If you want to keep you healthy apply Abhyang daily. | आरोग्य सुदृढ राखायचं असेल तर अभ्यंग फक्त एक दिवस करून कसं चालेल?
आरोग्य सुदृढ राखायचं असेल तर अभ्यंग फक्त एक दिवस करून कसं चालेल?

-वैद्य राजश्री  कुलकर्णी

दिवाळीत पहाटे लवकर उठणं, नवीन आणलेली सुगंधी तेलाची बाटली आणि उटण्याची पुडी उघडून, त्या संमिश्र  गंधात सगळ्या घरच्या मंडळींना तेल, उटणं चोळून कडकडीत पाण्यानं छान अंघोळ घालणं ही आपली वर्षानुवर्षांची परंपरा राहिली आहे.

आपण नेहमीच पाहत आलो आहोत की आपले सगळे सणवार, त्याच्याशी संबंधित रूढी, परंपरा या सगळ्या आपल्या संस्कृतीशी, आरोग्य शास्त्राशी घट्ट  बांधलेल्या आहेत. त्यानुसार बघायचं झालं तर हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू म्हणजेच चार महिने हे आपल्याकडे थंडीचे महिने होत! मग दिवाळीच्या सुमारास सुरू होणारी ही थंडी बाधू नये, त्रासदायक ठरू नये म्हणून काय करता येईल याचे साधे उपाय सणावरांच्या रूढीत उत्तम प्रकारे गुंफून टाकले आहेत. जेणेकरून त्यांचं लोकांकडून नक्की पालन होईल.

थंडी पडू लागली की हवा जशी गार वाटते तशी ती कोरडी, रूक्षपण होऊ लागते. उष्णता शरीराच्या आत टिकवण्यासाठी शरीर प्रयत्न करू लागते. त्यामुळे घाम येणं बंद होतं. त्वचेची रंध्रे बंद करून घेतली जातात. साहजिकच नेहमी घाम येऊन त्वचा मऊ, मॉइस्ट ठेवली जाते, मृदू असते ती तशी न राहता, कोरडी पडू लागते. ज्यांची त्वचा मुळातच रूक्ष आहे त्यांना तर खूपच त्नास होऊ लागतो. 

कोरडेपणा खूप वाढल्यामुळे अंगाला खाज येऊ लागते, त्वचा पांढरट, निस्तेज दिसू लागते. दिवाळीत अंगाला तेल लावणं, भरपूर विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ करणं हे किती शास्त्रीय  आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल. मूळ मुद्दा अभ्यंगाचा. दिवाळीत मायेच्या माणसांना आपण किती लाडाकोडानं तेल लावून मस्त मॉलिश करून देतो. शरीराला गरजेची असणारी स्निग्धता पुरवणं हा अभ्यंगाचा मूळ हेतू आहे. कोणतंही तेल हे स्निग्ध गुणांचं असल्यानं ते कोरड्या त्वचेवर चोळलं तर रंध्रांमधून शोषलं जाते आणि हे नियमितपणे केल्यास त्वचा मऊ मुलायम राहते हे निश्चित !
त्यामुळे धनत्रयोदशीला बायकांना, नरकचतुर्दशीच्या दिवशी घरातील सगळ्यांना, पाडव्याच्या दिवशी नवरा आणि मुलाला आणि भाऊबीजेच्या दिवशी भावाला स्नानापूर्वी तेल चोळण्याची पद्धत आहे.

तेल कोमट करून अंगाला चोळायचं, कधी कधी हे तेल खूप जास्त होतं आणि अंघोळी नंतरही क्वचित चिकटपणा जाणवू शकतो म्हणून हा जास्तीचा ऑइलीनेस कमी करण्यासाठी उटण्याची योजना आहे. तसंही अगदी पूर्वी साबण वगैरे नव्हते तेव्हा त्वचा स्वच्छ करण्यासाठी उटण्याचाच वापर केला जाई. हे उटणं मात्र  छान सुगंधी, औषधी वनस्पती वापरून बनवलेलं उत्तम प्रतीचं हवं! तर ते त्वचेचं स्वास्थ्य टिकवेल! नुसती माती नको! आधी तेलानं छान मसाज करून मग जास्तीचं तेल निघावं म्हणून त्यावर कोरडं उटणं चोळणं अपेक्षित आहे. त्यानंतर भरपूर गरम पाणी वापरून छान स्नान केलं की त्वचा कशी उजळून जाते! चमकू लागते.

