- शुभा प्रभू-साटम

व्रतवैकल्यं असोत की सणवार, राजकीय घटना असो की सामाजिक घडामोड.. आल्या फॉरवर्डवर झुलतोय का आपण?

 

आपल्याकडे सणावारांची कमतरता नाही. एकामागोमाग एक असे अनेक सणवार येतात. त्यांचं पालन होतं. परंपरेनं ते पिढीनुसार पाळले जातात.. पण. हा पण जो आहे ना तो मोठा वाईट आहे. अनेक गर्भित अर्थ, आव्हानं त्यात आहेत. आई सासू करतात म्हणून मुली आणि सुनाही परंपरा, सण, व्रतवैकल्यं करतात. पण हे करताना आपल्याला हे खरंच पटतंय का, हा प्रश्न स्वत:ला कधी विचारला जात नाही. सध्या सोशल मीडियामुळे विचारवंतांची अजिबात कमी नाही. रामप्रहरापासून बदाबदा ज्ञान ओतलं जातं. मग ते वटसावित्री असो वा व्हॅलेण्टाइन्स डे, शिवरात्री असो वा पाडवा.. ढीगभर शुभेच्छा आणि संदेश असतातच. या शुभेच्छा आणि संदेशाच्या ओढ्यात वाचणाराही वाहवत जातो. आता श्रावण महिन्याबद्दलचा संदेश जर मोबाइलवर हजार ठिकाणाहून आला तर गोंधळून जाणारच ना? आधी एक बरं होतं, काही माहिती मिळवायची तर संदर्भ मिळवावा लागायचा. त्या अनुषंगानं वाचन आणि पडताळणी व्हायची. दोन चार जाणकारांशी चर्चा घडायची आणि मग त्याबद्दल काहीतरी एक मत पक्कं व्हायचं. या एवढ्या प्रक्रियेतून कळत नकळत अनेक गोष्टी समजल्या जायच्या. यातून गैरसमज दूर व्हायचे. आता तर सगळंच सोप्पं झालंय. कोणतीही माहिती असो, एका क्लिकवर सगळं हजर होतं. आणि ते वाचून वाचणाऱ्यालाही प्रकांड पंडित झाल्यासारखं वाटतं. आणि इथेच गरज आहे ती तारतम्याची अन् विवेकाची. आपल्याला संदेश आणि शुभेच्छादाखल जी माहिती मिळालीय ती कितपत खरी आहे वा कितपत खोटी हे जाणून घेण्याची गरज आहे. अनेकदा जे समोर दिसतं तेच खरं असतं असं नाही आणि अनेकदा जे खरं वाटतं ते सत्य असतंच असं नाही. मतं बनवणं आपल्या हातात आहे आणि ते अत्यंत संयमानंच व्हायला हवं. हल्ली हा संयमच सुटतोय. आपली सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक मतं कोणतीही असोत ती मांडण्यातलं तारतम्य हरवतंय. कारण काय की यानं सांगितलं म्हणून, ते तसं झालं म्हणून आणि ते असंच चालत आलंय म्हणून. मग ते आपणही मांडायचं, आपणही करायचं. त्यामागे आपल्या स्वत:चा ठाम विचार नाहीच. सणवार, पिढी परंपरा याबाबत आपण ठाम भूमिका घेतो का? ठाम म्हणजे दुराग्रही नव्हे. ठाम म्हणजे आक्रस्ताळी नव्हे. ठाम म्हणजे हट्टीपणाही नव्हे. एकदा का ही ठाम भूमिका घेता आली तर पुढचं सगळं सरळ होतं. सारखे इकडून तिकडे उड्या मारत राहिल्यानं काहीही साध्य होत नाही. तळ्यात मळ्यात हा खेळ आहे. आयुष्य नाही. तेव्हा जे करतो आहे ते का, त्याबाबत आपलं मत काय हे एकदा स्वत:ला विचारावंच. वाहवत जाण्यापेक्षा ही ठाम भूमिका केव्हाही चांगली! 

 

 (लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)shubhaprabhusatam@gmail.com