If you want to extend your life, run daily! | आयुष्य वाढवायचं असेल तर रोज पळा!
आयुष्य वाढवायचं असेल तर रोज पळा!

-मृण्मयी पगारे

नुस्ता पळतो/पळते, एका जागी बसणंच माहिती नाही, असं आपण आपल्या मुलांविषयी किती सहज म्हणतो. त्याउलट आपण एका जागीच बसतो, पळणंच माहिती नाही. विचारा स्वत:ला आपण शेवटचं कधी पळालो होतो.

उत्तरच देता येणार नाही. पळणं ही अत्यंत मानवी क्रियाच आपण विसरून गेलोय, त्याची कारणं अनेक असतील; पण आपण पळत नाही हेच वास्तव. पळणं, चालणं हा जगभर उत्तम व्यायाम मानला जातो. त्यावर नियमित संशोधन होत असतं. अलीकडेच ‘रनिंग अँज अ की लाइफस्टाइल मेडिसिन फॉर लॉजिव्हिटी’ या शीर्षकाचा एक संशोधनात्मक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला. त्या अभ्यासात पळणं आणि जगणं यांचा थेट संबंध कसा आहे हे साधार सांगण्यात आलं आहे.

पळण्याचा व्यायाम जे करतात त्यांचं आयुष्य वाढतं, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांनी होणा-या मृत्यूच्या धोक्याचं प्रमाण केवळ पळण्याच्या व्यायामानं कमी होतं असं हा अभ्यास सांगतो.

या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासकांनी तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्यात पळण्याचा व्यायाम करणारे आणि इतर प्रकारचा व्यायाम करणारे असे दोन गट अभ्यासासाठी निवडण्यात आले आहेत. हा अभ्यास काही महत्त्वाच्या नोंदी करतो.
 

अभ्यास म्हणतो की..
1) जे लोक फक्त पळण्याचा व्यायाम करतात (इतर शारीरिक व्यायाम करत नाहीत) त्यांचा मृत्यूचा धोका हा इतर शारीरिक व्यायाम करणारे (पळण्याचा व्यायाम न करणारे) यांच्या तुलनेत 27 टक्क्यांनी कमी असतो. 

2) पळण्याचा व्यायाम करणारे जर इतर शारीरिक व्यायाम करत असतील तर त्यांच्या अचानक मृत्यूच्या धोक्याचं प्रमाण 43 टक्क्यांनी कमी होतं.

3) जे नियमितपणे पळण्याचा व्यायाम करतात त्यांच्या बाबतीत कॅन्सर होऊन मृत्यू होण्याचं धोका 30 टक्के ते 50 टक्क्यांनी कमी होतो. 

4) पळण्याचा व्यायाम नियमितपणे करणार्‍यांच्या बाबतीत हृदयाशी संबंधित गुंतागुंत होऊन होणा-या मृत्यूच्या धोक्याचं प्रमाण थेट 45 टक्के ते 70 टक्क्यांनी कमी होतं. 

5) पळण्याच्या व्यायाम करणा-याचं मानसिक आरोग्य हे उत्तम राहातं. शिवाय पळण्याचा नियमित व्यायाम करणा-यामध्ये मेंदूसंबंधित अल्झायमर, पार्किन्सन या आजारानं मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. पळण्याच्या व्यायामानं विमनस्कतेची लक्षणं कमी होतात. शिवाय मानसिक आजारांमुळे होणा-या मृत्यूचा धोकाही पळण्यानं कमी होतो. पळण्याच्या व्यायामानं मन शांत राहातं. मनाची स्थिरता वाढते आणि संयम शक्तीही वाढते. 

6) शरीराचा बांधा आखीव रेखीव राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी इतर कोणत्याही खेळापेक्षा, व्यायामापेक्षा पळण्याचा व्यायाम हा उत्तम असतो. कमरेचा घेर कमी करण्यासाठी पळणं हा उत्तम पर्याय आहे.

7) पळण्याचा व्यायाम नियमित करणा-यानी इतर आरोग्यविषयक चांगल्या सवयी राखल्या तर त्यांचं सरासरी आयुष्य 3.2 वर्षांनी वाढतं.

म्हणूनच हा अभ्यास सांगतो की दीर्घायुषी व्हायचं असेल तर न चुकता पळा!

sakhi@lokmat.com


Web Title: If you want to extend your life, run daily!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.