- वैद्य विनय वेलणकर

शरीरावर प्राकृत आकारमानापेक्षा वर आलेला, फुगलेला किंवा त्यात काहीतरी साचलं आहे असं वाटतं अशा स्थितीला शोथ किंवा सूज येणं असं म्हणतात. अशी सूज कधीतरी सर्व शरीराला, कधीतरी फक्त पायावर, क्वचित चेहऱ्यावर, क्वचित एका विशिष्ट अवयवाला येऊ शकते. आयुर्वेदात याचं वर्णन वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक अशा प्रकारे केलं आहे.

सूज का येते?

सूज येण्याचे निज आणि आगन्तुज असे दोन प्रकार पडतात. शारीरिक कारणांनी होणाऱ्या शोथ या व्याधीला निज असं म्हणतात आणि बाह्य कारणांनी होणाऱ्या व्याधीला आगन्तुज शोथ असं म्हणतात. उदा. मार लागणं, पडणं, टोचणं, कापलं जाणं यासारखे किंवा बिब्बा, खाजकुइरी, रूई यासारख्या वनस्पतींच्या संपर्कानंसुद्धा सूज येते. त्यास आगन्तुज म्हणजे बाह्य कारणांनी येणारी सूज असं म्हणतात. यामध्ये विषारी वनस्पती, वायू, गांधीलमाशी, कोळी किंवा विशिष्ट किडे चावून येणाऱ्या सूजेचा अंतर्भाव होतो. निज म्हणजे शारीरिक कारणांनी येणाऱ्या सूजेमध्ये अत्याधिक उपचार, पंचकर्माचा अतिरेकी वापर, वारंवार उलट्या करण्याची सवय असणं वा वारंवार जुलाब होण्याची औषधं घेणं, अतिशय थंड, आंबट, खारट, उष्ण पदार्थ खाणं, दह्यासारखे पदार्थ, विरुद्ध गुणांचे पदार्थ अतिप्रमाणात खाणं, अतिश्रम, अतिपाणी पिणं, माती खाणं अति प्रवास करणं, नैसर्गिक प्रवृत्तींचा अवरोध करणं यांसारख्या कारणांनी शोथ अर्थात सूज ही व्याधी होते. अन्य व्याधींचा उपद्रव स्वरुपातसुद्धा सूज ही व्याधी होते. उदा. श्वास, कास, अतिसार, राजक्षमा अर्थात टीबी, ज्वर, पांडू (अ‍ॅनेमिया), उदर (पोटात पाणी होणं), मूत्रपिंडाचे विकार (किडनी फेल्युअर), हृदयरोग यासारख्या व्याधींचा परिणाम म्हणूनसुद्धा शरीरावर सूज येते.
सूज म्हटली की प्रामुख्यानं हृदय, किडनी आणि यकृत या तीन अवयवांची विकृती असं प्रामुख्यानं धरलं जातं. परंतु आयुर्वेदानं या व्याधीचा खूप गंभीरतेनं विचार केला आहे. याचं निदान करताना सूज पायाकडून येते की चेहऱ्याकडून, सकाळी उठताना सूज जास्त असते का, दिवसभर काम केल्यावर वाढते, विशिष्ट पदार्थ खाण्यावर वाढते वा नाही? दाबल्यावर खड्डा पडतो तो त्वरित भरून येतो की बराच काळ टिकतो इ. अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये तपशीलवार हिस्ट्री (तपासणी) घ्यावी लागते. केवळ मूत्रपिंड हे सूजेचं प्रमुख कारण नसून रसरक्त संवहन करणाऱ्या शिरांमधील अवरोध हेसुद्धा कारण असतं. त्यामुळे अनेकवेळा सर्व तपासण्या करूनसुद्धा त्या प्राकृत असूनही सूज येणारे अनेक रुग्ण असतात. 

