Importance of MR Vaccination. | गोवर-रूबेला लस कशासाठी?
गोवर-रूबेला लस कशासाठी?


-- डॉ. अमोल अन्नदाते

गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राज्यात राबवली जात आहे. राज्यभरातील नऊ महिने ते 15 वर्षांखालील तीन कोटी 38 लाख बालकांना शासनातर्फे या दोन लसी एकत्रित मोफत दिल्या जाणार आहेत. सध्या सर्व माध्यमातून या लसींविषयी जोरदार जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेकांच्या मनात त्याविषयी संभ्रम आहे. या लसीकरणाचा मूळ हेतू, त्याचे जागतिक संदर्भ, मोहिमेचे भवितव्य आणि लसींचे परिणाम आणि दुष्परिणाम याविषयी शंका-कुशंका आहेत. 

सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही फक्त महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आरोग्य खात्याची मोहीम नसून ही जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक मोहीम आहे. जे आपण आज करतोय ते अमेरिका व युरोपने 60च्या दशकात करून झाले आहे. या दोन्ही समूहांनी मास वॅक्सिनेशन अर्थात सामूहिक लसीकरण एकाच वेळी लसीकरण करून गोवर आणि रूबेलाचं त्यांच्या देशातून पूर्ण उच्चाटन केलं. पण आफ्रिका आणि  दक्षिण पूर्व आशिया देशातून हे व्हायरस अजूनही हद्दपार झालेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने 2020 पर्यंत या देशांमध्ये देशव्यापी लसीकरण मोहिमांचा संकल्प केला. 

भारत या जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य असल्याने या मोहिमा राबवण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या आधी श्रीलंका, बांगलादेश, म्यानमारसारख्या आपल्यापेक्षा कमी विकसित राष्ट्रांनी ही मोहीम राबवली आहे. आता तिथं ती शेवटच्या टप्प्यात आहे. देर आए, दुरु स्त आए म्हणत भारतातल्या 22  राज्यात ही मोहीम राबवून आता महाराष्ट्रात ही मोहीम सुरू होते आहे, म्हणजे देशात ही मोहीम राबवणारं महाराष्ट्र हे तेविसावं राज्य आहे.  

मात्र हे सारं होत असताना काही पालकांच्या मनात मात्र संभ्रम, शंका आहेत.
त्याविषयी.
 

अनेक शिक्षित व उच्च आर्थिक स्तरातील पालकांना असं वाटतंय की ही मोहीम गरिबांसाठी आहे. आमच्या मुलांना त्या आजारांचा धोका नाही. ज्यांना हा आजार होऊ शकतो अशांनाच ती लस द्यावी, सरसकट सर्वांना लस कशासाठी? मात्र हे खरं नाही. गोवर - रूबेला हे दोन व्हायरस देशातून पूर्ण हद्दपार करायचे असतील तर देशातील 95 टक्के बालकांना (एका विशिष्ट आणि कमीत कमी कालावधीत) ही लस मिळणं आवश्यक आहे. हे प्रमाण 94 टक्के झालं तरी ही मोहीम फसेल आणि त्यासाठी खर्च होणार्‍या अवाढव्य निधीचा अपव्यय होईल. 
 आता हा व्हायरस हद्दपार करण्याच्या परमार्थात स्वार्थ कसा आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. गोवर आणि रूबेला या दोन लसींचे सावज असतात प्रतिकार शक्ती कमी असलेली माणसं. म्हणजे 1 वर्षाखालील मुलं आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध. त्यातच मधुमेह, कॅन्सरग्रस्त, किडनी आजारांनी ग्रस्त, कॅन्सरसाठी किमोथेरपी घेणारे या सर्वांना या दोन आजारांचा धोका संभवतो.  म्हणजेच तुम्ही तुमच्या बाळाला या लसीपासून वंचित ठेवले तर तुम्ही साठी उलटल्यावर स्वत: करता  या आजाराची तरतूद करून ठेवताय असे समजा. शिवाय तुमच्या जवळच्या कोणाही मधुमेहग्रस्त किंवा उपरोक्त आजारांच्या सर्व रुग्णांचा जीव तुम्ही धोक्यात घालत आहात. 
 मनात असा प्रश्न आहे की मी आधी माझ्या बाळाला ही लस दिली आहे. तरीही ही लस सर्वांनी परत द्यायचं काय कारण? याचं कारण एकाच वेळेला सर्व बालकांना लस मिळणं महत्त्वाचं आहे. ते मास वॅक्सिनेशन ठरते. 
 

लस दिल्यानंतर आपल्या मुलांना त्रास होईल का अशी भीती काही पालकांना वाटते.  लसीकरणानंतर ताप, लसीची जागा दुखणं, थोडी फार पुरळ येणं अशी तुरळक लक्षणं दिसल्यास त्याचा फार ताण घेऊ नये.  त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर किंवा बालरोगतज्ज्ञांकडे बाळाची तब्येत दाखवून घ्यावी. या लसीमुळे डास चावताना होते त्याच्याही पेक्षा कमी वेदना होते. जीवघेण्या रिअँक्शनची अनेकांना भीती वाटते. मात्र त्यातून कोणाच्याही जिवाला धोका होणार नाही याबद्दल आश्वस्त राहावं. अशी कुठलीही रिअँक्शन आल्यास तिचे उपचार करण्यासाठी लस देणारी टीम सज्ज आहे. त्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे.

 ज्यांचा अनेक कारणांनी, विविध पॅथी किंवा धार्मिक-जातीय समज-गैरसमज म्हणून  या लसीकरणालाच विरोध आहे त्यांनी हे समजून घ्यावं की हे आजार संसर्गजन्य आजार आहेत. तुमची प्रकृती चांगली असली तरीही इतर बाधित व्यक्तीकडून इतरांना हा आजार होऊ शकतो. देशातून नव्हे तर जगातून हे व्हायरस हद्दपार करण्यासाठी ही मोहीम आहे. त्यामुळे त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. आवश्यक तर पालकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा यासंदर्भात सल्ला किंवा समुपदेशन घ्यावं.

 एकदा लसीकरण मोहीम राबवूनही चालणार नाही. पुढील दोन वर्षात जोरदार सर्वेक्षण करून या दोन आजारांचे विषाणू पूर्ण नाहीसे झाले की नाही याचा जोरदार शोध शासनाला घ्यावा लागणार आहे.
 त्यामुळे या मोहिमेत पालकांनी सहभागी होऊन मुलांना या संसर्गजन्य आजारापासून वाचवायलाच हवं !

 (लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.)

sakhi@lokmat.com

 


Web Title: Importance of MR Vaccination.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.