Indian bread taste change by region. How? Read this. | चार टोकांची चवबहार
चार टोकांची चवबहार


-सायली राजाध्यक्ष

भारतीय ब्रेडमध्ये रूप आणि चवीच्या बाबतीत खूप विविधता आहे. या ब्रेडसोबत लागणारे पदार्थही खास असतात. आता बट्टय़ा हे त्याचं उत्तम उदाहरण. बट्टय़ा हाही एक ब्रेडचाच प्रकार. रवाळ कणकेत चवीपुरतं मीठ, गरम तेलाचं मोहन आणि हवा असल्यास ओवा घालून कणीक घट्ट भिजवावी. भिजवलेली कणीक चांगली मुरू द्यावी. त्यानंतर त्याचे चेंडूप्रमाणे लहान गोळे करावेत आणि ते ओव्हनमध्ये किंवा निखा-यावर भाजावेत. खमंग भाजले गेले की कुस्करावेत आणि त्यावर तूप आणि वरण घालून खावेत. राजस्थानात या बट्टय़ा साजूक तुपात बुडवून ठेवतात आणि मग खातात. खानदेशात बट्टय़ांबरोबर वांग्याचं भरीतही करतात.

पराठे हा तर एक संपूर्ण जेवणाचाच प्रकार.  फ्लॉवर, मुळा, बटाटा, पनीर, मिश्र भाज्या, मेथी, पालक, बीट असे वेगवेगळे घटक पदार्थ वापरून पराठे करता येतात. बरोबर एखादं लोणचं किंवा चटणी आणि घट्ट दही असं असलं की पूर्ण जेवण होतं. पराठे तेल किंवा तूप किंवा लोणी लावून भाजता येतात. पराठय़ांबरोबर उत्तर हिंदुस्थानी डाळी म्हणजे माह की दाल, धाबेवाली दाल, राजमा छान लागतात. केरळात मिळणारा मलबारी परोठा हाही एक प्रसिद्ध प्रकार.

नान हाही ब्रेडचाच प्रकार. मैदा भिजवून केलेले नान तंदूरमध्ये भाजले जातात. यालाच मग कधी बारीक चिरलेला लसूण लावून गार्लिक नान तर कधी पुदिना लावून पुदिना नान केले जातात. मिस्सी रोटी, सिंधी कोकी हे पदार्थ डाळीच्या पिठाचा वापर करून केले जातात. कुलचा म्हणजे मैद्याच्या पारीत सारण भरून केलेला पराठय़ाचा प्रकार. 

उत्तरेत छोल्यांबरोबर केला जाणारा भटुरा हाही एक ब्रेडचाच प्रकार. मैद्यात सोडा घालून पीठ भिजवायचं आणि मग त्याच्या मोठय़ा आकाराच्या पु-या लाटून तळायच्या.  हे दोन्ही पदार्थ पचायला जड म्हणून बरोबर कच्चा कांदा आणि पुदिना चटणी हवीच. बंगाली लोक मैद्याच्या पु -या करतात त्याला लुची म्हणतात. ही लुची खसखशीचं वाटण घालून केलेल्या बटाट्याच्या भाजीबरोबर, आलू पोश्तोबरोबर खातात.

मक्के दी रोटी आणि सरसो दा साग ही पंजाबी जेवणाची खासियत. मक्याच्या पिठात थोडी कणीक मिसळून त्याच्या रोट्या करायच्या. खमंग भाजल्या की त्यावर ताजं लोणी घालायचं. बरोबर सरसो दा साग.  श्रीमाल ही रोटी केशर घालून केली जाते. काश्मीरमध्ये ही रोटी खाल्ली जाते. बिहारमध्ये लिट्टी-चोखा केलं जातं. त्यातल्या लिट्टी करताना कणकेच्या पारीत सत्तूचं (फुटाण्याचं) पीठ भरलं जातं. चोखा म्हणजे सरसोच्या तेलात केलेलं वांग्याचं भरीतच. अक्की रोटी हा तांदळाच्या रोटीचाच प्रकार.

तळलेल्या ब्रेडमध्ये उडदाचे वडे हा एक प्रकार. यासाठी उडीद, चणा डाळ आणि  तांदूळ वापरून केलं जाणारं पीठ भिजवतात. नंतर ते हातावर थापून तेलात पु-यासारखे तळतात. हे वडे आणि बरोबर मसालेदार रस्सा भन्नाट लागतो. या वड्यांबरोबर काळ्या वाटाण्यांची उसळही छान लागते. तळलेल्या ब्रेडचा  प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पुर्‍या.  श्रीखंड, आमरस, उकडलेल्या बटाट्याची भाजी  या पदार्थांबरोबर पोळीपेक्षा पुरीच चांगली लागते.  शिवाय भरपूर पालक किंवा मेथी चिरून, त्यात लसूण वाटून घालून, तीळ-तिखट-मीठ-हळद-हिंग घालून केल्या जाणा-या पु-या  मस्त लागतात. भरपूर कोथिंबीर घालून केल्या जाणा-या पु-याही उत्तम लागतात. उत्तर भारतात मटार, मूगडाळ असे पदार्थ घालूनही पु-या केल्या जातात. आपल्याकडे सांजा भरून सांजो-या केल्या जातात. डाळ भरून राधावल्लभी  केली जाते.

दोसे, अप्पम, इडल्या हेही ब्रेडचेच प्रकार. या सगळ्या पदार्थांसाठी तांदूळ आणि डाळी भिजत घातल्या जातात. वाटून ते पीठ आंबवलं जातं. उकडून इडली केली जाते, तर अप्पम पात्रात अप्पम वाफवले जातात. रेशमी, मऊसूत अप्पम आणि बरोबर भाज्यांचा स्ट्यू हे केरळातलं खास जेवण आहे. आप्पे हाही ब्रेडचाच प्रकार. डाळी भिजवून, वाटून ते पीठ आंबवायचं. नंतर त्यात आलं-मिरची, कोथिंबीर घालायची आणि आप्पेपात्नात मस्त गोलमटोल आप्पे करायचे.

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com


Web Title: Indian bread taste change by region. How? Read this.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.