्य असं गृहीत धरलं जातं. त्याहून जास्त हसणाºयांकडे चेष्टेनं पाहिलं जातं, तर अगदी कमी हसणाºयांना शिष्ट असल्याचं लेबल लावलं जातं.
एखाद्या नाटकाला किंवा कार्यक्र मात, सभागृहात एक सामूहिक हास्य असतं. आणि काही लोकांचं हास्य हे त्या सामूहिक हास्याच्या बाहेर सांडत असतं. आणि अशा लोकांच्या हसण्यावरही हसू येत असतं.
अशा कार्यक्र मांना काही लोक कमी हसतात, त्यावर ‘विनोदबुद्धी उच्च दर्जाची आहे त्यामुळे साध्या विनोदांवर त्यांना हसू येत नाही.’ असं सांगितलं जातं. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हसण्याचं मोजमाप करणारं यंत्रदेखील जपाननं शोधून काढलं आहे. त्याला ‘लाफोमीटर’ असं म्हणतात. शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंना हे यंत्र जोडलं जातं आणि हसण्याचं मोजमाप केलं जातं.
हसू मोजणार यंत्र जरी आलं असलं तरी हसवणार यंत्र मात्र अजून तरी ऐकिवात नाही. हल्लीच्या तणावग्रस्त आयुष्यात खळखळून हसण्याचे प्रसंग कमी झालेत. कधी विनोदी नाटक, सिनेमा पाहून आपण हे क्षण वेचण्याचा प्रयत्न करत असतो. हसण्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन हास्य क्लबला पण लोक जातात. पण या सगळ्या बाहेरच्या गोष्टी. हास्याची खरी कारंजी तर आतूनच फुटली पाहिजे. निखळ हसणं हे मानवाला मिळालेलं एक वरदान आहे, त्याची सातत्यानं जपणूक करायलाच हवी!
नाही का?


(लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत. drmrunmayeeb@gmail.com)