- वैद्य विनय वेलणकर

प्रत्येक व्यक्तीला नित्य भूक लागत असते. व्यक्तिसापेक्ष प्रकृतीनुसार, ऋतूनुसार यामध्ये फरक पडतो. परंतु विविध कारणांमुळे अन्नपचनाची प्रक्रिया नीट न झाल्यामुळे शरीराच्या अन्य घटकांचे (धातूंचे) पोषण नीट होत नाही त्यास अग्निमांद्य म्हणतात.

भूक का लागत नाही? 

अजिबात न खाणं किंवा अतिप्रमाणात खाणं, रूक्ष अन्न सेवन, चिंता, भीती, मानसिक तणाव, अतिजागरण व अव्यायाम इ. गोष्टींचा परिणाम भूक लागण्यावर होत असतो. 
अनेक आया लहान मुलांना दवाखान्यात घेऊन जातात आणि हा किंवा ही नीट जेवतच नाही ही तक्रार करतात. मुलांना कितीही वेगवेगळे पदार्थ दिले तरी ती नीट जेवत नाही ही तक्रार असते. लहान मुलांमध्ये अतिगोड खाणं किंवा कृमी यामुळे भूक न लागण्याची प्रवृत्ती दिसते. अति दूध पिण्याची सवय असल्यास अन्य पदार्थ न खाण्याकडे कल असतो.
सृष्टीतील प्रत्येक जिवाला स्वत: अन्न खाण्याची बुद्धी दिलेली असते. परंतु त्याचा अग्नी (भूक) प्रज्वलित होण्याची वाट पाहावी लागते. 
हल्ली दर दोन तासांनी खा असं सांगितलं जातं. त्याचा परिणाम भूक न लागण्यावर विशेषत्वानं होतो. 
पहिला घेतलेला आहार पचल्याशिवाय व्यक्तीला भूक लागत नाही. 
व्यक्तीच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ, ऋतू, त्याची मानसिक स्थिती इ. गोष्टींवर भूक लागणं न लागणं अवलंबूृन असतं. 
आजकाल पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, कॅटबरी, चॉकलेट यासारखे पदार्थ, थंड पदार्थ अन् थंड पेय यांची सवय, भेळ, फरसाण, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन् भूक लागत नाही. 

भूक वाढेल कशी?

- लंघन म्हणजे काही काळ खायला न दिल्यास आपोआप भूक वाढते. हा काळ व्यक्तिसापेक्ष, ऋतुसापेक्ष ठरतो. 
- मधून मधून पोट साफ राहण्यासाठी एरंडेल तेलासारख्या औषधांचा वापर करून पोटशुद्धी करणं आवश्यक आहे.
- काळ्या मनुका, सुकी अंजीरं यासारखे पदार्थ दिल्यास पोट साफ राहतं, भूक लागते आणि हे पदार्थ पौष्टिकसुद्धा असतात. 
- मूल लहान असल्यास मनुका, अंजीर भिजत टाकून त्याचा काढा करून वा मिक्सरवर ज्यूस काढूनही देता येतो.
- घरात असणारे सुंठ, मिरी, दालचिनी, पिंपळी यासारखे अनेक पदार्थ हे भूक वाढवणारे आहेत. या पदार्थांचे चूर्ण करून मधाबरोबर चाटवल्यास भरपूर भूक लागते. 
 
- घरात असणारा हिंग हासुद्धा कृमिनाशक अन् भूक वाढवणारा आहे. त्यामुळे वातही नाहीसा होतो.
- हिंग तुपात तळून खायला दिल्यास भूक वाढते अन् पोट साफ राहते.
- हिंगापासून बनवलेलं हिंगाष्टक चूर्ण नावाचं औषध बाजारात सहज उपलब्ध आहे. गरम पाण्याबरोबर, ताकामध्ये घालून किंवा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूप+हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगली भूक लागून पचनही चांगलं होतं.
- लसूण, पुदिना, आलं या पदार्थांचा वापर आहारात नित्य असायला हवा. त्यांची चटणी किंवा फोडणीच्या स्वरूपात वापर केल्यास चांगली भूक लागते. 
- तिळाची चटणी, पुदिन्याची चटणी, भोपळ्याच्या सालीची चटणी, कढीपत्त्याची चटणी यासारखे पदार्थ रुची उत्पन्न करणारे, पाचक आणि कृमीनाशक आहेत. हे खाण्याची सवय लहानपणापासून लावायला हवी.
 
-जेवणामध्ये साजूक तूप आणि जेवणानंतर ताक या पदार्थांचा वापर असायला हवा. हे दोन्ही पदार्थ भूक वाढवणारे आहेत.

- वयानं मोठी असणारी मुलं जर नीट जेवत नसतील तर त्यांना नित्य व्यायामाचा आग्रह धरला पाहिजे. किमान रोज १२ सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुलांना लावायला हवी. किमान एक तास मैदानी खेळ, भरपूर धावणं, खो खो, फुटबॉल, कबड्डी इ. खेळांची आवश्यकता आहे.
 
- रात्री उशिरा जेवणाची सवय मोडून सायंकाळी लवकर जेवणाची सवय लावणं आवश्यक आहे. शास्त्रानुसार सूर्यास्ताला जेवण करणं आवश्यक आहे. 
- टीव्ही पाहत किंवा मोबाइल पाहत जेवण करणं टाळायला हवं. 
-  प्रसन्न मन आणि प्रसन्न वातावरण हेसुद्धा भूक वाढवण्यास उपयुक्त आहे. 
- ओवा हा उत्कृष्ट कृमिघ्न असून, भूक वाढवणारा आणि पोट साफ करणारा आहे. मुखशुद्धी म्हणून चिमटीभर ओवा भोजनोत्तर किंवा भोजनापूर्वी द्यावा. लहान बालक असल्यास ओव्याचा अर्क अर्धा किंवा एक चमचा देण्यास हरकत नाही. 
- जेवण झाल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करून अर्धा किंवा एक चमचा खाल्ल्यास भूक चांगली लागते अन् पोट साफ राहते. गॅसेस होत नाहीत. 
- लहान मुलांना गरम पोळीला तूप लावून त्यावर लसूण किंवा पुदिन्याची चटणी लावून रोल करून खायला दिल्यास मुलं ते अत्यंत आवडीनं खातात. परदेशात याला फ्रँकी म्हणतात. नवीन नाव देऊन पदार्थ दिल्यास मुलं मोठ्या आवडीनं खातात. 
- पूर्वी घरा-घरात दर महिन्यात एरंडेल देण्याची पद्धत होती. ते अत्यंत आवश्यक आहे. महिन्यातून किमान एक वेळा सकाळी लवकर उठून एरंडेल ४-६ चमचे घेतल्यास पोट साफ राहतं. त्यामुळे पचनाच्या अन् भुकेच्या तक्रारी राहत नाहीत आणि आरोग्यही चांगलं राहतं.

लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत. 
 

vd.velankar@gmail.com