- शुभा प्रभू-साटम


असंच एक मोठं चकचकीत दुकान. मोठ्ठ्या मॉलमधलं वेड लागाव्या अशा वस्तू. घरात वापरायच्याच. मी अशावेळी झापड बांधलेल्या घोड्यासारखी इकडे-तिकडे न बघता सरळ चालते. उगाच मोह नको. पण बाकीच्या लोकांचा बघणं हा मात्र आवडीचा छंद. 
अशीच एक आई आणि लेक खरेदी करत होते. विषय होता सॅलडचं भांडं. अनेक देखणी भांडी होती तिथं. एक मोठं लाकडी भांडं घेण्याचं त्यांच्यात जवळजवळ निश्चित झालं. चार आकडी किमतीचा तो वाडगा. एकदम सुबक गुळगुळीत, खाण्याच्या कार्यक्रमामध्ये, मालिकांमध्ये फोटो असतो ना अगदी तसा. 
पण वाटलं, आठवड्यातून एकदोनदा दाण्याचं कूट घालून कोशिंबीर करणाऱ्या घरात हा किलोभर कोशिंबीर होणारा वाडगा काय उपयोगाचा? पण हौस शेवटी. मनात विचार आला की, कितपत होणार उपयोग याचा. नव्याचे चार दिवस. 
आता तर मायक्रोवेव्हही जुना झाला. आता डीप फ्रायर, एअर फ्रायर, बार्बेक्यू ग्रील, पॉनीनी मेकर, स्टँड मिक्सर अशी अनेक उपकरणं उपलब्ध झाली आहेत. 
होतं काय की हौसेनं घेतलेलं सुरुवातीला वापरलं जातं पण नंतर ते बाजूलाच पडतं. अगदी मायक्रोवेव्ह ओव्हन घ्या. जवळपास ८० टक्के घरात फक्त अन्न गरम करणं यासाठीच तो वापरला जातो. बाकी उपयोग शून्य. हॅँड ब्लेंडर घ्या, प्रोसेसर घ्या, त्या सर्वांचा पूर्ण वापर आपण बायका करतच नाही. कारण काय? हेच तळ्यात मळ्यात. 
ही सर्व उपकरणं जी आहेत ती पाश्चात्त्यांकडून आलेली आहेत आणि आपल्या स्वयंपाकाची जातकुळी सणसणीत वेगळी आहे. येथे चांगल्या वाईटाचा मुद्दा किंवा टीका करणं हा हेतू अजिबात नाही. आपली द्विधा मन:स्थिती पाहण्यासाठी म्हणून हा प्रपंच. साधं बघा, पूर्वीचा फ्रीज मागे पडून नो फ्रॉस्ट फ्रीज सगळीकडे आलेत. हा फ्रीज आणि मायक्रोवेव्ह बहुतांशी घरात आढळतात पण त्यांचा हवा तो उपयोग (मॅक्सिमम युटिलायझेशन) होत नाही. 
नो फ्रॉस्ट फ्रीजमधे मटार साठवणं, खोबरं ठेवणं यापुढे जातच नाहीत अनेकजणी. कारण, आम्ही दोन्ही वेळेला ताजंच जेवतो हे ! आयुर्वेदातपण तेच सांगितलंय.
आता दिवसाचे बारा तास बाहेर असणाऱ्या बाईसाठी ही दोन्ही उपकरणं खरंतर अल्लाउद्दीनचा जीन ठरतात; पण नाही. धड नवं घ्यायचं नाही आणि जुनं पूर्ण वापरायचं नाही. नो फ्रॉस्ट फ्रीजमधे ठेवलेलं अन्न शिळं असतं असं का समजतो आपण? मीही यात संपूर्ण स्वयंपाक करून ठेवत नाही. पण पूर्वतयारी नक्कीच होऊ शकते. म्हणजे चवळी, वाटाणे, कडधान्यं उकडून त्यात राहू शकतात. हे अन्न शिळं नाही. जेव्हा हवं तेव्हा काढून मायक्रोवेव्हमधे डीफ्रॉस्ट करून वापरता येतं. पण काही चमत्कारिक विचारांमुळे असं वागताच येत नाही. 
भारतीय स्वयंपाकघरात ताजा स्वयंपाक हा उत्कृष्ट गृहिणीचा मानदंड मानला जातो. पण आज जेव्हा बाई नोकरी-उद्योग आणि घर ही कसरत करतेय तेव्हा इतके जुने निकष आजही लावणं कितपत योग्य आहे? 
एमबीए झालेली मुलगी, डॉक्टर, इंजिनिअर, बँकेतली अधिकारी किंवा अगदी छोटी उद्योजिका, तिनंही आपल्या आई, आजी, सासूसारखंच वागावं हा आग्रह का? होतं काय आपलं की आपण लटकत राहतो ना इकडचे ना तिकडचे. नव्या सुविधांचे फायदे दिसत राहतात पण जुन्या समजुतींना त्यागता येत नाही. परिणाम होतो तो उगाच चिडचिडीत आणि विसंवादात.
बाईला एक भीती सतत वाटत असते की आपल्याला कोणी आळशी म्हटलं तर? एक तर आपण जर वाच्यता नाही केली तर कोणाला अजिबात कळणारच नाही आणि असं मॅक्सिमम युटिलायझेशन करून आपलं आयुष्य अधिक सुकर होणार आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न शिळं, फ्रीजरमधलं तर अगदी वाईट.. असल्या खुळचट समजुती दूर करून या दोन्ही उपकरणांचा अगदी संपूर्ण वापर आपण करायला घेतला पाहिजे आणि तोपण कोणत्याही अपराधी भावनेनं न ग्रासता. जमेल..?
 
(लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.) 

shubhaprabhusatam@gmail.com