- वर्षा जोशी

ताटात मऊ, अलवार, सोनेरी ठिपक्यांची खमंग गरमागरम पोळी कशी येईल?

मऊ पोळी ही काहींनाच जमते आणि काहींना नाही असं मुळीच नाही. पोळीसाठी गहू घेण्यापासून ते तव्यावरची पोळी खाली उतरवून ठेवण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांचा नीट अभ्यास केला तर मऊ पोळी ही सगळ्यांनाच जमू शकते. बऱ्याचदा मऊ पोळी यावी म्हणून कणीक भिजवताना अनेकजणी भरपूर तेल घालतात. पण यामुळे पोळी मऊ होण्यापेक्षा भलतंच काहीतरी होतं. यामागे शास्त्रीय कारण आहे. ते समजून घेतलं तर कणीक भिजवताना तेल घालावं की नाही हे कोडं सहज सुटू शकेल. 

कणीक भिजवताना तेल 
कणीक भिजवताना त्यातच तेल घालून भिजवली तर ग्लूटेनचं जाळं अपुरं आणि कमजोर बनतं. परिणामी पोळी फार पातळ लाटता येत नाही आणि ती फुगतही नाही. पण कणकेत तेल घातलंच नाही तर पोळीला खुसखुशीतपणा आणि अलवारपणा येत नाही. म्हणून कणीक भिजवताना पिठात थोडं मीठ घालून पाणी घालून ती भिजवावी आणि मग हातावर तेल घेऊन ती व्यवस्थित मळावी. मळताना हाताच्या पंजाच्या तळभागाचा दाब देऊन मळावी. मग नव्वद अंशात वळवून मळावी. अशा प्रकारे मळल्यास कणकेचा सर्व भाग व्यवस्थित मळला जातो व तेल पूर्णपणे कणकेमधे शिरतं.

पोळी लाटताना
पोळी लाटताना थोड्या थोड्या पिठावर हलके लाटावी. तांदळाच्या पिठावर लाटल्यास भराभर लाटता येते. छोटा गोल लाटून त्यावर तेल लावून थोडं पीठ भुरभुरावं आणि त्याची घडी घालावी. त्यावर पुन्हा तेल लावून पीठ भुरभुरून त्रिकोणी घडी करावी. घडीमध्ये लावलेल्या तेल व पिठाचे रेणू पापुद्रे अलग ठेवायला मदत करतात. ते एकमेकांना चिकटू देत नाहीत. पोळी हलक्या हातानं लाटूून मोठी करावी. लाटताना ती पुन्हा पुन्हा उलटी केली तर सगळीकडे सारखी लाटली जाते. नाहीतर जिथे जाड राहील तिथले पापुद्रे उचलले न गेल्यानं ती फुगणार नाही आणि जिथे फार पातळ असेल तिथे पापुद्रे एकमेकाला जाम चिकटलेले असल्यानं तिथेही पोळी फुगणार नाही. 

सोनेरी ठिपक्यांची खमंग पोळी
पोळी भाजण्यासाठी तवा मध्यम तापलेला हवा. तवा मध्यम गरम असला की पोळीची तव्याला चिकटलेल्या भागाची मायलार रिअ‍ॅक्शन योग्य गतीनं होते. कणकेतील पाण्याच्या वाफेचा दाब तयार होऊन तो पोळीचे पापुद्रे उचलतो म्हणजेच पोळी फुगते. आता पोळी तव्यावर उलटून टाकली की उरलेलं फुगणं पूर्ण होतं. मायलार रिअ‍ॅक्शनमुळे पोळीवर सोनेरी लालसर डाग पडतात आणि खमंग वास येतो.

त्रिकोणी घडीची पोळी
काही ठिकाणी पोळी करताना लंबगोल लाटून त्याला तेल लावून, मधे चिमटा घेऊन एकमेकांवर घडी घालून मग लाटली जाते. अशी पोळी गोल लाटणं सोपं पडतं. पण अशा पोळीला खालचा आणि वरचा असे दोनच पापुद्रे सुटतात. त्रिकोणी घडीमुळे या दोन पापुद्र्यांशिवाय मधलाही पापुद्रा सुटतो.


 

(लेखिका भौतिकशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून, त्यांची दैनंदिन विज्ञानाबद्दलची पुस्तके प्रसिद्ध आहेत.) varshajoshi611@gmail.com

 

जिन्नस आपल्या प्रांताची अस्सल चव

प्रत्येक घरचा स्वयंपाक वेगळा आणि विशिष्ट चवीचा. आणि त्या चवीला असते एक भौगोलिक ओळखही...आपला प्रदेश, आपले गाव, आपल्या घरची पद्धत पाककलेचा वारसाच घेऊन येते. उकडीचे मोदक खावे ना तर कोकणातच, नाशिकची मिसळ, खानदेशातलं भरीत, कोल्हापूरचा झणझणीत रस्सा, सांगलीचे भडंग, विदर्भातला वडाभात, औरंगाबादची इमरती असे काही पदार्थ आपण अगदी आवर्जून सांगतो.. पण त्यापलीकडचे या भागातले अस्सल स्वाद कुठं आता कुणाला माहिती असतात? ते कळावे आणि साऱ्या सखींनी करून, चाखून पाहावेत म्हणून हे एक खास आवाहन..

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या विविध प्रांतातील, शहरातील सखींनी जरूर कळवावेत, लिहून पाठवावेत आपल्या भागातले आता फारसे न केले जाणारे खास पदार्थ, जिन्नस जो आपल्या आजी-आईनं जपला, आपण पुढे चालवतोय वारसा, तो जिन्नस, ते पदार्थ.. पदार्थाची खासियत, त्याची कृती आणि त्या पदार्थाचा एक खास फोटोही जरूर पाठवा..पाकिटावर ‘जिन्नस’ असा उल्लेख नक्की करा..