- अजित जोशी

नाही, मी मगापासून ऐकते तुमचं बोलणं. हे आरओसी आणि आरडब्ल्यू वगैरे काय बोलताय तुम्ही? काय नवी कंपनी वगैरे जॉइन करताय की काय?’ - न राहवून वत्सलाबाई डब्यात बसलेल्या समोरच्या दोघी जणींना म्हणाल्या. औरंगाबाद सोडल्यापासून त्या ऐकत होत्या. या बायकांच्या तोंडी भलत्याच गप्पा होत्या!
‘नाही हो...’ - हसत हसत माधुरी म्हणाली. ‘आम्ही जुन्याच कंपन्यांचा हिशेब मांडतोय.’
‘म्हणजे?’ ‘अहो आम्ही दोघीही जणी स्वामी धनानंदांच्या साधिका आहोत.’
‘धनानंद म्हणजे...’ ‘जोडून वाढवा पैसा, हाच स्त्रीचा वसा...’ असं ब्रीदवाक्य आहे ना त्यांचं ते.’ 
‘व्वा, ब्रीदवाक्य तर भारी आहे, पण त्या स्वामींचे हे कोणते मंत्र म्हणताय इंग्रजीतून?’
‘अहो, हे मंत्र आपला जोडलेला पैसा कसा वाढवता येईल, त्याचे आहेत. स्वामीजी म्हणतात, न कळणाऱ्या भाषेत शंभर वेळा मंत्र म्हणून लक्ष्मीमाता प्रसन्न होत नसते. त्यापेक्षा आचरणात आणता येतील ते मंत्र कोणत्याही भाषेत एकदाच म्हणा, तर ती नक्की दर्शन देईल’ - आता झरीनापण सुरू झाली.
‘अच्छा? मग हे मंत्र म्हणून कसा काय फायदा होतो तुमचा?’ ‘सांगते, अहो हे शेअर बाजारात यश मिळवण्याचे मंत्र आहेत. पण त्यांच्याकडे जायच्या आधी, तुम्ही स्वामीजींची ही पुस्तिका वाचा. ‘कंपनी म्हणजे काय?’ माधुरीनं झटकन एक पुस्तिका दिली. कंपनीत कसे हिस्सेदारांचे आणि कर्जदारांचे पैसे असतात, स्वत:चं कसं काहीच नसतं, जास्त नफा मिळवायला कंपनी कशी कर्ज वापरते, कंपनीनं मिळवलेल्या नफ्यातून व्याज आणि कर वजा जाता उरलेला नफा कसा हिस्सेदारांना जातो वगैरे सगळी माहिती वाचून होईपर्यंत नाशिक आलेलं होतं. तोपर्यंत माधुरी आणि झरीनानं गप्पांतून विश्रांती घेऊन एक मस्त झोप काढली. ‘आता तुमच्या लक्षात आलं का की कंपनी निखळ उद्योगव्यवसायातून जो नफा कमावते, तो असतो ‘कामकाज नफा’ (Operating Profit). तो जातो, निधी पुरवणाऱ्या सर्वाना. मग ते कर्जदार असो का हिस्सेदार’ - माधुरीनं पुन्हा गप्पा सुरू केल्या. 
‘हां... म्हणजे एकूण मिळालेले पैसे वापरून कंपनी हा ‘कामकाज नफा’ कमावते तर.’ 
‘बरोब्बर. आता त्यातून कर्जदारांचं व्याज द्यायला हवं, कर भरायला हवा आणि उरेल तो फायदा हिस्सेदारांचा!’ - झरिना म्हणाली. 
‘पण थांबा, मुळात कंपनी किती चांगल्या प्रकारे पैसा वापरू शकते ते कळायला पाहिजे ना? म्हणजे, हा कामकाज नफा, कंपनीचा उद्योग करायला दिलेल्या एकूण पैशाच्या किती टक्के आहे ते पाहायला हवं. तेच असतं फडउए. ‘रिटर्न आॅन कॅपिटल इम्प्लोयिड म्हणजे कामकाज नफ्याचे टक्के!’ ‘अस्सं, आणि मग पुढे?’ - आता वत्सलाबाईंना पण इंटरेस्ट वाटायला लागला होता! ‘त्यातून व्याज जाईल कर्जदारांना आणि कर जाईल सरकारला. मग जे उरतील ते पैसे हिस्सेदारांचे म्हणजेच फडठह ‘रिटर्न आॅन नेट वर्थ’ अर्थात ‘हिस्सेदारांच्या फायद्याचे टक्के.’
‘पण हे सगळं समजलं तर काय उपयोग होईल?’ - वत्सलाकाकू म्हणाल्या. ‘होईल नं. असं बघा, दोन कंपन्या आहेत एकाच क्षेत्रातल्या. समजा वाहन उद्योग! अ आणि ब! त्यांचा फडउए आहे, १४ आणि १७ टक्के.’
‘म्हणजे अ पेक्षा ब जास्त चांगल्या प्रकारे एकूण पैशातून कामकाज नफा कमावते.’
‘बरोबर, पण फडठह मात्र आहेत १३ आणि १२ टक्के!’ ‘अरेच्चा, म्हणजे अ च्या हिस्सेदारांचा जास्त फायदा...’ - वत्सलाबाई उद्गारल्या. 
‘हो...’ झरीनानं उदाहरण पुढे नेलं. ‘पण मला सांगा, हा जास्त फायदा का होतो? कारण अ ने पैसे उभे करताना कर्जाऊ रकमेचा हिशेब बरोब्बर जमवलाय. अ ला योग्य भावात जास्त कर्जाऊ रक्कम उपलब्ध होते ब पेक्षा.’ ‘बरं हे काय आपण नवीनच शिकतोय बाबा, असं वत्सलाबार्इंना वाटून गेल्याशिवाय राहिलं नाही.’ म्हणजे अ च ब पेक्षा चांगली, नाही का?’
‘थांबा, थांबा. स्वामीजी नेहमी सांगतात, ‘नुसती मीठ आणि तिखट बरोबर टाकून भाजी जमत नाही! सगळ्या गोष्टींचं मिश्रण बरोबर झाल्याशिवाय पदार्थ रुचकर होत नाही! तेव्हा एखाददोन प्रमाणं घेऊन निष्कर्ष काढू नका’. आता हेच बघा, उद्या जर वाहन उद्योगाला मंदी आली, तर कमी कर्ज असल्यामुळे ब चा निव्वळ हिस्सेदारांसाठीचा नफा जास्त चांगला राहील का नाही?’
‘अरे बापरे, मग अशी ही किती प्रमाणं बघत बसायची आपण...!’
‘तशी स्वामीजी सांगतात सात!’ - माधुरी हसत हसत म्हणाली. ‘पण एकदम नको ती. काय आहे, आधी गुंतवणुकीच्या मूळ कल्पना शिकून घ्या स्वामीजींकडून, मग हळूहळू शेअर मार्केट जमायला लागेल...’
‘घेते ना, जरूर घेते! अहो इतक्या वेळेला आले औरंगाबादहून मुंबईला... पहिल्यांदाच इतक्या फायद्याच्या गप्पा मारल्या मी’ - वत्सलाबाई खुशीत म्हणाल्या.