खांडोळी - ही भाजी करायला सोपी नाही, सुगरणीची परीक्षाच. पण करून पहा, फक्कड बेत जमतो

By ऑनलाइन लोकमत on Tue, October 31, 2017 6:00am

३७ -३८ वर्षांपूर्वीचा काळ ! मॅट्रिक झालं न झालं तोच ‘खांडोळीची भाजी करून पहा बाई ! आली पाहिजे ना, कसं भेटतं सासर अन् कसं नाही?’ असं आईचं पालूपद चालू झालं. (जणू लग्नासाठी ती भाजी येणं हाच एकमेव निकष.)

३७ -३८ वर्षांपूर्वीचा काळ ! मॅट्रिक झालं न झालं तोच ‘खांडोळीची भाजी करून पहा बाई ! आली पाहिजे ना, कसं भेटतं सासर अन् कसं नाही?’ असं आईचं पालूपद चालू झालं. (जणू लग्नासाठी ती भाजी येणं हाच एकमेव निकष.) त्यामुळे लग्नाळू मुलीला आई ही भाजी शिकवत असे. सुगरणपणाचं लक्षणच जणू. ही भाजी करायची म्हणजे मन शांत हवं आणि जे करणार आणि टाकणार त्यात शिस्तही हवी. आजारी माणसासाठी, डोहाळे लागलेल्या गरोदर मातेसाठी ही भाजी आवर्जून करत.

खांडोळीची भाजी साहित्य : तीन वाट्या किसलेलं खोबरं, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सालासह मूगडाळ, अर्धी वाटी खसखस, एक ते दीड पाव तेल, हळद, तिखट, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, किंचित बडीशेप, दोन लिंबू, एक संत्रं. चार-पाच टोमॅटो, दहा-बारा पालकांची पानं, तीन वाट्या बेसन, एक वाटी कणीक, मीठ, सात-आठ मध्यम कांदे. कृती : (रस्सा)- एक वाटी खोबरं, दहा-बारा शेंगदाणे, चार कांदे चिरून, दोन चमचे खसखस घालून हे सर्व पदार्थ थोड्या तेलात भाजून वेगवेगळे बारीक वाटावेत. दहा-बारा पालकाची पानं, चार टोमॅटो, सहा हिरव्या मिरच्या, थोडं संत्रं घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करावं. कढईत थोडं तेल टाकून, मोहरी तडतडल्यावर एक एक करून बारीक केलेला पदार्थ टाकून ढवळावा. तेल सुटत आल्यावर, किंचित हळद, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा धनेपूड टाकून मिश्रण चांगलं ढवळावं. हळूहळू उकळीचं पाणी टाकावं. पाहिजे तस्सा रस्सा पातळ किंवा घट्ट करावा. एक-दोन उकळ्या आल्या की वरून मीठ आणि कोथिंबीर टाकावी. (सारण) : आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली हरभरा डाळ, मूगडाळ, शेंगदाणे, खसखस. हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून एकजीव करावेत. आधी त्यात मोहरी तडतडू द्यावी. नंतर लसूण-आलं पेस्ट घालावी. उरलेले सर्व कांदे कापून कढईत टाकावेत. ते खरपूस झाले की त्यात किंचित हळद, बडीशेप, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धनेपूड, टाकून मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं वरचेवर मोकळं होईपर्यंत ढवळावं. गॅस बंद करून सर्व मिश्रण मोठ्या भांड्यात ओतावं. वरून उरलेला खोबराकिस आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालावी. मिश्रण एकदम थंडगार होऊ द्यावं. (पारी) : तीन वाट्या बेसन आणि एक वाटी कणीक, मीठ आणि किंचित हळद घालून पाण्यानं घट्ट भिजवावी. पातळ पुरी लाटून त्यावर गार झालेलं मिश्रण दाबून त्याला लांबुळका आकार देऊन पुरीच्या मधोमध ठेवावं. पुरीच्या कडा दुमडण्यापूर्वी पुरीच्या आतल्या भागाच्या कडेला पाण्याचं बोट लावून, व्यवस्थित दुमडाव्या. लांबट-चौकोनी खांडोळी तयार होते. खांडोळीचा आकार त्रिकोणी किंवा केळासारखा किंवा कसाही होऊ शकतो. अशाप्रकारे सर्व खांडोळ्या तयार कराव्या. सर्व खांडोळ्या कुकरमध्ये/चाळणीत वाफवून घ्याव्यात. वाफवलेल्या खांडोळ्या रस्सा उकळत असताना त्यात टाकता येतात किंवा तळूनही घेता येतात. खांडोळी खाताना खांडोळीचे मधोमध दोन भाग करून खोलगट डिशमध्ये ठेवावे. त्यावर रस्सा गरम करून ओतावा. वाफाळलेल्या लाल, गरम रस्स्यावर लिंबू पिळून, गरम-गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर खावी. आणि हो मधल्यावेळी मुलांना खायला द्यायची असेल तर खांडोळीचे दोन भाग करून त्यात तेल-मीठ भरावं. मस्त लागतं. संध्याकाळी गरम रस्सा, तांदुळाचा भात असा फक्कड बेत जमतो.

सविता डोईफोडे, मु. पो. वडनेर, जि. अमरावती.

संबंधित

मूगाच्या डाळीचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!
शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी
...म्हणून पुण्यातल्या कॅफे चालकाने थेट इंजिनिअरींगच्या डिग्रीलाच घातला हार
सावधान! ही फळं एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक
मल्टीप्लेक्सवर आॅगस्टपासून कारवाई : गिरीश बापट 

सखी कडून आणखी

पौष्टिक बिस्किटांची देशी रेसिपी
उब्याचे लाडू कसे करतात?
सपाट पोटासाठी काय कराल?
प्लाय फर्निचर करायचंय मग हे वाचा !
दोन व्हीलचेअर गर्ल्सची प्रेरणादायी गोष्ट वाचायला चुकवू नका.

आणखी वाचा