मूतखडा, किडनी स्टोन नावाचा आजार कशानं होतो?

By ऑनलाइन लोकमत on Tue, November 07, 2017 3:42pm

किडनी स्टोन नावाचा आजार हल्ली सर्रास कानावर येतो. तो कशानं होतो? आहाराविहाराचा त्याच्याशी काय संबंध?

- वैद्य विनय वेलणकर किडनी स्टोन नावाचा आजार हल्ली सर्रास कानावर येतो. तो कशानं होतो? आहाराविहाराचा त्याच्याशी काय संबंध? श्मरी म्हणजे खडा किंवा दगड. मूत्रमार्गामध्ये अशा प्रकारच्या खड्याची निर्मिती होते त्यास मुत्राश्मरी किंवा मूतखडा असं म्हणतात. आजकाल या विकाराच्या रुग्णांचं प्रमाण खूप वाढलं आहे. प्रामुख्यानं पुरुषांमध्ये या समस्येचं प्रमाण महिलांपेक्षा जास्त आढळतं. साधारणत: कफकर आहाराच्या अतिसेवनानं हा विकार होतो. अपथ्यकार आहार-विकार हे त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे. मूत्र वेगाचं धारण करणं म्हणजे बºयाच वेळात लघवीला न जाणं यामुळेसुद्धा मुत्राश्मरी होतो. अतिथंड पदार्थ, फ्रीजमधील पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ, गोड पदार्थ, पालेभाज्या जास्ती प्रमाणात खाणं, अतिप्रमाणात पाणी पिणं, पचण्यास जड पदार्थ, रूक्ष आहार घेणं, फरसाण, वेफर्स यासारखे मीठ जास्त असलेले पदार्थ वारंवार सेवन करणं यामुळे मुत्राश्मरी होतो. वरील सर्व कारणांमुळे अग्नी मंदावतो आणि भूक कमी झाली की अन्नाचं पचन नीट होत नाही, त्यामुळे रूक्षता निर्माण होऊन अश्मरीची निर्मिती होते. अव्यायाम हेसुद्धा याचं प्रमुख कारण आहे. तसेच बैठा व्यवसाय करणारे यामध्ये याचं प्रमाण अधिक आढळते. अती चक्रमण म्हणजे सतत प्रवास करणारे यामुळे वातवृद्धी होऊनसुद्धा अश्मरी होतो. या दोन्ही गोष्टी आणि व्यायामाचा अभाव सध्या समाजात जास्ती प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे या विकाराचे प्रमाण वाढलेलं दिसतं. दुसरं महत्त्वाचं एक कारण. पूर्वी मूत्रप्रवृत्ती बसून करण्याची पद्धती होती. त्यामुळे मूत्रमार्गावर दाब पडून मूत्राशय पूर्ण रिकामे होत. गेल्या ३५-४० वर्षांत ही पद्धत पूर्णत: बंद झालेली आहे. त्याचाही परिणाम या व्याधीच्या वाढीमागे आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या जीवनात प्रवासात २-२ तीन-तीन तास अडकून पडायला लागतं. त्यामुळे मूत्रवेगाचा अवरोध साहजिकच होतो. तसेच आहारामध्ये वडा-पाव, फरसाण, मँगो, वेफर्स यासारख्या गोष्टींचा वाढता वापर आणि थंड पाण्याचं अतिसेवन याचाही विचार करायला हवा. पाणी किती प्याल? हल्ली एक चुकीचा सल्ला सध्या दिला जातो तो म्हणजे दिवसातून ४-६ लिटर पाणी प्या. हासुद्धा मूर्खपणा आहे. लोक इतके पाणी आणि तेसुद्धा थंड पितात. आयुर्वेदामध्ये ‘स्वस्थोपि अल्पश: पोवेत्।।’ म्हणजे निरोगी माणसानंसुद्धा मर्यादित पाणी प्यावं असं सांगितलं आहे. जास्त पाणी प्यायल्यामुळे अग्निमांद्य निर्माण होतो. त्यामुळे अश्मरी निर्मितीला अधिक चालना मिळते. अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात विहिरीचं पाणी प्यायलं जातं. त्यामध्ये क्षार जास्ती असतील तर मूतखड्याचं प्रमाण अधिक आढळतं. क्वचित काही रुग्णांमध्ये आनुवंशिकतासुद्धा पाहायला मिळते. लक्षणं काय? आयुर्वेदानुसार याचे वातज, पित्तज, कफज आणि शुक्राश्मरी असे प्रकार वर्णन केले आहेत. मुत्रामधील तरलता कमी होऊन घनता वाढत जाते त्यामुळे अश्मरी होतात. शुक्राश्मरीमध्ये वीर्य बाहेर पडताना मध्ये अडथळा निर्माण झाल्यास शुक्राश्मरी निर्माण होतो. अश्मरी निर्माण होण्यापूर्वी पोट फुगणं, ओटीपोटामध्ये दुखणं, मुत्राला जास्त दुर्गंधी येणं, लघवीला अडखळत होणं, क्वचित ज्वर म्हणजे ताप येणं यासारखी लक्षणं दिसतात. अश्मरी निर्माण झाल्यावर मूत्रमार्गात अवरोध झाल्यानं मुत्राची धारा विशीर्ण होते म्हणजे एकाऐवजी अनेक धारा येतात. मूत्रमार्गात, बेंबीजवळ, ओटीपोटात खूप वेदना होतात. लघवी अडखळत होते. क्वचित मूत्रप्रवृत्तीच्या वेळी रक्त येतं, जळजळ होते, वृषणामध्ये वेदना होते. काही रुग्णांमध्ये अश्मरी म्हणजे खडा पूर्ण तयार न होता बारीक वाळूप्रमाणे होतो. असेही रुग्ण बºयाच प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वी हे सर्व रुग्ण तपासून लक्षणांनुसार निदान करावं लागत होतं. आजकाल क्ष किरण, सोनोग्राफी यांसारख्या उपकरणांमुळे निदान करणं सोपं झालं आहे. सोनोग्राफीमुळे मूतखडा नेमका कोठे आहे, त्याचा आकार किती आहे याचं पूर्ण निदान करता येतं. त्यामुळे तो औषधानं जाईल का शस्त्रक्रिया करावी लागेल हे ठरवता येतं. विशिष्ट आकारापेक्षा जास्ती मोठे खडे असल्यास किंवा किडनीमध्ये खालच्या भागात घट्ट अडकून बसले असल्यास ते शस्त्रक्रियेनं काढावे लागतात. औषधी चिकित्सेमध्ये प्रथम अग्निवर्धक औषधं देऊन नंतर अश्मरीचे भेदन करतील आणि अश्मरीचे पतन करण्यासाठी विशिष्ट औषधींचा वापर करता येतो. १७-१८ मि.मी.पर्यंतच्या आकाराच्या अश्मरी औषधी चिकित्सेनं जातात. मूत्रमार्गात असलेले मूतखडे लवकर पडून जातात. किडनीमधील खडे जाण्यास वेळ लागतो. सर्वच रुग्णांमध्ये असंच होईल हे सांगता येत नाही. या आजारात काय उपचार करावेत, याविषयी पुढच्या अंकात..

संबंधित

हुग्गी आणि चित्रान्न
अया
गोऱ्या हट्टाची काळी बाजू
पॅनकेक
दिवाणखाना

सखी कडून आणखी

पौष्टिक बिस्किटांची देशी रेसिपी
उब्याचे लाडू कसे करतात?
सपाट पोटासाठी काय कराल?
प्लाय फर्निचर करायचंय मग हे वाचा !
दोन व्हीलचेअर गर्ल्सची प्रेरणादायी गोष्ट वाचायला चुकवू नका.

आणखी वाचा