सूज येते तेव्हा

शरीरावर सूज आल्यावर त्या भागाचा वर्ण बदलतो, त्वचा ताणल्याप्रमाणे होते, अंग जड होतं, त्या-त्या अवयवांना फुगवटा येतो. तोंडाला पाणी सुटणं, भूक न लागणं, मळमळ होणं, चालताना दम लागणं, डोळ्यांच्या खाली सूज असणं, क्वचित पाय, पोट, हात-पाय या अवयवांवर सूज येणं, क्वचित ताप येणं, सूजेच्या भागांवर दाब दिल्यावर खड्डा पडतो तो कधी त्वरित भरून येतो, क्वचित उशिरा भरून येतो. लघवी कमी प्रमाणात होणं, भूक मंदावणं ही लक्षणं उत्पन्न होतात. आगन्तुज (बाह्य) कारणांमुळे उत्पन्न होणाऱ्या शोथमध्ये (सूजेमध्ये) त्वचा लाल होणं त्यावर पुरळ उत्पन्न होणं, खाज येणं, क्वचित त्वचेतून पाणी येणं, त्वचा फाटणं, त्वचेचा दाह होणं इ. लक्षणं उत्पन्न होतात. पुरुष रुग्णांमध्ये पायापासून सुरुवात होऊन सर्वांगावर पसरत जाणारी सूज आणि स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर उत्पन्न होऊन सर्वांगावर पसरत जाणारी सूज ही असाध्यतेकडे जाणारी असते. मूत्रपिंडाच्या विकृतीमुळे सर्व शरीरावर निर्माण होणारी सूज ही असाध्य असते.

बाह्य कारणांनी सूज आल्यास

औषधोपचारामध्ये बाह्य कारणांनी (आगन्तुज) निर्माण होणाऱ्या सूजेमध्ये कारणांचा विचार महत्त्वाचा. कोणत्या कारणांनी सूज आली आहे त्यानुसार चिकित्सा बदलते. उदा. बिब्बा यासारख्या वनौषधीमुळे सूज आली असल्यास आणि कोळी किंवा कीटक द्रव्यामुळे सूज आली असल्यास चिकित्सा भिन्न असते. प्रामुख्यानं अशा सूजेमध्ये स्थानिक चिकित्सामध्ये लेप लावणं, परिषेक करणं, रक्तमोक्षण करणं, विषघ्न उपचार करणं आवश्यक असतं. योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावे लागतात. 
यामध्ये गाईचं तूप, एरंडेल तेल, खोबरेल तेल, कोथिंबिरीचा रस, राजधौत घृत, गोमूत्र, जळवा लावणं यासारख्या पदार्थांचा उपयोग होतो.

अंतर्गत कारणांनी सूज आल्यास

शारीरिक व्याधींचा परिणाम म्हणून आलेल्या सूजेमध्ये पाणी मर्यादित प्यावं आणि तेसुद्धा उकळून त्यात सुंठ, नागरमोथा, पिंपळी यासारख्या औषधी टाकून घ्यावं. लंघन करावं. आहार मर्यादित ठेवावा. विविध प्रकारच्या लाह्या (उदा. साळीच्या, ज्वारीच्या, राजगिरा) यावर रुग्णास ठेवावं, यामुळे सूज उतरण्यास चांगला फायदा होतो. मधून-मधून विरेचन, रक्तमोक्षण वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावं. आलं आणि गूळ एकत्रित सेवन केल्यास सूज कमी होण्यास मदत होते. कोणत्याही विषारी पदार्थाचा प्रभाव कमी करण्यास आल्याचा उपयोग करावा. अघाडा या वनस्पतीच्या मूळांचा काढा करून दिल्यास विषाचे परिणाम कमी होतात. सर्व अंगावर सूज आल्यास विविध औषधींबरोबर आघाड्याचा क्षार दिल्यास सूज कमी होते. यात आघाडा, गोखरू, पुनर्नवा, चंदन, वाळा, उसाचे मूळ, उंबर, एरंड, कोरफड, हळद, निशोसर, सोनामुखी, गोमूत्र यासारख्या औषधांचा उपयोग होतो. मूत्रपिंडाच्या विकारात ताज्या पुनर्नवा वनस्पतीचा रस काढून दिल्यास सूज कमी होऊन मूत्रप्रवृत्ती वाढते. काटे गोखरूचा काढा दिल्यानंसुद्धा सूज कमी होते.
गोमूत्र किंवा गोमूत्र अर्काचासुद्धा सूज कमी करण्यास प्रभावी उपयोग होतो. गोमूत्र हरितकी, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, पुनर्नवासव, सुपारी आसव, गोखरू काढा, त्रिफळा चूर्ण यासारख्या औषधांचा वापर वैद्यांच्या सल्ल्यानं करावा.
पिण्याच्या पाण्याचे मर्यादित सेवन, सूर्यास्तापूर्वी जेवण आणि योग्य तेवढा व्यायाम, मर्यादित आहार या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.