या दिवसात लागणा-या या तेल, उटणं या वस्तू आणण्यापासून वापरेपर्यंत सगळी जबाबदारी प्रामुख्याने घरच्या गृहिणीची असते. ती पहाटे उठून रांगोळी काढण्यापासून सगळ्या सदस्यांना तेल लावणं, स्नान घालणं हे अगदी उत्साहाने करत असते! ही गोष्ट किती छान आहे; पण या सगळ्या धावपळीत तिच्या हे कधीच लक्षात आलेलं नाही की या सगळ्या दिवसांमध्ये आपण अभ्यंग स्नान केलेलंच नाही.

धनत्रयोदशी हा दिवस बायकांचं नहाणं म्हणून पाळला जातो; पण त्या दिवशी फक्त बायका डोक्यावरून अंघोळ करतात, तेलबिल काही चोळत नाहीत! अभ्यंग तेलाची बाटली आणि उटण्याची पुडी दुसर्‍या दिवशी नरकचतुर्दशीच्या दिवशीच फोडली जाते ! स्वत:कडे दुर्लक्ष करणं, स्वत:ला महत्त्व न देणं, दुय्यय समजणं हे भारतीय स्त्रियांमध्ये फार पूर्वीपासून आढळत आलं आहे.

त्वचेचा, केसांचा कोरडेपणा जसा घरातल्या इतर सदस्यांना येणार आहे तसाच तो आपल्यालापण येणार आहे, पौष्टिक पदार्थांची गरज जशी बाकीच्यांना आहे तशी आपल्याही शरीराला आहे हे बायका लक्षातच घेत नाहीत. फराळाचे पदार्थ करायला पुढे, तेल लावायला पुढे; पण स्वत:साठी करायला मात्न मागे मागे, ही मानसिकता का?

वास्तविक दिवसभर घरातली सगळी कामं, शारीरिक कष्ट करणं, नोकरी, उद्योग करत असेल तर तो अँडिशनल ताण सहन करणं, स्वयंपाक, घरच्या सगळ्या लोकांची देखभाल, घराची स्वच्छता या सगळ्या गोष्टींचा स्त्नीच्या शरीरावर, आरोग्यावर फार मोठा ताण असतो. 

मानसिक ताणतणाव ही तर आता आपल्या आयुष्यातील अविभाज्य बाब झाली आहे, त्यामुळे हा अभ्यंग, निवांत सचैल स्नान याची सर्वाधिक गरज गृहिणीलाच असते. शिवाय दिवाळी आली म्हणून खूप खपून ती घरंदारं आवरते आणि थकून जाते, खूप कष्ट करून फराळाचे विविध पदार्थ बनवते आणि दमून जाते. तिला या रिलॅक्स               करणा-या गोष्टींची गरज कशी नसेल बरं?

मुलांना जन्म देणं, स्वत:चं दूध पाजून त्या मुलांना मोठं करणं, त्यांचं पालन-पोषण करणं या सगळ्या जबाबदा-या पेलताना स्त्रीचं शरीर, आरोग्य यावर अतोनात परिणाम होत असतो, शरीराची झीज होत असते. जी भरून काढण्यासाठी योग्य आहार, तेलाचा मसाज या गोष्टी खूपच उपयोगी आहेत. गरज आहे ती तिनं स्वत:ची मानसिकता बदलून, या गोष्टींचं स्वत:साठी असणारं महत्त्व समजून घेण्याची आणि इतरांना पटवून देण्याची!

 स्वास्थ्य रक्षणासाठी केले जाणारे सगळे उपाय प्रत्येकासाठी तितकेच गरजेचे आहेत हा विचार रुजवण्याचा आहे ! आणि त्वचेचं स्वास्थ्य जपण्याचे हे उपाय केवळ दिवाळीचे चार दिवस करून उपयोग नाही तर ते पुढे चार महिने परत उन्हाळा सुरू होईपर्यंत करायचे आहेत. दिवाळीचे चार दिवस सुट्टी, निवांतपणा म्हणून आपल्याला कोणी आनंदानं तेलबिल लावून देतीलही; पण पुढे चार महिने मात्न प्रत्येकानं आपल्या हाताने तेल लावून आपलं स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.

तेव्हा आजच निश्चय करा आणि या दिवाळीत स्वत:च्याही अंगाला सुगंधी तेलाने अभ्यंग करा.

पार्लरमध्ये जाऊन एक दिवस फेशियल करण्याइतकंच, नव्हे त्याहीपेक्षा जास्त हे उपयोगी आणि गरजेचं आहे हे नक्की ! 

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ  आहेत)

sakhi@lokmat.com​​​​​​​


Web Title: If you want to keep you healthy apply Abhyang daily.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.