Interference in menstrual Cycle affected on your body and mind. Read this! | पाळी लांबवण्याचा ‘खेळ’ महागात पडतो! - हे वाचा
पाळी लांबवण्याचा ‘खेळ’ महागात पडतो! - हे वाचा

-वैद्य राजश्री कुलकर्णी


जाणीवपूर्वक एखादी गोष्ट वेगानं शरीराबाहेर पडणं म्हणजे नैसर्गिक वेग. स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला असा ठरावीक वेळी उत्पन्न होणारा वेग म्हणजे मासिक पाळी! याविषयी तर आपल्याकडे बोललंच जात नाही. पाळी एक शरीरधर्म आहे, नैसर्गिक गोष्ट आहे याविषयी अजूनही जनजागृती नाही. उगीचच काही धारणा जोडून मासिक पाळीचा बाऊ केला जातो. 

एखाद्या गोष्टीत अडथळा नको म्हणून पाळीच पुढे ढकलणं ही गोष्ट स्त्रियांना खूपच सोपी वाटते. गौरी-गणपती, दिवाळी, दसरा, नवरात्न हे ठरलेले सणवार आहेत ज्यावेळी मोठय़ा संख्येनं स्त्रिया पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या डॉक्टरकडून लिहून घेतात, तर कधी कधी अगदी परस्पर औषधांच्या दुकानातून स्वत: त्या घेऊन येतात आणि त्यांचं सेवन करतात. त्या गोळ्या घेणं किती सुरक्षित आहे? गोळ्या किती दिवस घ्यायच्या? आपल्या प्रकृतीला त्या चालतील की नाही, या कशाचाही विचार न करता औषधं वापरली जातात. सगळ्यात भयंकर प्रकार काय असेल तर किरकोळ कारणं, सणवार अशा गोष्टी पुढे करून बायका या संप्रेरकांच्या (हॉर्मोन्सच्या) गोळ्या घेतातच; शिवाय आपल्या किशोरवयीन मुलींना देखील देतात. 

संप्रेरकांशी घातक खेळ  

मासिक पाळी  नियमित, वेळेवर येणं, त्याचा स्त्राव मध्यम स्वरूपाचा असणं, तो चार दिवस सुरू राहून नैसर्गिकपणे थांबणं, ही सगळी लक्षणं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. शरीरात स्त्रवणारी सगळी प्रजनननाशी संबंधित संप्रेरकं योग्य प्रमाणात स्रवत असल्याचं ते निदर्शक आहे. पण जेव्हा अशा स्वरूपाची काही औषधं घेऊन या संप्रेरकांचा शरीरातील स्राव बदलला जातो, त्यांचं प्रमाण बदललं जातं तेव्हा त्याचे शरीरावर घातक  परिणाम होतातचं.  

पाळी लांबण्याच्या गोळ्या घेतो तेव्हा..

पाळी लांबवण्याच्या गोळ्या या विशिष्ट प्रकारच्या संप्रेरकांच्या असतात आणि ती रक्तात मिसळून कृत्रिमरीत्या पाळी दाबून ठेवतात, स्त्राव सुरू होऊ देत नाहीत. ज्यावेळी या गोळ्या घेणं बंद केलं जातं त्यानंतरदेखील दोन तीन दिवसांनी त्यांचं रक्तातील प्रमाण कमी होऊन पाळी सुरू होते. काही स्त्रियांना या गोळ्यांमुळे मळमळ, चक्कर, डोकेदुखी असे  त्रास होतात. कधी कधी पाळी आल्यावर एकदम खूप प्रमाणात स्त्राव होतो, गाठी पडतात तर कधी त्या विशिष्ट चक्रापुरता एकदम कमी स्त्राव होतो आणि मग पुढच्या वेळी अचानक जास्त स्त्राव होतो. कधी कधी मासिक पाळी अनियमित होते. अंगावर सूज येणं, चिडचिड ,  मूड स्विंग अशी लक्षणंदेखील जाणवू शकतात.  

हा एक नैसर्गिक वेग आहे आणि तो वेळेवर प्रवृत्त होणं हे  स्त्री स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कधीही वाटेल तेव्हा त्या गोळ्या कोणीही  स्त्रीनं घेणं आणि विशेषत: किशोरवयीन मुलींना देणं हे अगदीच चुकीचं आहे. कोणत्याही दबावाला बळी पडून मी अशा गोळ्या घेणार नाही आणि माझ्या मुलींनाही अजिबात देणार नाही असं जोपर्यंत स्त्रिया निश्चय करणार नाही तोपर्यंत हे कमी होणार नाही.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)  

rajashree.abhay@gmail.com


Web Title: Interference in menstrual Cycle affected on your body and mind. Read this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.