- डॉ. मृण्मयी भजक 

केतकी घामानं डबडबली होती. तिला दम लागला होता. तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून ती जरा भिंतीला टेकली. तिला तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. ती जोराजोरात श्वास घेत होती. दम खात होती. इतक्यात पियाचा आवाज आला, ‘आई पळ तो बघ..’ आणि केतकी पुन्हा पळू लागली. इतका दम लागलेला असताना पुन्हा पळायची ताकद तिच्यात कुठून आली हे तिचं तिलाच कळलं नाही. तिच्या क्षमतेपेक्षा जास्तच ती आज पळत होती हे तिच्या लक्षात आलं. पण पळता पळता काहीतरी गनिमी कावा खेळून तो समोर आलाच आणि जोरात ओरडला ‘ये...काकू आउट, काकू आउट’.
कितीतरी वेळापासून आउट न झालेली केतकी आउट झाली. पिया आनंदानं आईच्या गळ्यात पडली. ‘काय मस्त खेळलात काकू तुम्ही’, सगळी मुलं म्हणू लागली. आणि पियाचा चेहरा आनंदानं फुलू लागला. सगळी मुलं अंगणातच दमून खाली बसली. केतकी पण दमली होती. पण तिला आज फारच मस्त वाटत होतं. सगळ्यांसाठी सरबत बनवण्यासाठी ती उठली.
आज रोजच्याप्रमाणे सगळी मुलं अंगणात खेळत असताना, शार्दूलनं फारच आग्रह केला म्हणून ती पकडापकडी खेळायला अंगणात उतरली. मुलांच्या खेळात तिच्या वयाला आणि तिच्या मोठेपणाला अजिबात स्थान मिळालं नाही. आणि तिला स्वत:ला विसरून पळता येईना. म्हणजे तिची क्षमता होती पण मनानं तिला खेळाशी एकरूप होता येत नव्हतं. लहान मुलांच्या खेळात ती मोठी होऊनच खेळत होती. त्यामुळे गणित चुकत होतं. ती पटपट आउट होत होती. हे पाहून तिची मुलगी पिया फारच नाराज झाली. आपल्या आईला नीट खेळता येत नाही हे तिला अजिबातच आवडलं नाही. आणि ‘टाइम प्लिज’ घेऊन ती जिन्याच्या पायरीवर जाऊन बसली.
म्हणाली हा गेम मी खेळत नाही.
पुढच्या डावाला येते. केतकीला पियाच्या नाराजीचं कारण लगेच कळलं आणि तिनं पूर्ण शक्तीनिशी खेळात उतरायचं ठरवलं. खरंतर आज ती पियासाठी जीव तोडून खेळली होती. पण तिला स्वत:ला पण खूप छान वाटत होतं. गेल्या कितीतरी वर्षांत ती असं भान विसरून खेळली नव्हती. अधूनमधून ती नवऱ्याबरोबर बॅडमिंटन खेळत असे, पण आजची मजा काही औरच होती. ताणतणाव कमी करण्याचा एक उपाय म्हणून मुलांशी खेळावं असं आपण वाचलेलं असतं. पण फक्त वाचलेलंच. काय होतं नक्की मुलांशी खेळताना, हे माहीत असतं का?
मुलांशी खेळताना पहिला नियम म्हणजे आपल्याला मूल व्हावं लागतं. अन्यथा मुलं आपल्याला खेळात स्वीकारतच नाहीत. आणि एकदा आपण मूल झालो की वय, वजन, आपल्या मर्यादा, बारीकसारीक दुखणी या साऱ्यांचा विसर पडतोच. खेळ जसा रंगात येतो तसं आपण आनंदून जातो आणि चिडीचा डाव खेळल्यावर ओरडून ती चीड व्यक्तही करतो. खेळ असतो काही मिनिटांचा; पण त्यातून कितीतरी तासांची, दिवसांची ऊर्जा आपल्याला मिळते. खेळ मन लावून खेळला की मोठ्यांनाही मज्जा येतेच. मनात फक्त एकच मंत्र म्हणायचा.. ‘वयं मोठम् खोटम्’.